कुठल्याच ईश्वराला कळते न वेदना
आणू नवीन ईश्वर, बदलून हा जुना
म्हणतोस पावसाळे तू खूप पाहिले
का रे अजून नाही धुतलीस वासना
केली किती प्रतीक्षा बाहेर थांबुनी
त्यांच्या घरास होता आतूनही जिना
बोलायचे तुला जे बोलून टाक तू
दाबून टाकल्या की छळतात भावना
गेली कितीक वर्षे मी हेच ऐकतो
आता पुढील वर्षी संपेल वंचना
दिलदार राजबिडा आहेच मी गडे
गझलेवरून माझ्या येईल कल्पना
— प्रदीप निफाडकर
Leave a Reply