आवळा ह्याला आयुर्वेदा मध्ये आमलकी किंवा धात्री असे म्हणतात.धात्री अर्थात आई किंवा माता जी आपल्या अपत्यांचे भरण पोषण करते.आणी आयुर्वेदामध्ये आवळ्याला देखील असेच महत्त्व आहे कारण हा आवळा आपल्या सर्वांच्या आरोग्याची काळजी व आपले पोषण वेगवेगळ्या पद्धतीने वापरल्यास करतो ह्यात वाद नाही.
आयुर्वेदामध्ये आवळ्याला रसायन औषधी असे देखील म्हटले जाते.कारण रसायन औषधी ह्या आपल्या शरीरातील सात ही धातुंचे योग्यप्रकारे निर्माण व पोषण करणारे औषध म्हणजे रसायन.ह्या औषधाचे सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच रसायन औषध नित्य सेवन केल्याने शरीर लवकर वृध्द होत नाही अर्थात आपण ती च्यवनप्राशची ॲड पाहिली असेल ना ६० साल के बुढे या ६० साल के जवान त्यात तो वृद्ध च्यवनप्राश खाऊन कसा पटापट जीने चढतो तर एक तरूण व्यक्ती अगदी जीने चढताना अगदी दमून जातो.हेच दाखवते कि च्यवनप्राश हे रसायन औषध सेवन केल्याने म्हातारपण लांब रहाते आपल्या पासून.कारण च्यवनप्राश मध्ये देखील प्रमुख घटक हा आवळाच असतो.
आवळ्यामध्ये विटामीन सी अर्थात क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते.तसेच हा आवळा आपण नियमीत पणे आपल्या दैनंदिन जीवनात सेवन केल्यास तो आपल्या आरोग्याचे रक्षण हमखास व अगदी उत्तमरित्या करतो.
आपण नेहमी आवळ्याचे लोणचे करतोच.तसेच आवळ्याच्या कॅंण्डी देखील आता मिळतात अर्थात हा साखरेच्या पाकात शिजवलेले आवळे होय.तसेच आवळ्याचा च्यवनप्राश,आवळ्याचा रस,आवळ्याचे सरबत,आवळा चुर्ण,आवळ्याचा मुरंबा,आवळ्याचा पाक,आवळा सुपारी अशा नानाविध रूपांमध्ये तो बाजारात उपलब्ध आहे.त्यातील आपल्याला सोयीस्कर रूपांमध्ये त्याचे सेवन आपण करावे.
आवळा हा त्वचेची काळजी घेतो,रक्ताची शुद्धी करतो,श्वसन संस्थेचे आरोग्य राखतो,पचनसंस्थेचे आरोग्य नीट ठेवतो,प्रजनन संस्था देखील सांभाळतो,हाडांची काळजी घेतो असा वेगवेगळ्या पातळींवर एकटा खिंड लढविणारा हा आवळा काही खास औषधींपैकी एक आहे. ह्याच्या बद्दल लिहावे तेवढे थोडे आहे.
(क्रमश:)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply