लक्ष्मीपूजन आटोपलं की दुसऱ्या दिवसापासून भटकंतीला निघण्याचा शिरस्ता आम्ही कसोशीने पाळतो. कृषी क्षेत्रातील कामाच्या निमित्ताने मी सतत देशभर भटकत असलो तरी आम्हा तिघांना एकत्र भटकंती करण्याची ही एकमेव संधी आम्ही कधीही सोडत नाही. या वर्षीच्या भटकंतीचा प्रारंभ झाला ‘आमंत्रण’ या कृषी पर्यटन केंद्राला भेट देऊन. पुणे व मुंबईपासून केवळ ९५ किमी अंतरावर असलेलं व सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं, जुन्नरपासून हाकेच्या अंतरावरील हे पर्यटन केंद्र ओझर व लेण्यान्द्री येथील गणपती व शिवनेरी किल्याच्या सानिध्यात शांतपणे पहुडलेलं आहे. मुंबई-पुण्याच्या प्रदूषित वातावरणापासून दूर जाऊन निसर्गाच्या सानिध्यात मोकळा व आरोग्यपूर्ण श्वास घ्यायचा असेल आणि आजच्या जगात अत्यंत दुर्मिळ झालेली निखळ शांतता अनुभवायची असेल तर निसर्गाचं हे ‘आमंत्रण’ अवश्य स्वीकारा! शहनाईच्या पार्श्वभूमीवर पाकळ्यांच्या वर्षावात व पंचारती ओवाळून होणारं पर्यटकांचं देवदुर्लभ स्वागत त्यांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातं. नक्षत्रवन, सुगंधी व औषधी वनस्पती, अस्सल देशी बियाण्यांपासून लागवड केलेली विविध पिके, फुलझाडे व फळझाडांची ओळख करून देण्यासाठी अफाट उत्साहाचा धबधबा असलेले आमंत्रणचे संचालक श्री. शशिकांत जाधव आपल्यासोबत असतात. त्यांच्या सानिध्यात या परिसराची भटकंती हे केवळ पर्यटन नसून एक चालता-बोलता संस्कार वर्ग कसा आहे याचा प्रत्यक्ष अनुभव एकदा तरी घ्यायलाच हवा. दमछाक झाल्यानंतर सौ. कविता जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी तयार केलेल्या सुग्रास भोजनाचा आनंद घेऊन बांबूच्या बनातील गर्द सावलीत थंडगार वाऱ्याच्या लाटांवर स्वतःला झोकून देत एक झकास डुलकी घ्यावी आणि जाग आल्यानंतर मसालेदार चहाचे घोट घेत काव्य-शास्त्र-विनोदाची मैफल जमवावी. ज्यांना धांगडधिंगा, डी.जे., वॉटर स्पोर्ट्स या गोष्टींची आवड आहे त्यांनी ‘आमंत्रण’च्या वाटेला जाऊ नये. पण ज्यांना आयुष्यातील मोलाचे क्षण शुध्द प्राणवायूने भरलेल्या शांततेत व्यतीत करायचे असतील त्यांनी मात्र ‘आमंत्रण’ला विसरू नये !
पर्यटकांच्या माहितीसाठी :
आमंत्रण कृषि पर्यटन केंद्र, गोळेगाव, ता : जुन्नर, जि : पुणे.
संपर्क : श्री. शशिकांत जाधव : 99700 56412
ई.मेल : jadhavshashikant778@gmail.com
वेबसाईट : www.aamantranagritourism.com
यूट्यूबवर व्हिडिओ : Aamantran agri tourism
श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.com
Leave a Reply