नवीन लेखन...

केरनमधील लढाईचा संदेश

पोलिसांच्या हाती लागलेला अफझल उस्मानी हा इंडियन मुजाहिदिनशी संबंधित असलेला दहशतवादी नवी मुंबई पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार होण्यात यशस्वी झाला. उस्मानी याने पलायनानंतर इंडियन मुजाहिदीनच्या दहशतवाद्यांना हाताशी धरून भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणल्या तर त्याला जबाबदार कोण? मध्य प्रदेशमधील खांडवा जिल्हय़ातील तुरुंगातून ‘सिमी’ या दहशतवादी संघटनेचे सात दहशतवादी पळून गेले. सुरक्षा यंत्रणांचा हा हलगर्जी सामान्यांच्या जीवाला घातक ठरू शकतो.

जम्मू-काश्मीरच्या जम्मू भागातील केरन या गावात गेल्या आठवडाभरापासून घुसखोरी करून ठाण मांडून बसलेल्या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना शेवटी हुसकावून लावण्यात आले आहे. भारतीय लष्कराने विलक्षण संयमाने पार पाडलेली ही लष्करी मोहीम आता संपली आहे. लष्करप्रमुख बिक्रमसिंग यांनी ही घोषणा केली.

कारवाईमागे पाकिस्तानी लष्कराचा हात
काश्मीरध्ये ताबारेषेनजीक असलेल्या केरन टापूत घुसलेल्या दहशतवाद्यांच्या विरोधात गेले पंधरा दिवस चालू असलेली लष्करी कारवाई अखेर संपली आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे दहा हजार फूट उंचीवर असलेला हा पर्वतमय प्रदेश दहशतवाद्यांना अनुकूल असल्यानेच पंधरवडाभर ते लष्कराला झुंजवत राहिले. वेगवेगळ्या ठिकाणांहून दहशतवादी येत असल्याने घुसखोरीचा एक नवा ‘ पॅटर्न ‘ समोर आला. गेले पंधरा दिवस लष्कर एक छोटेखानी लढाई लढत होते. केरन टापूतच सोमवारी ‘ एके ४७ ‘ रायफलींसह शस्त्रास्त्रांचा मोठा साठाही जप्त करण्यात आला.

१९९९ मध्ये कारगिलमध्ये पाकिस्तानी सैनिकांनी घुसखोरी करून ठाणी ताब्यात घेतल्या होत्या. केरन टापूत गेल्या महिन्यांत तैनात सैन्याची बदली झाली. कुमाऊ पलटणीची जागा गुरखा पलटणीने घेतली. ही प्रक्रिया होत असताना ही घुसखोरी झाली.

या कारवाईमागे पाकिस्तानी लष्कराचा हात होता, ही गोष्ट निर्विवाद आहे. कारण केवळ एखादी दहशतवादी संघटना भारतीय लष्कराला अशा पद्धतीने आव्हान देण्याचे धाडस करू शकणार नाही. तसे तर पाकिस्तानी लष्करसुद्धा भारताला आव्हान देऊ शकत नाही आणि म्हणून तर पाकिस्तानची सेना भारताशी उघडउघड युद्ध पुकारण्याऐवजी अशा छुप्प्या कारवाया करत असते किंवा त्या करणार्‍या दहशतवादी संघटनांना सहकार्य करत असते, मदत करत असते. वेळप्रसंगी जवानांची कुमक देत असते, दारूगोळा पुरवत असते. म्हणजे दहशतवाद्यांनी केलेली कारवाई असल्याचे भासवून केलेला हा उपद्व्याप पाकिस्तानच्या लष्कराच्या मदतीनेच झालेला आहे. लष्करप्रमुखांनी तसे स्पष्टपणे म्हटले आहे. एरवीसुद्धा भारत-पाकिस्तान हद्दीतून भारतात घुसखोरी करणार्‍या दहशतवाद्यांना पाकिस्तानचे लष्कर मदत करत असतेच. जेव्हा हे दहशतवादी हद्दीवरच्या तारांचे कुंपण ओलांडून भारतात घुसखोरी करत असतात तेव्हा पाकिस्तानचे लष्कर गोळीबार करत असते. उद्देश एवढाच असतो की, या बेछूट गोळीबारामुळे सीमेवरच्या भारतीय जवानांचे लक्ष विचलित व्हावे आणि त्यामुळे घुसखोरांना भारतीय हद्दीत घुसणे सोपे जावे. हा नेहमीचाच प्रकार असतो. अशा वेळी भारतीय जवानांना त्या गोळीबारालाही उत्तर द्यावे लागते आणि घुसखोरी करणा-या दहशतवाद्यांनासुद्धा रोखावे लागते.

केरन भागामधील झालेली ही घुसखोरी अशाच पद्धतीने झालेली होती. या दहशतवाद्यांना पाकिस्तानी लष्कराने प्रशिक्षण दिले होते आणि त्यातील काही पाकिस्तानी जवानही होते. हा पाकिस्तानच्या सहभागाचा पुरावाच म्हणावा लागेल. अशी घुसखोरी करून भारताशी संबंध बिघडवत आहेत, हे तरी शरीफ यांना समजत होते की नाही आणि ते जर खरेच शरीफ असतील तर भारतीय जवानांनी ज्याप्रमाणे या दहशतवाद्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला तसा पाकिस्ताननेही त्यांच्या बाजूने करायला हवा होता.

