जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजं जी!हे गाणे प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात घर करून बसलेले.तसेच उन्हाळ्याच्या दिवसात मिळणारी हि रसरशीत जांभळे देखील आपल्या प्रत्येकाच्याच मनात घरकरून आहेत.मीठ लावून हि जांभळे उन्हाळ्यात चोखून लाळ घोटत खाणे म्हणजे एका अभूतपूर्व सुखांची अनुभूतीच जणू.
ह्याचा १०० फूट उंच वृक्ष असतो.ह्याची पाने ३-६ इंच लांब भालाकार,स्निग्ध,चमकदार असतात.फुले हिरवी सफेद सुगंधित असतात.फळ १/२-११/२ इंच लांब ,अंडाकार असते.हे कच्चे असताना हिरवे व पिकल्यावर जांभळे होते त्याच्या आत मोठी टणक बी असते.
जांभुळ हे चवीला तुरट,गोड,आंबट असते व थंड गुणाचे असते.त्यामुळे ते शरीरातील कफ व पित्त हे दोष कमी करते व वात दोष वाढविते.
जशी हि जांभळे खायला छान लागतात तसेच ह्यांचे बरेच औषधी उपयोग देखील आहेत ते आपण पाहूयात.
१)अंगाची आग होत असल्यास जांभळाचा शिरका (अर्थात जांभळाचा आंबवलेला रस) तीळ तेलात मिसळून अंगाला लावावा.
२)डायबेटिस मध्ये रक्त व लघवीतील साखर नियंत्रणात ठेवायला जांभळाच्या बियांचे चुर्ण सकाळी व रात्री १-१ चमचा रिकामी पोटी घ्यावे.
३)जाभळाच्या कच्च्या फळाच्या रसात मीठ घालून गुळण्या केल्यास दातहलणे,हिरड्या सैल होणे,तोंड येणे,तोंडातून रक्त स्त्राव होणे ह्या तक्रारी कमी होतात.
४)जुलाब होत असल्यास अथवा संडास मधून आव पडत असल्यास जांभळाच्या कच्च्या फळाचा रस १/२ कप + १ ग्लास ताक हे मिश्रण थोडे थोडे दिवसातून ३-४ वेळा प्यावे.
५)भुक न लागणे,तोंडाला चव नसणे,ह्यात पिकलेल्या जांभळाचा रस १ कप+ १ मोठा चमचा आल्याचा रस +१/४ चमचा काळी मिरीपूड हे मिश्रण २१ दिवस जेवणापुर्वी घ्यावे.
जांभळे खाण्याचा अतिरेक केल्यास बध्दकोष्ठाचा त्रास होऊ शकतो.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply