आज ऐन सनासुदीचं आभाळ आलं व्हतं, तळहाताच्या फाॅडावाणी जपलेलं आमच्या रानातलं ह्ये पिवळं सोनं उघड्यावरच व्हतं, आमच्या रानातला समदा कारभार हाकणारं आण्णा आन् दादा ह्येन्ला एकच चिंता पडली. आता सनासुदीमुळं लेबर मिळायचंबी आवघड झालतं मग काय तोंडातला घास पावसात भिजुनी म्हणुनशान घरातल्या समद्या पावण्या रावळ्यांसहीत मी आन माझं भाऊबंद निघालोकी रानात. आमचं दादा आन् आण्णा सकाळपसुनच रानात व्हतं, सोयाबिनिची रास लाल तळवटावर शिग लावुन बसली व्हती. सुतळी गोण्या, चार घमेली, रूपेश, सुजित, युवराज, स्वप्निल ही पोरं गवतावनी झटली आन् समदं सोयाबिन आवघ्या तासाभरात शिलपॅक करून टाकलं. ऊशिराची पेर आसल्यानं मधल्या पावसाच्या रपाट्यातुन आमचं सोयाबिन थोडक्यात वाचलं व्हतं. चार एकरात ईनबिन ईस किंटल सोयाबिन पदरात पडलंय, शेतकऱ्याचं ह्ये पिवळं सोनं बाजारात मातुर कवडीमोल किंमतीनं ईकलं जाणाराय ह्यजी खंत वाटतिया.
रानातलं ह्ये सोयाबिन ईकल्यावर ह्यज्यापसुन सोया दुध, सोया पनिर, सोया टिक्का, सोया चिल्ली, सोया ऑईल आसली डझनभर उत्पादनं तयार व्हत्याली पण ह्ये सोयाबिन मातीत पिरून त्याला कोरड्या आन् वल्या दुष्काळाच्या हाबाड्यातुन वाचवुन, घरातल्या समद्या माणसानी जे जिवाचं पाणी केलंय त्याचा दाम मातुर त्येन्ला मिळणार नाय ह्यजंच वाईट वाटतंय. माझ्या फिरस्तीमुळं मला शेताकडं जास्तीचं लक्ष देता येत नाय पण जितबी कुठं कोणत्याबी ईषयावर बोलायला जातो तवा शेतकऱ्याचं दुःख मांडल्याबिगीर माझं व्याख्यानच पुरं व्हत नाय. शिवटी समदं ईषय रानातल्या मातीत सुरू हुन मातीतच संपत्यात मग त्या मातीला माझ्या बोलण्यातुन आन् लिव्हण्यातुन जित्तं करणं ह्ये तर माझं कर्तव्यच हाय की.
ईस किंटल सोयाबिन पोत्यात भरणं म्हंजी माज्या सारख्या कधीतरी शेतात राबणाऱ्या माणसासाठी जरा ओव्हरलोडंच काम म्हणायचं. उद्या व्याख्यानाला उभा राहील्यावर आंगतला ह्यो दर्द शब्दांच्या रूपानं भाहीर पडलं हे नक्की. आज बऱ्याच दिसानं माझ्या आंगातुन कष्टाचा घाम आलता. गेल्या कित्येक दिसापासुन मोबाईल पेक्षा जास्त वजन कधी उचलण्यात आलं नाय पण आज साठ किलोच्या गोण्या दादांसोबत उचलताना माझ्यातला पैलवान जागा झालता. वडीलांच्या हातात हात दिऊन शेतात राबताना येगळाच आभिमान वाटत व्हता. खरं सांगतु आपल्या बापासोबत काम करण्यासारखा दुसरा आनंद नाय राव. दुपारपसुनचं ह्ये आमचं कष्टाचं काम सांच्याला समदी पुती शेडमदी टाकुनच संपलं. शेततळ्यावर हात पाय तोंड धुवुन आमच्या टॅक्टरवर बसुन ह्यो सगळा परसंग टाईपीत बसलोय. दिवस मावळलाय, रानातली पाखरं घराकडं निघाल्याती म्या बी फोर्डमधी बसलुय, पोटात मरणीची आग पडलीया; कधी एकदा आईच्या हातची चुलीवरची भाकरं म्हशीच्या घट्टबंड्या दुधात चुरून खातुय आसं झालंय.
लेखक : प्रा.विशाल गरड (पांगरीकर)
दिनांक : ३० ऑक्टोंबर २०१६
वेळ : सायंकाळी ५ ते ६:३० वाजता (रानात)
Leave a Reply