देशाचे संरक्षणमंत्री अँटनी हे भले गृहस्थ आहेत, चारित्र्यवान आहेत ही बाब नक्कीच अभिमानास्पद. परंतु स्वत:च्या नैतिक चारित्र्याइतकेच ते देशाच्या सुरक्षेसही जपत आहेत का?. याउलट देशाच्या सीमांपेक्षाही आपल्या चारित्र्याचे जतन करणे हे अँटनी यांना अधिक महत्त्वाचे वाटते की काय, असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे. गेल्या काही महिन्यांतील घटना तेच दर्शवतात. अलीकडच्या काळात भारतीय लष्करावर पाकिस्तानी सैन्याकडून जे काही हल्ले झाले त्याची गंभीर दखल संरक्षणमंत्र्यांनी घेतल्याचे वृत्त आहे. पण म्हणजे काय? संरक्षणमंत्री गंभीर दखल घेऊन तितक्याच गांभीर्याने आपले कर्तव्य पाडतात काय, हा प्रश्न आहे. आपली प्रतिमा जपण्यापेक्षा लष्कराचे मनोधैर्य वाढेल, अशी खंबीर कृती त्यांनी करणे गरजेचे आहे. लष्कराचे रक्षण हीच आपली जबाबदारी आहे, हे अँटनी यांना सांगण्याची वेळ आली आहे. लष्कराचे आधुनिकीकरण अँटनीमुळे पूर्णपणे बंद पडले आहे.

आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांचा केंद्रबिंदू पाकिस्तान
पूँछमध्ये ५ ऑगस्ट रोजी घडलेल्या प्रसंगाने हल्ल्यास पार्श्वभूमी होती ती पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या न्यूयॉर्क येथे होऊ घातलेल्या चर्चेची. तो मुहूर्त साधून भारतीय लष्करावर हा हल्ला केला गेला. नेहमीप्रमाणे आपले सैनिक यात नाहीत असा दावा पाकिस्तानने केला. तो नेहमीप्रमाणेच असत्य होता. भारत आणि पाकिस्तान सीमेवरील हिरानगर परिसरात खोलवर घुसून पाकिस्तानी सैनिकांनी वा पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी आपण काय करू शकतो याची चुणूकच दाखवून दिली. केरनमधील संघर्षाची व्याप्ती कारगिलइतकी मोठी नव्ह्ती. केरनमधील ही धुमश्चक्री सुरू होत असताना अमेरिकेत भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या पंतप्रधानांची बैठक झाली होती. दोन्ही देशांत मैत्रीचे आणि शांततेचे संबंध निर्माण होण्यासाठी चर्चा करण्यावर उभय नेत्यांनी संमती दर्शविली. भारताला एकीकडे चर्चेत गुंतवून दुसरीकडे काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना फूस देण्याचे पाकिस्तानचे डावपेच काही नवीन नाहीत. भारताबरोबरील थेट युद्धांत पराभवच पत्करावा लागल्याने पाकने छुप्या युद्धाचा मार्ग अवलंबला त्यालाही आता दोन दशके लोटली आहेत. काश्मीरमधील फुटीरतावाद्यांना केवळ चिथावणीच न देता , त्यांना लष्करी प्रशिक्षण देण्याचे कारस्थान पाक गेल्या अनेक वर्षांपासून करतो आहे. आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांचा केंद्रबिंदू पाकिस्तानात आहे , हे भारत जगाला सांगतो आहे , पण त्याने फ़ारसा फ़रक पड्लेला नाही.अगदी ठरवून, विचार करून स्वीकृत केलेला मार्ग निश्‍चित झाला आहे. ‘ते’ आमच्या सैनिकांना मारणार आणि तरीही आम्ही चर्चा जारीच ठेवू. चर्चेचा उद्देश, त्याचा अजेंडा, त्यातून काय फलित होणार, पुढे काय होणार या केवळ गौण, दुय्यम बाबी आहेत. (काहीही झाले तरी) चर्चा सुरूच राहील.

दहशतवादी संघटना गैरफायदा घेतील
भारतात निवडणुकांचा हंगाम सुरू झाला आहे. येत्या महिन्यात पाच राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यानंतर चार-पाच महिन्यांनी लोकसभेची निवडणूक होईल. निवडणुकांच्या प्रचाराचा धुरळा जसा उडेल , तसा मतपेढ्यांच्या राजकारणालाही ऊत येईल. भारतविरोधी शक्ती दहशतवादी आणि पाकस्थित मूलतत्त्ववादी संघटना याचा गैरफायदा घेऊ शकतात. काश्मीरमध्ये घुसखोरी करून युद्धसदृश स्थिती ते निर्माण करू शकतात. त्याचबरोबर अफवा निर्माण करून जनभावना प्रक्षोभित करू शकतात. पाकिस्तानात नवाझ शरीफ यांच्या नेतृत्वाखाली लोकनियुक्त सरकार असले, तरी लष्कराची शक्ती कमी झालेली नाही. तेथील सत्तेचा ‘ रिमोट कंट्रोल ‘ अजूनही लष्कराच्याच ताब्यात आहे.. केरनमधील कारवाई १५ दिवसांनंतर संपली तरी पाकिस्तानी लष्कराने घुसखोरी करून कुरापत काढण्यासाठी काढलेली ही क्लृप्ती भारतीय लष्करासाठी, राजकारण्यांसाठी मोठा धडा आहे. भारताने आणि भारतीय लष्कराने अधिक सावध असणे आवश्यक आहे.. केरनमधील ताज्या लढाईचा हाच संदेश आहे.

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..