उद्योगधंद्यात एके काळी अव्वल क्रमांकावर असलेल्या आपल्या महाराष्ट्र राज्यातून आता बरेचसे उद्योग-धंदे बाहेर जाताना दिसून येत आहेत. वीज टंचाई, पायाभूत सुविधांचा अभाव, प्रचंड प्रमाणात वाढलेला भ्रष्टाचार, कामरारांचे तंटे यासारखया कारणांनी महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जात असतानाच नुकत्याच बाहेर आलेल्या एका बातमीने महाराष्ट्राविषयीच्या चिंतेत भर घालण्याचे काम केले आहे. ही बातमी आहे गुन्हे, चोरी आणि लूटमारीची.
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने जारी केलेल्या आपल्या अहवालात महाराष्ट्राबद्दल धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
चोरी आणि लूटमारीत महाराष्ट्र राज्य देशात अव्वल ठरला आहे. २०१२ मध्ये १४ हजार ४५४ कोटी, ४८ लाख, ८० हजार रुपयांची मालमत्ता लंपास करण्यात आली. संपूर्ण देशभरातून २१ हजार ७१ कोटी, ९४ लाखांची मालमत्ता लंपास करण्यात आली. म्हणजेच २/३ वाटा महाराष्ट्राचा होता.
या लंपास केलेल्या मालमत्तेपैकी १ हजार ४१७ कोटी ९३ लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली. मालमत्ता जप्त होण्याची टक्केवारी केवळ ६.७ टक्के आहे.
राज्यातून गतवर्षी १३,९५६ दुचाकी वाहनांची चोरी झाली. त्यापैकी ३,७३१ वाहने जप्त करण्यात आली. २,८५३ चारचाकी वाहनांची चोरी झाली. त्यापैकी फक्त ५९८ वाहने जप्त करण्यात आली.
राज्यात निवासस्थानांच्या ठिकाणी चोरीच्या ३५८ घटना घडून लुटारूंनी ३ कोटी ३७ लाख ४० हजारांचा ऐवज लुटून नेला. महामार्गांवर ४४३ घटना घडून ६ कोटी ९४ लाख ६० हजारांचा ऐवज लुटण्यात आला.
मुंबई हे देशाच्या आर्थिक राजधानीचे शहर असतानाच तेथे आता चोर-लुटारूंचे राज्य झाले आहे. मुंबई शहर हे चोरी आणि लूटमारीच्या गुन्ह्यात अव्वल असून, ८ हजार ३४४ कोटी ८३ लाख १० हजार एवढी मालमत्ता लंपास करण्यात आली आहे. केवळ ६९ कोटीची मालमत्ता जप्त आहे.
राज्यात बँक लूटमारीच्या ४ घटना घडून लुटारूंनी ३ लाख ५० हजारांची रोख लुटून नेली. व्यापारी प्रतिष्ठानांच्या ठिकाणी ११९ घटना घडून १ कोटी – १ लाख ९० हजारांचा ऐवज लुटून नेण्यात आला. अन्य ठिकाणी ५ हजार ५१० घटना घडून ४२ कोटी ३२ लाख ९० हजारांचा ऐवज लुटण्यात आला.
आता याचा परिणाम महाराष्ट्रातील उद्योगधंद्यांवर काय होतो ते बघणे महत्त्वाचे ठरेल.
— निनाद अरविंद प्रधान
Leave a Reply