नवीन लेखन...

क्रीडाविश्वाचे ऐतिहासिक सीमोल्लंघन !



लगान, चक दे इंडिया यासारख्या जोशभर्‍या चित्रपटातील रोमांच प्रत्यक्षात यावेत आणि अंगावर शहारे उमटावेत असंच काहीसं दिल्लीमध्ये राष्ट्रकुल स्पर्धांच्या निमित्ताने अनुभवायला मिळालं. नकारात्मक प्रचाराकडून अभूतपर्व ऐतिहासिक यशाच्या दिशेने वाटचाल करणारी या स्पर्धेची यशोगाथा एखाद्या चित्रपटाला साजेशी होती. या स्पर्धेमुळे भारताने क्रीडा महासत्ता बनण्याच्या दिशेने कूच केली असल्याचे जगाला पहायला मिळाले.

अद्भूत, अवर्णनीय उद्घाटनापासून राजधानी दिल्लीत सुरू झालेला जल्लोष अजूनही देशभरात सुरू आहे. दसर्‍यापूर्वीच आपल्या खेळाडूंनी विक्रमी सोने लुटून राष्ट्रकुलाचे मैदान दणाणून सोडले होते. मैदानात यशस्वी ठरलेल्या भारताला मैदानाबाहेरही अपूर्व यश मिळवता आले. भ्रष्टाचार, असुविधांच्या दलदलातून दिल्ली स्पर्धेने मोठी झेप घेतली आणि चमत्कार वाटावा असा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा क्रीडा कुंभमेळा राजधानीत संपन्न झाला. आता ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारतीय क्रीडापटूंचा ठसा उमटला तर अवघे जग भारताचे क्रीडाक्षेत्रातले नवसामर्थ्य मान्य करेल. राष्ट्रकुल स्पर्धेतील विजयश्री ही त्या दिशेने झालेली सकारात्मक सुरुवात आहे.

भारताने १९५२ मध्ये पहिल्या आशियाई स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते. पंडित नेहरूंच्या या निर्णयामुळे संपूर्ण आशिया खंडात सलोखा वाढण्यात मोठी मदत झाली होती. त्याकाळच्या क्रीडासंघटक सोधी यांनी देशाची क्रीडाप्रतिमा उंचावण्यासाठी एशियाड क्रीडामहोत्सवाची मुहूर्तमेढ आपल्या देशात रोवली होती. त्या काळी पैशासाठी अशा स्पर्धा आयोजित केल्या जात नव्हत्याच.

भारताची प्रगती जगाने पहावी, मानवतेचा संदेश हिंदूस्थानमधून जावा ही शुभकामना होती. त्यानंतर झालेल्या नवव्या स्पर्धेतही भारताची प्रतिमा उजळली होती. इंदिरा गांधी यांनी वडिलांप्रमाणेच स्पर्धेचा घाट घातला आणि राजीव गांधी यांनी जातीने लक्ष घालून तो यशस्वी केला. भारतीय क्रीडाक्षेत्राला या स्पर्धेने नवा आयाम दिला. नंतरच्या काळात क्रिकेटची अशी काही लाट आली की लोक ऑलिम्पिक खेळ विसरून गेले होते.

२१ व्या शतकात महासत्ता होण्याची स्वप्ने रंगवणार्‍या भारताला क्रीडाक्षेत्रातही एका ब्रेकची गरज होती. ती

राष्ट्रकुल स्पर्धेने पूर्ण केली. ताज्या राष्ट्रकुल स्पर्धेने भारत क्रिकेटव्यतिरिक्त इतर खेळांमध्येही श्रेष्ठ असल्याने सिद्ध झाले आहे. त्यामुळे देशात एक नवे क्रीडापर्व अवतरले आहे.

ही राष्ट्रकुल स्पर्धा भारतासाठी क्रीडापर्वणीच ठरली. या स्पर्धेच्या निमित्ताने जागतिक दर्जाच्या अनेक भव्य स्टेडियम्सची उभारणी दिल्लीमध्ये झाली. तालकटोरा स्टेडियमधील नयनरम्य जलतरण तलाव असो वा सिरी फोर्टमधील विशाल बॅडमिटन हॉल, लाखो भारतीयांनी ऑलिम्पिक स्पर्धेचा अनोखा आनंद येथे बसून घेतला. आता आशियाई आणि ऑलिम्पिक स्पर्धेसाठी सीमोल्लंघन करायचे तर हीच भारताची शिदोरी ठरेल. जगातील कोणतीही स्पर्धा यशस्वीपणे भरवण्यास भारत तयार झाला आहे. भविष्यात जागतिक अॅथलेटिक्स, जलतरण, बॅडमिटन स्पर्धा होतील तेव्हा राष्ट्रकुल स्पर्धेच्या निमित्ताने भारताने किती मोठी मजल मारली हेच समजून येईल.

कोणत्याही स्पर्धेचे यशापयश मैदानापेक्षा मैदानाबाहेर निश्चित होते. याबाबतही दिल्ली मागे राहिलेली नाही. आता दिल्लीत स्पर्धा होणारच नाही अशी बोंबाबोब सार्‍या जगात झाली असतानाही जगभरातील खेळाडू, क्रीडासंघटकांनी अद्भूत यश संपादन करण्याचा अनुभव दिल्लीच्या दोन आठवड्यांच्या मुक्कामात घेतला. गांधीजयंतीच्या पूर्वसंध्येपर्यंत स्पर्धेबाबत शंकांचे दाट धुके पसरली होते. ३ ऑक्टोबरच्या संध्याकाळी एरोस्टेट हा भव्य जादूमय स्क्रीनचा फुगा आकाशी झेपावला तेव्हापासूनच दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेनेही यशस्वी भरारी घेतली. स्पर्धेमुळे भारताला मान खाली घालावी लागेल असे म्हणत असणारे एरोस्टेटच्या भरारीने चकित झाले. यामुळे भारतावर सतत टीका करणार्‍या ऑस्ट्रेलियन पत्रकारांनाही ‘भारताने करिश्मा घडवला’ असेच लिहावे लागेल.

