फोडणीसाठी देशी गायींच्या दुधापासून बनवलेलं तूप वापरावं हे आपण या आधी पाहिलं. तरीही ज्यांना तूप न वापरता तेलच वापरायचं आहे त्यांनी काय काळजी घ्यावी ते आपण पाहणार आहोत.
कुठलं तेल वापराल?
आजकाल आम्हाला ऑलिव्ह ऑइल खूपच ‘हेल्दी’ असतं असा साक्षात्कार झाला आहे. उठसुठ सगळ्या पदार्थांत आम्ही हे महागडं तेल वापरतोय. प्रत्यक्षात ज्या देशांतून हे तेल आपल्याकडे आलं तिथे मात्र हे ऑलिव्ह ऑइल केवळ सॅलड्सच्या ड्रेसिंग पुरतंच प्रामुख्याने वापरलं जातं. फोडणीसारख्या उच्च तापमानाला वापर करण्यास हे अनुपयुक्तच नव्हे तर घातकदेखील आहे हे कायम लक्षात ठेवा.
या तेलाशिवाय सोयाबीन, सूर्यफूल आणि राईस ब्रान हे तेलांचे प्रकार आपल्या माथी ‘हेल्दी’ म्हणून मारले जातात. पुन्हा सतत एकच तेल न वापरता दोन तेलांचे मिश्रण वापरावे यांसारखे अर्धवट माहितीवर आधारित सल्ले कित्येकजण देत असतात. (प्रत्यक्षात दोन-चार तेलांचे, तेल + तूप अशी मिश्रणे वापरणे मुळीच योग्य नाही. आयुर्वेदानुसार तसे अपेक्षितदेखील नाही.) याशिवाय ‘हृदयासाठी उत्तम’ असं म्हणून जाहिरात करणारे काही ब्रँड आहेतच. लोकहो; यांपैकी कसल्याच आहारी जाऊ नका. आपल्या देशात जी तेलं वापरण्यात येतात तीच वापरा. तसे करणेच फायद्याचे आहे.
हिंदुस्थानात भौगोलिक स्थितीनुसार तेलांचे प्रकार बदलतात. उत्तर भारतात राईचे तेल चांगले तर दक्षिण भारतात खोबरेल तेल उत्तम. त्याचप्रमाणे महाराष्ट्र आणि मध्य भारतात भुईमूग हाच उत्तम पर्याय आहे. कोणत्याही प्रकारचे तेल असो; घाण्यावरील तेल हे रिफाइंड तेलांहून अधिक चांगले. खोबरेल तेल मात्र कोल्ड प्रेस पद्धतीने काढलेले असेल तर उत्तम. ऑलिव्ह ऑइल वाईट असा या लेखाचा अन्वयार्थ कृपया काढू नका. सॅलड ड्रेसिंग म्हणून ते वापरण्यास काहीच हरकत नाही. अन्यत्र मात्र देशी पर्यायच अधिक उजवे आहेत हे नक्की!!
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
Leave a Reply