आज १३ सप्टेंबर….किराणा घराण्याच्या जेष्ठ गायिका मा. डॉ. प्रभा अत्रे यांचा वाढदिवस
प्रभा अत्रे यांचा जन्म १३ सप्टेंबर १९३२ रोजी झाला. अग्रगण्य हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिकांपैकी एक म्हणून प्रभा अत्रे यांचे नाव घेतले जाते. त्या पं सुरेशबाबू माने आणि गानहिरा हिराबाई बडोदेकर यांच्या शिष्या आहेत. प्रभाताई वयाच्या आठव्या वर्षी शास्त्रीय गायनाकडे वळल्या. हिराबाईंकडे शिकत असताना प्रभाताई त्यांना भारतातील विविध भागांतील कार्यक्रमात साथ करत असत. संगीत शिकत असतानाच प्रभाताईंनी विज्ञान व कायदा विषयांत पदवी संपादन केली. नंतर त्यांनी संगीतात डॉक्टरेटही केली. प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका व विदुषी म्हणून प्रभा अत्रे यांचा लौकिक आहे. ख्याल गायकीसोबत ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, भजन व भावसंगीत गायकीवरही त्यांचे प्रभुत्व आहे.
भारतीय शास्त्रीय संगीताचा जगभर प्रसार करण्याचे कामी त्यांचे मोठे योगदान गणले जाते. आपल्या कार्यक्रमांत त्या अनेकदा स्वतः रचलेल्या बंदिशी सादर करतात. त्यांच्या काही रचना, जसे, मारू बिहाग रागातील ‘जागू मैं सारी रैना’, कलावती रागातील ‘तन मन धन’, किरवाणी रागातील ‘नंद नंदन’, ह्या श्रोतृवृंदाच्या विशेष पसंतीच्या रचना आहेत. प्रभाताईंनी अपूर्व कल्याण, मधुरकंस, पटदीप – मल्हार, तिलंग – भैरव, भीमकली, रवी भैरव यांसारख्या नव्या रागांची रचनाही केली आहे. तसेच किराणा घराण्याच्या गायकीत त्यांनी प्रथमच टप्पा गायनाचा परिचय करवून दिला. तरुण वयात प्रभाताईंनी संगीत शारदा ,संगीत विद्याहरण, संगीत संशयकल्लोळ, संगीत मृच्छकटिक, बिरज बहू, लिलाव यांसारख्या संगीत नाटकांमध्ये प्रमुख स्त्री भूमिका केल्या. १९५५ पासून त्या देशोदेशी आपले गायनाचे कार्यक्रम सादर करत आहेत.
भारतातील व विदेशांतील अनेक ख्यातनाम व महत्त्वपूर्ण संगीत महोत्सवांमध्ये त्यांचे कार्यक्रम सादर झाले आहेत. मा.डॉ. प्रभा अत्रे यांनी मराठी व इंग्लिश भाषेत अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे मराठीतील पहिले पुस्तक ‘स्वरमयी’ असून त्यात संगीतावर आधारित निबंध व लेख आहेत. ह्या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. स्वरमयी प्रमाणेच त्यांच्या ‘सुस्वराली’ या दुसर्याय पुस्तकालाही लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. मध्य प्रदेश शासनाने दोन्ही पुस्तकांचे हिंदी भाषेत अनुवाद प्रसिद्ध केले आहेत. त्यांच्या स्वरांगिणी व स्वररंजनी या मराठी भाषेतील पुस्तकांत त्यांनी रचलेल्या ५०० शास्त्रीय रागबद्ध रचना व लोकरचना आहेत. (त्यांसोबत ध्वनिमुद्रिका संचाचा समावेश असतो.) त्यांचे पाचवे पुस्तक, ‘अंतःस्वर’ हा त्यांनी लिहिलेल्या कवितांचा संग्रह आहे. ह्या पुस्तकाचा इंग्रजी भाषेत अनुवाद झाला आहे.
प्रभाताईंची इंग्रजी भाषेतील ‘एनलायटनिंग द लिसनर’ व ‘अलाँग द पाथ ऑफ म्युझिक’ ही ध्वनिमुद्रिकांच्या संचासह विक्रीस पुस्तके वैश्विक श्रोतृवृंदाला उपलब्ध आहेत. प्रभाताईंनी भारतात व परदेशांत संगीत विषयावर अनेक सप्रात्यक्षिक व्याख्याने दिली असून संगीतावर आधारित विषयांवर विविध संशोधनपर लेख सादर केले आहेत. भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार, , १९९० साली व पद्मभूषण पुरस्कार २००२ साली मा.प्रभा अत्रे यांना दिला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.विकिपीडिया
Leave a Reply