स्पर्धा उंबरठ्यावर असतानाच तब्बल १७ हजार कोटींचा भ्रष्टाचार उघडकीस आला, स्टेडियम पूर्ण नाहीत, अशी ओरड सुरू झाली. त्यातच अॅथलेटिक्स स्टेडियमजवळील पदचारी पूल पडला. आता स्पर्धा होणे अवघड असल्याचे वातावरण निर्माण झाले असताना पंतप्रधान मनमोहन सिग यांनी सारी सूत्रे आपल्या हाती घेतली. सारी उदासीन यंत्रणा दिवसरात्र कामाला लागली. देशाच्या इभ्रतीचा प्रश्न असल्याने सोनिया गांधीही पडद्यामागून सूत्र हलवत राहिल्या. यामुळेच दिल्ली हसताना दिसली. सुरेश कलमाडींपेक्षा मनमोहन सिग यांनी धडपड केल्यामुळेच हे सारे घडू शकले. भारत क्रीडा महासत्ता बनण्याच्या दिशेने यशस्वी पाऊल टाकू शकला.

मैदानाबाहेर यशाचे झेंडे फडकवल्यानंतर मैदानातही तिरंगा सर्वोच्च स्थानी रहावा यासाठी आपल्या क्रीडावीरांनी शर्थ केली. पदकांचे शतक करण्याचे लक्ष्य पूर्ण करत स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरीची सीमाही भारताने पार केली. हे यश सहजासहजी मिळाले नव्हते. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडाशी चिवट झुंज देत भारताने नेमबाजी, कुस्ती, तिरंदाजी, हॉकी, बॅडमिटनचे मैदान गाजवले होते. गगन नारंगने सर्वाधिक चार सुवर्ण चौकार मारण्याचा पराक्रम केला. त्याने विश्वविक्रमी वेध घेत स्पर्धेची उंची वाढवली. विश्वविजेत्या सुशिलकुमारने चितपट कुस्ती करत भारतीय कुस्तीकलेची जादू जगाला दाखवली. चूल आणि मूल ही चौकट मोडून भारतीय महिलांनी स्पर्धेत पुरूषांपेक्षा अधिक यश मिळवत स्पर्धा स्मरणीय केली. तिरंदाजी, कुस्ती, अॅथलेटिक्समध्ये भारतीय नवदुर्गांनी सोनेरी यशाचे सीमोल्लंघन करून महिलाशक्तीचा जयघोष कायम राखला.

दिल्लीच्या २५ हजार स्वयंसेवकांनी स्पर्धा यशस्वी होण्यात मोलाचा वाटा उचलला. भारतीय युवाशक्तीचा हा गौरव जगाने पाहिला. दिल्लीतील क्रीडारसिकांनी घरच्या सीमा ओलांडून ‘कम आऊट अॅन्ड प्ले’ हे घोषवाक्य प्रत्यक्षात उतरवले. लाखो क्रीडाशौकिनांनी दिल्ली स्पर्धेचा आनंद लुटला. स्टेडियममध्ये कोणताही सेलिब्रिटी नसताना, स्पर्धेसाठी चित्रपटतील ब्रँड अॅम्बेसिडर आला नसतानाही लाखो लोक सलग पाच दिवस ऑलिम्पिक खेळांचा आस्वाद घेण्यासाठी घराबाहेर पडले. हादेखील स्पर्धेच्या इतिहासातील विक्रम होता. यापूर्वी हॉकी, बॅडमिटन, कुस्ती सामन्यांना इतका अभूतपूर्व प्रतिसाद कधीच मिळाला नव्हता. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनीही प्रेक्षक गॅलरीत बसून खेळाचा आनंद घेतला. हेदेखील स्पर्धेचे वेगळेपण ठरले.

स्पर्धेने दिल्लीचा चेहरामोहरा बदलून टाकला. राष्ट्रकुलमुळे जगाला दिल्लीची एक आधुनिक शहर अशी ओळख झाली.

मेट्रो, एससी बसेस, चकाचक रस्ते, चोहीकडे वृक्षवल्ली अशी देखणी दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेमुळे पाहण्यास मिळाली. ‘स्लमडॉग मिलेनिअर’मध्ये दाखवलेला

भारत हा पडद्यावरच आहे. श्रीमंत नसला तरी तो संपन्न असल्याचे राष्ट्रकुल स्पर्धांनी अधोरेखित केले. भारतीय क्रीडाविश्वाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन जन्माला आला आहे. आता आपले क्रीडावीर आशियाई स्पर्धा, ऑलिम्पिकमध्येही विक्रमी सोने लुटतील असा विश्वास मिळाला आहे. स्पर्धा संपली असली तरी नव्या सीमोल्लंघनामुळे ही केवळ नांदी ठरत आहे. भारतीय क्रीडाक्षेत्र अटकेपार झेंडा फडकवण्याचा जल्लोष करत आहे. आता ऑलिम्पिकमध्ये भारत डझनभर पदक जिकताना दिसेल तेव्हा आजच्या या क्रीडा सीमोल्लंघनाचे महत्त्व सार्‍या जगाला पटलेले असेल!

(अद्वैत फीचर्स)

— संजय दुधाणे, नवी दिल्ली

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..