कोकमाची झाडे आपल्याला कोकण गोवा प्रांतामध्ये पुष्कळ पाहायला मिळतात.असे म्हणणे अतिशयोक्ती ठरू नये कि कोकमा शिवाय कोकणी व गोयंकार माणसाचा स्वयंपाक पुर्ण होऊ शकत नाही.
कोकमाची फळे हि सुकवून त्याची सोले स्वयंपाक व औषधात वापरतात.आमटी,काही भाज्या,तिवळ,नारळाचा रस घालून केलेली सोल कढी,आगळ,कोकम सरबत इ अनेक प्रकारे आपण कोकमाचा वापर करतो.
ह्याचा सदाहरीत,पातळ नाजूक फांद्या असलेला वृक्ष असतो.ह्याची पाने आयताकार अथवा भालाकार असतात वरून गडद हिरवी व खालून फिकट रंगांची असतात.फळ गोलाकार १-१/२ इंच व्यासाचे असते.फळाच्या आत ५-८ मोठ्या बिया असतात.
कोकम चवीला कच्चा असताना आंबट व पिकल्यावर आंबट गोड लागतो हा उष्ण असून कफवातनाशक अाहे.
आता ह्याचे घरगुती उपचारात महत्त्व पाहूया:
१)कोरड्या उल्ट्या,तोंड कडू होणे,तोंडास चव नसणे ह्यात ७-८ आमसुलाचा एका वाडग्यात पाणी घालून भिजत घालावी व कुचकरून ते पाणी गाळावे व त्यात १ चमचा खडीसाखर घालून थोडे थोडे प्यावे.
२)अंगावर पित्त उठत असल्यास अंगाला कोकमाचे पाणी लावावे व पोटात देखील हे पाणी प्यावे.
३)कोकमाच्या बियांपासून काढलेले मेण हे पायांच्या भेगा भरून काढायला उपयोगी आहे.
४)करपट ढेकर येणे,भुक न लागणे,जेवण न पचणे,पाणी सुद्धा प्यावेसे न वाटणे ह्यात कोकमाचे पाणी काळीमिरी व मीठ घालून जेवणानंतर प्यावे त्याने पचन सुधारते.
५)ज्यांना मुळव्याध,अम्लपित्त,भगंदराचा त्रास आहे व त्यांना जेवणामध्ये चिंच वापरतां येत नाही त्यांनी कोकम वापरावा.
६)कोकमाच्या तेलाचा उपयोग जखमभरून काढायला केला जातो.
कोकम खाण्याचा अतिरेक केल्यास संडासला घट्ट होऊ शकते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply