तत्कालीन पारसी समाजाचे प्रमुख शेट करसेटजी माणेकजी यांचे स्मारक भायखळा पश्चिम येथील वाय ब्रिजजवळ अग्निशमन दलाच्या केंद्रासमोर १८७५ मध्ये उभारण्यात आले. प्रथम श्रेणी दर्जाचे हे स्मारक कालांतराने ‘खडा पारसी’ म्हणून ओळखले जाऊ लागले. परंतु शहराची ओळख ठरलेल्या या स्मारकाची गेल्या काही वर्षांमध्ये दुरवस्था झाली.
या स्मारकाचे चार मोठे दिवे, चार अतिरिक्त दिवे कारंजाच्या पायापासून नाहीसे झाले होते. त्याचबरोबर तळाशी असणारे कारंजे सभोवतालच्या पदपथामध्ये बुजले गेले. या दुरवस्थेमुळे खडा पारसीच्या सौंदर्यीकरणाचे काम पालिकेने हाती घेतले. मात्र स्मारकाच्या भोवती उड्डाणपूल आल्याने हे स्मारक अन्यत्र हलविण्याचा विचार सुरू होता. त्यामुळे या स्मारकाचे अनावरण लांबणीवर पडले.
खडा पारसीच्या सौंदर्यीकरणासाठी तब्बल १ कोटी ३0 लाख रुपये खर्च करण्यात आला. सहा महिन्यांत अपेक्षित असलेल्या या सौंदर्यीकरणाच्या कामाला १८ महिने लागले. २६ मार्च २0१४ रोजी या स्मारकाचे काम पूर्ण झाले. सौंदर्यीकरणासाठी गेले दीड वर्ष झाकून ठेवलेल्या या प्रसिद्ध खडा पारसी पुतळ्यावरील पडदा अखेर दूर होत आहे. त्यामुळे दीडशे वर्षे जुने प्रथम श्रेणीतील हे ऐतिहासिक स्मारक पुन्हा एकदा मुंबईची ओळख ठरणार आहे.
खडा पारसीचा इतिहास
शेट करसेटजी माणेकजी (१७६३-१८४५) हे तत्कालीन पारसी समाजाचे प्रमुख म्हणून ओळखले जात. त्यांचे पुत्र तसेच न्यायमूर्ती माणेकजी करसेटजी यांनी २0 हजार रुपये खर्च करून आपल्या वडिलांचे स्मारक उभारले. हे स्मारक खडा पारसी म्हणून ओळखले जाते. दीडशे वर्षे पुरातन असलेले हे स्मारक ब्रांझ या धातूपासून तयार केले आहे.
— चंद्रेश कदम
Leave a Reply