फणसा सारखा बाहेरून कडक आणी आतून अगदी नरम अशी म्हण प्रचलित आहे.असा हा सर्वांचा आवडता फणस ज्याला कोकणचा मेवा देखील म्हणतात.
ह्याचे कापा,बरंका किंवा रसाळ आणी भाजीचा असे तीन प्रकार असतात.साधारण पणे उन्हाळ्यात पिकणारे हे फळ तसे सर्वांच्याच आवडीचे नाही का?
फणसपोळी,फणसाचे चिप्स,गुळ खोबरे तांदूळ व गरे घालून केली जाणारी गोड सांजण,गोव्यात मिळणारा कच्चा फणस ज्याला कुवला म्हणतात त्याचे केले जाणारे चटणी वजा भाजी ज्याला आम्ही सपशेल म्हणतो,किंवा मग नुसतेच गरे काढुन खा ना त्यात हि एक आगळी वेगळी मजा आहे.
ह्याचा ५०-१०० फूट उंच वृक्ष असतो व ह्याच्या खोडालाच हे फणस लागतात जे १-३ फूट लांब व ५-२५ किलो वजन भरणारे देखील असतात.फणस बाहेरून हिरवा बारीक उंचवटे युक्त व आत पिवळ्या रंगाचे मऊ गरे व त्यात आठळया असलेला असतो.
कच्चा फणस हा तुरट गोड,थंड व कफवातवर्धक व पित्तनाशक असतो.तर पिकलेला फणस हा चवीला गोड,थंड व कफकर व वातपित्तनाशक असतो.
चला आता ह्याचे घरगुती उपयोग पाहू:
१)फणसाचे दुध हे गाठी व सूज कमी करते व जखम भरायला मदत करते.
२)अशक्तपणा,वजन कमी होणे अशा तक्रारींवर २ फणसाचे गरे,१/४ चमचा मिरीपूड ,१/४ चमचा सैंधव हे मिश्रण जेवणानंतर खावे.पण भुक लागत नसल्यास हा प्रयोग करू नये.
३)तोंड कडू होणे,कोरडे पडणे,पोटात गरम वाटणे,अशा तक्रारींवर फणसाचे १-२ गरे भरल्या पोटावर खावे.
४)बरंका अर्थात रसाळ फणसाचे गरे वाटून गरम करून हे मिश्रण पिकत येणाऱ्या गळूवर बांधावे म्हणजे गळू पिकून फुटेल.
५)शरीरावर झालेली जखम भरून येण्यासाठी रसाळ फणसाचा गर वाटून जखमेवर बांधावा म्हणजे रक्तस्राव थांबतो व जखम देखील लवकर भरते.
फणस खायचा अतिरेक केल्यास जुलाब,सर्दी,कृमी,खोकला होतो.
फणसाच्या अतिखाल्ल्याने होणाऱ्या अजीर्णावर खोबरे खावे.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply