उमा देवी खत्री यांचा जन्म १ जानेवारी १९२३ रोजी झाला. टूनटून यांचे खरे नाव उमा देवी खत्री होते. १९४०-४५ चा काळ होता, रम्य अशा दिवसातली ती सकाळची वेळ होती, संगीकार नौशादजी आपल्या आशियाना या घरात हार्मोनियमवर गाण्याचे स्वर काळ्या पांढरीच्या शृंगारात बसवत होते. इतक्यात त्यांच्या दारावर थाप पडली. पाठोपाठ आणखी थापा पडल्या. डोअर बेल न वाजवता दारावर कोण सलग थापा मारतंय हे बघण्यासाठी त्यांनी दरवाजा उघडला आणि समोर कोणीच नव्हते, ते दार बंद करणार इतक्यात बाजूला लपलेली एक १२- १३ वर्षांची धिटूकली समोर आली. तिने त्यांच्या पायाला मिठीच मारली ! ते तिच्याशी बोलण्याआधी तिने भोकाड पसरले, ते तिला घरात घेऊन आले. तिची विचारपूस केली तेंव्हा ती बोलती झाली. ती म्हणाली, “मला तुम्ही गायनाची संधी दिली नाही तर मी इथल्याच समुद्रात जीव देईन !” गावात असताना रेडीओवर गाणी ऐकून ऐकून तिने एकलव्यी बाण्याने रियाझ केलेला, इतकीच काय ती तिची गायनाची तयारी पण तिचा आवाज मधुर असल्याने तिचा स्वतःवर विश्वास होता अन तिच्या डोक्यात सतत नौशादजींचे वेड असे. या शिदोरीवर तिने घर सोडून वयाच्या १३ व्या वर्षी थेट मुंबई गाठली होती. नौशाददेखील युपीच्या लखनौचेच असल्यामुळे त्यांना तिची काळजीही वाटत होती. नौशादजीनी तिच्या अशा या पार्श्वभूमीमुळे काही दिवस काम दिले नाही अन एके दिवशी तिची ऑडीशन घेतली आणि ते अचंबित झाले ! या मुलीचे नाव उमा देवी होय ….गाण्याचे वेड डोक्यात घेऊन आलेल्या उमादेवीच्या आयुष्यात पुढे अनेक चढउतार येऊन ती एक हसण्याजोगी बाब होणार आहे याचा तिला तिळमात्र अंदाज नव्हता. त्या दिवशी नौशादजींनी तिला ऐकले अन तिला पार्श्वगायनासाठी तत्काळ निवडले. तिची वर्णी इतरत्र लागू नये म्हणून नौशादजींनी ए. आर. कारदार यांना गळ घातली, नौशाद म्हणजे त्या काळाचे सर्वात मोठे संगीतकार असल्याने त्यांचा शब्व्द डावलणे अशक्य होते. तत्काळ उमादेवीची निवड शैलीदार सोनेरी आवाजाची गायिका म्हणून ए. आर.कारदार प्रॉडक्शन हाऊससाठी झाली, तिच्याशी करार केला गेला, तिचे मासिक वेतन ५०० रुपये ठरवले गेले. पण एक अट होती तिने ३ वर्षे दुसरया प्रॉडक्शन हाऊससाठी गायचे नाही. त्यांना गाण्यासाठी लगेच सिनेमे मिळाले दर्द, दिल्लगी, चांदनी रात, नाटक पैकी ‘दर्द’ मधील शकील बदायुनी यांनी लिहिलेलं’ अफसाना लिख रही हुं’ ने तिला रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आणले सुरैयाबरोबरचे ‘बेताब है दिले दर्द’ ने तिला आणखी प्रसिद्धी मिळाली. दर्द नंतर मेहबूब खानच्या ‘अनोखी अदा’ मधलं ‘काहे जिया डोले’ आणि ‘दिल को लगाके हमने कुछ भी न हमने पाया. ‘हे गाणंही हिट झालं. पण उमादेवी मात्र करारात बांधल्या गेल्या असल्यामुळे इतर संधींना मुकत गेल्या अन त्यांना हळूहळू गायकीसाठी इतर प्रॉडक्शन हाऊसची दारे जवळजवळ बंद झाली अन तिचे करारबद्ध प्रॉडक्शन हाऊसच शेवटी बंद पडले. अन उमा देवी गायिकेच्या भूमिकेतून स्ट्रगलरच्या फेऱ्यात अडकली. त्या कामासाठी फिरू लागल्या. त्या गव्हाळ वर्णाच्या, थोडीशी जाड अंगाची, किंचित बसक्या चणीची होत्या, दिसायला लाखात एक वगैरे अशी काही नव्हत्या पण ती अगदी जेमतेम सौंदर्यवती होती अशी बाब होती. गायकीत नाव झाले तरी हरकत नाही पण अपयशाचा शिक्का घेऊन गावाकडे तिला परत जायचे नव्हते. त्यामुळे गाण्यातील संधींनी तोंड फिरवल्यामुळे तिने अभिनयासाठी प्रयत्न सुरु केले, एखादा रोल मिळतो का यासाठी ती वेगवेगळ्या प्रॉडक्शन हाऊसचे उंबरठे झिझावू लागल्या. त्याचा गायकीचा प्रवास थांबला, नायिका होण्याचे स्वप्न भंगले अन ती बॉलीवूडची पहिली महिला कॉमेडीयन म्हणून नावारूपाला आली. १९५० मध्ये नौशाद यांचीच निर्मिती असलेला बाबुल हा सिनेमा सेट वर आला. या सिनेमातील नर्गिसच्या मैत्रिणीच्या – मुन्शीजीच्या मुलीच्या विनोदी भूमिकेसाठी तिला विचारणा झाली प्रेक्षकांनी या सिनेमातील उमादेवीच्या पात्रावरही प्रचंड कौतुकाचा वर्षाव केला, या पात्राचं नाव होतं टूनटून! हे नाव पुढे उमादेवीला आयुष्यभर चिकटले. त्यांची गायिका ही मूळ ओळख या सिनेमाने पुसून काढली अन टूनटून हे नाव जन्मास आले. जॉनी वॉकर, मेहमूद, धुमाळ, आगा, मुक्री, केष्टो मुखर्जी, भगवानदादा अशा अनेक कॉमेडीयन्स सोबत त्यांनी सिनेमे केले पण कधी कुणाशी नाव जोडू दिले नाही. टूनटून यांचा समाजावर इतका प्रभाव पडला की टूनटून या शब्दाचा अर्थच जाडी मुलगी असा होऊन गेला. टूनटूनने केलेल्या गुरुदत्तच्या आर-पार, मिस्टर और मिसेस फिफ्टी फाईव मधील आणि आबरू, एक राज, प्यासा, शराफत, दिल और मोहब्बत मधील भूमिका विशेष गाजल्या. १९५० ते १९६०च्या दशकातील ५० सिनेमात त्यांनी काम केलं. मा. उमादेवी उर्फ टूनटून यांचे २४ नोव्हेंबर २००३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. समीर गायकवाड / इंटरनेट
उमादेवी उर्फ टूनटून यांनी गायलेली काही गाणी
मेरी प्यारी पतंग
अफसाना लिख रही हुं
दिलवाले
Leave a Reply