माणूस जे कर्म करतो त्याचे फळ देण्याची व्यवस्था निसर्गाने त्या कर्मातच करून ठेवलेली आहे. परिणामी विशिष्ट परिस्थितीत प्रामाणिकपणे काम करून सुद्धा जरी यश मिळाले नाही तरी हताश होण्याचे कारण नाही.
चांगले केलेले काम कधी वायाला जात नाही, आज जरी यश मिळाले नाही तरी ‘ क्रिया तशी प्रतिक्रिया ‘ या निसर्गनियमानुसार भविष्यात ते न मिळालेले यश माणसाला दामदुपटीने मिळते.
एखादा माणूस आपले सुयश हिरावून घेतो म्हणजेच आपल्याला अपयश मिळते. ज्याअर्थी अपयश मिळाले त्या अर्थी ते अपयश निसर्गनियमानुसार आधी केलेल्या चुकांचे फळ असू शकते.
यशाचे कर्तृत्व माणूस स्वत:कडे घेतो, त्याचप्रमाणे अपयशाचे भोगतृत्वसुद्धा त्याच्याचकडे जाणे क्रमप्राप्त आहे.
म्हणूनच माणसाने अपयशाचा कोळसा उगाळत बसण्यापेक्षा केलेल्या चुका दुरुस्त करून यशाच्या दिशेने प्रयत्न करणे, हेच त्याच्या हिताचे होय.
प्रामाणिकपणे व कर्तव्यबुद्धीने काम करणे, हे सर्वार्थाने सर्वांच्याच हिताचे आहे.
‘ क्रिया तशी प्रतिक्रिया ‘ म्हणजे ‘Low of Action and Reaction’ या निसर्ग नियमाला अनुसरून ज्या राष्ट्रातील लोक कामात कसूर करतात त्या राष्ट्राचा उत्कर्ष घडवून आणणे ब्रम्हदेवाला सुद्धा शक्य नाही.
याउलट ज्या राष्ट्रांतील लोक कर्तव्यबुद्धीने, प्रामाणिकपणे काम करतात त्या राष्ट्राचा उत्कर्ष अटळ आहे.
– सद्गुरू श्री वामनराव पै
Leave a Reply