चरबी वाढणे, कोलेस्टेरॉल वाढणे आणि त्यातून उद्भवू शकणारा हृदयविकार- हा संबंध सर्वानाच माहिती असतो. परंतु कोलेस्टेरॉल वाढणे केवळ आहाराशीच संबंधित नाही. कोलेस्टेरॉल शरीरात नेमके काय करते, चांगले आणि वाईट कोलेस्टेरॉलचे कोडे काय आहे आणि वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी मानसिक स्वास्थ्य, संतुलित आहार व व्यायाम ही त्रीसूत्रीच कशी उपयोगी ठरते. आपल्या शरीरामधील जैवरासायनिक प्रक्रियांमधूनच कोलेस्टेरॉलची निर्मिती होते. रक्तामधील साखरेपासून बहुतांशी कोलेस्टेरॉल बनते. कोलेस्टेरॉलपासून अत्यंत महत्त्वाच्या संप्रेरकांची निर्मिती होत असते. म्हणूनच या गटामधील ‘हॉर्मोन्स’ना ‘स्टेरॉइड्स’ म्हणून संबोधले जाते. या स्टेरॉइड हॉर्मोन्समध्ेय टेस्टॉस्टेरोन, प्रोगेस्टेटोन, अल्डोस्टेरॉन, इस्ट्राडीऑल आणि कॉर्टिसॉल या हॉर्मोन्सचा समावेश होतो. शरीराच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या हॉर्मोन्सची निर्मिती कोलेस्टेरॉलपासून होत असल्यामुळे हा पदार्थ म्हणजे काही घातक, विषारी अथवा टाकाऊ नाही.
कोलेस्टेरॉलचे ढोबळ मानाने दोन प्रकार आहेत. हलके कोलेस्टेरॉल म्हणजे ‘एल.डी.एल.’ या कोलेस्टेरॉलचे रक्तातील प्रमाण वाढल्यास रक्त वाहिन्यांवर पुटे चढल्यामुळे त्या अरुंद होऊन उच्च रक्त दाब आणि हृदयविकाराचा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच याला ‘बॅड कोलेस्टेरॉल’ म्हणतात. जड कोलेस्टेरॉल म्हणजे एच.डी.एल. हे हलक्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करून रक्त वाहिन्यांवर थर बसवण्याच्या प्रक्रियेमध्ये खीळ घालते. म्हणून त्याला ‘गुड कोलेस्टेरॉल’ म्हटले जाते. वाईट कोलेस्टेरॉलचे वाढलेले प्रमाण कमी केले तर हृदयविकारापासून प्रतिबंध होतो. म्हणूनच ‘स्टॅटिन’ प्रकारात मोडणारी औषधे खूप लोकप्रिय आहेत. आहारातील स्निघ्ध पदार्थाचे प्रमाण २५ टक्क्य़ांपेक्षा जास्त नसेल तर शरीरातील कोलेस्टेरॉलच्या प्रमाणावर विपरीत परिणाम होत नाही. सोयाबीन तेल वापरावे की शेंगदाणा तेल, खोबरेल तेल वापरावे की ऑलिव्ह तेल या संभ्रमाचा खरे तर रक्तामधील कोलेस्टेरॉलच्या प्रमाणाशी फारसा संबंध नाही. चरबीयुक्त मांसाहार टाळणे व तळलेल्या पदार्थाचे प्रमाण कमी करणे हे निश्चितपणे आरोग्यदायी असले तरीही आहार व कोलेस्टेरॉल यांचा संबंध मर्यादित आहे.
रक्तामधील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढण्यात आहारापेक्षा आपल्या शरीरामधील जैवरासायनिक प्रक्रियांचा वाटा मोठा आहे. डॉ. हेगडे यांच्या मते अगदी गवत खाऊन राहिले तरी दहा टक्क्य़ांपेक्षा कोलेस्टेरॉल कमी होणार नाही. कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यासाठी संतुलित आहार, व्यायाम आणि आरोग्यदायी जीवनशैली या सगळ्याची आवश्यकता आहे. आहारामध्ये मोठे बदल करून किंवा औषधांनी कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करून जर हृदयविकाराच्या धोक्यावर फार मोठे दूरगामी फायदे दिसत नसतील तर काय करावे, या प्रश्नाचे उत्तर आपल्या मनामध्ये मिळते. मानसिक शांतता आणि कोलेस्टेरॉल यांचा जवळचा संबंध आहे. कॉर्टीसॉल हे हॉर्मोन कोलेस्टेरॉलपासून बनते. कॉर्टीसॉल आणि मानसिक ताण यांचा जवळचा संबंध असतो. तणावाखाली असलेल्या मेंदूकडून पिटय़ुटरी ग्रंथींना संदेश जातो आणि नंतर अॅडरेनल ग्रंथींना कॉर्टीसॉल तयार करण्याचा संदेश मिळतो. मात्र अधिक कॉर्टीसॉलमुळे मानसिक ताण वाढतो की वाढलेल्या तणावामुळे कॉर्टीसॉलची निर्मिती होते, हे कोडे ‘आधी कोंबडी की आधी अंडे’ याप्रमाणेच आहे! परंतु उत्तम मानसिक स्वास्थ्य, संतुलित आहार व व्यायाम या त्रीसूत्रीमध्येच कोलेस्टेरॉल संतुलनाची गुरुकिल्ली आहे, हे मात्र निश्चित!
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
Leave a Reply