आपण सेवन करत असलेल्या त्रिफळा चुर्णामध्ये देखील हरडा व बेहड्या सोबत आवळा असतो.
आवळ्याचे २०-२५ फूट उंच वृक्ष असतो.ह्याची पाने चिंचेच्या पानांप्रमाणे असतात व ह्याला पिवळी फुले गुच्छ स्वरूपात येतात.फळे गोलाकार,मांसल पिवळसर हिरवी व आत टणक बी असणारी असतात.
ह्याच्यात खारट सोडुन बाकी पाच ही चवी असतात व त्यात आंबट चव प्रमुख असते.हा थंड गुणाचा असून तो तिन्ही दोषांचे शमन करतो.
आता आवळ्याचे घरगुती उपयोग पाहूया:
१)ज्या बायकांना अंगावर पांढरे जाते त्यांनी आवळ्याच्या बिया पाण्यात वाटून त्यात साखर व मध घालून सलग तीन दिवस घ्याव्या.
२)खरूज झाल्यास आवळ्याचे चुर्ण जाळून त्याची राख करावी व ती तीळ अथवा निंब तेलामध्ये कालवून लावावी.
३)घसा बसला असल्यास गाईच्या दुंधात आवळ्याचे चुर्ण मिसळून द्यावे.
४)अम्लपित्तामध्ये आवळ्याचे चुर्ण केळीच्या कांद्याच्या रसामध्ये मिसळून द्यावे.
५)नाकाचा घोळणा फुटून रक्तस्राव होत असल्यास व डोके वारंवार दुखत असल्यास आवळ्याचे चुर्ण तुप व साखर घालून खावे.
६)पित्याच्या विकारामध्ये आवळ्याचे ५ ग्राम चुर्ण कल्हई केलेल्या भांड्यात रात्रभर भिजत ठेवावे व सकाळी हे त्यात ५० मिली गाईचे दुध मिसळून ते प्यावे.
७)१ चमचा आवळा रस+ २ चमचे ओल्या हळदीचा रस सकाळी उपाशी पोटी घेतल्यास मधुमेहामध्ये फायदा होतो.
८)१ चमचा आवळा रस+ ४मोठे चमचे नारळाचे दुध रोज दुपारी जेवणापुर्वी घेतल्यास कृमिंचा त्रास कमी होतो.
९)१ चमचा आवळा रस+२ चमचे केळफूलाचा रस रोज २ महीने घेतल्यास बायकांचे अंगावर पांढरे जाणे,मासिक पाळीच्या वेळी अतिरक्तस्त्राव होणे ह्या तक्रारी कमी होतात.
१०)१ चमचा आवळा चुर्ण १ कप ताज्या ताकामध्ये मिसळून रोज जेवणानंतर घेतल्यास हाता पायाची आग होणे,संडासच्या जागी होणारी आग ह्या तक्रारी कमी होतात.
आवळा किती ही चांगला असला तरी तो अति खाल्ल्यास जुलाब होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply