पंडित सुरेशबाबू माने ऊर्फ अब्दुल रहमान यांचा जन्म किराणा घराण्याचे उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेब व ताराबाई माने या दांपत्याच्या पोटी रोजी झाला. ताराबाई ह्या सरदार मारुतीराव माने यांच्या सुकन्या होत. मारुतीराव माने हे बडोदा संस्थानाच्या राजमातांचे बंधू होते. अब्दुल करीम खाँ हे त्या राजदरबारात गायक होते व ताराबाईंना गाणे शिकवत होते. दोघांचे प्रेम जुळले व त्यांनी विवाहाचा निर्णय घेतला. परंतु ताराबाईंच्या मातापित्यांचा ह्या विवाहास विरोध असल्यामुळे अब्दुल करीम खाँ व ताराबाईंना संस्थान सोडावे लागले. त्यांनी मुंबईत संसार थाटला व यथावकाश पाच अपत्यांना जन्म दिला. त्यांच्या दोन पुत्रांची नावे सुरेश उर्फ अब्दुल रहमान व कृष्ण ही होती; तर मुलींची नावे चंपाकली, गुलाब आणि सकीना उर्फ छोटूताई अशी होती. पुढे ही भावंडे अनुक्रमे सुरेशबाबू माने, कृष्णराव माने, हिराबाई बडोदेकर, कमलाबाई बडोदेकर आणि सरस्वतीबाई राणे या नावांनी प्रसिद्धीस पावली. सुरेशबाबूंना संगीताचे प्रारंभिक शिक्षण आपल्या वडिलांकडून मिळाले आणि नंतरचे शिक्षण त्यांनी वडिलांचे मेव्हणे व किराणा घराण्याचे ज्येष्ठ संगीतकर्मी उस्ताद अब्दुल वाहिद खान यांच्याकडून व सवाई गंधर्वांकडून प्राप्त केले. सुरेशबाबूंच्या गाण्यात उत्स्फूर्तता, माधुर्य व सौंदर्य होते. त्यांची लय व तालावरची पकडही उत्तम होती. ख्याल, ठुमरी, दादरा, मराठी नाट्य संगीत आणि भजन या गायन प्रकारांवर सुरेशबाबूंचे प्रभुत्व होते. त्यांनी अनेक मराठी नाटकांत व चित्रपटांत वेगवेगळ्या भूमिका केल्या. अमृतमंथन, रजपूत रमणी आणि चित्रसेना हे त्यांचे चित्रपट. त्यांनी संन्यास-कल्लोळ नाटकात अश्विनशेठची आणि सुभद्रा नाटकात अर्जुनाची भूमिका केली होती. सावित्री, सच है आणि देवयानी या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन सुरेशबाबूंचे होते. मूक चित्रपटांच्या कारकिर्दीत सुरेशबाबू पडद्यामागे बसून हार्मोनियम किंवा तबला वाजवीत. त्यांच्या शिष्य परिवारात प्रमुखतः हिराबाई बडोदेकर व प्रभा अत्रे ह्या प्रख्यात गायिकांचा समावेश होतो. तसेच वसंतराव देशपांडे, पं. भीमसेन जोशी, माणिक वर्मा यांनाही सुरेशबाबूंचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या शिष्या डॉ. प्रभा अत्रे यांनी मुंबईत, सुरेशबाबूंच्या नावाने ‘सुरेशबाबू -हिराबाई स्मृति समारोह’ या वार्षिक संगीत महोत्सवाच्या आयोजनाला १९९२ साली प्रारंभ केला. आता हा संगीत महोत्सव भारतातील नावाजल्या जाणाऱ्या प्रमुख संगीत महोत्सवांपैकी एक गणला जातो. याला मुंबईचा सवाई गंधर्व असे समजले जाते. “जोशेर का बच्चा है, वो शेर जैसाही बहादूर होगा,” असे उदगार उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेब यांनी आपले चिरंजीव सुरेशबाबू माने यांच्या बद्दल काढले होते. सुरेश बाबू माने यांचे निधन १५ फेब्रुवारी १९५३ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply