“100 पैकी 100 मार्क मिळाले तरंच पास, नाहीतर नापास.” हे ऐकताच मुले गारठली. त्यांचे चेहरे पांढरे फटक पडले. घशाला कोरड पडली. काही मुलांचे पाय भीतीने लटलटू लागले.
मुख्याध्यापकांनी प्रश्नपत्रीका व उत्तरपत्रीका मुलांना दिल्या व ते फळ्याकडे पाठ करुन, मुलांकडे पाहात खूर्चिवर बसले.
रैनाने हळूच डाव्या हाताची मूठ उजव्या हाताच्या तळहातावर घासत इशारा केला. खिशीफिशी हसत “ते “आलं. रैना त्याला म्हणालि,“अरे आता आम्हा सगळ्यांनाच मदत कर. नाहीतर आमची घरी धुलाईच होईल.” ते खुसफुसलं,“ओके..बोके..पक्के.. काम शंभर टक्के”
मुख्याध्यापकांच्या मागे मोठा काळा फळा होता. त्या फळ्याचा टीव्ही झाला. आणि आवाज आला,“गणित क्रमांक 1 पाहा आणि लिहा.”
हे पाहून व ऐकून वर्गातली मुले घाबरुन किंचाळणारच होती. पण कुणाच्याच तोंडातून आवाज फुटला नाही. मुलांनी फळ्यावरच्या टीव्हीत पाहून पहिले गणित भराभर सोडविले.
मुख्याध्यापकांनी चमकून मागे पाहिले,पण त्यांना फक्त काळा फळाच दिसला. ते वैतागून ओरडले,“माझ्याकडे पाहात काय लिहिताय? खाली पाहून लिहा? माझ्या मिशांना का लिंबं लागलीयेत?”
आणि खरंच, त्यांच्या मिशीवर दोन लिंबं तरंगू लागली. नाकाच्या शेंड्यावर एक लिंबू गरगर फिरू लागलं. हे पाहून मुले हसत म्हणाली,“सऽऽर लिंबूऽऽऽऽ, सऽऽऽर लिंबूऽऽ”
दोन्ही हात वर करत त्यांनी विचारलं,“कुठायत?”
पुन्हा चमत्कार.. त्यांच्या दहा बोटांबर दहा लिंबं नाचू लागली, इकडून तिकडे पळू लागलि. सरांनी घाबरुन हात झटकले. पण लिंबं मात्र तिथेच. 49 लिंबं जमिनीवर न पडता,
मुख्याध्यापकांच्या अंगावर पळापळी, पकडापकडी खेळू लागली. त्यांच्या डोक्यावर आणि पोटावर टणाटण उड्या मारू लागली.
मुले जोरात खुसफुसली,“सर, नाकावर लिंबू. कानावर लिंबू.
सर मिशीत लिंबू. डोक्यावर लिंबू.
सर हातावर लिंबू. पायावर लिंबू.
सर बोटांवर लिंबू. पोटावर लिंबू.
लिंबू टिंबू.
टिंबू लिंबू.”
मुले हसून हसून बेजार झाली. काही मुले हसता हसता बाकावरुन खालि घसरली.
मुख्याध्यापक गडबडले.नाकावरची, पोटावरची, मिशीतली, कुशीतली आणि हातावरची व पायावरची लिंबं खाली पडावीत म्हणून ते वेड्यावाकड्या उड्या मारत, हातवारे करत लिंबू डान्स करू लागले. थयथयाट करू लागले.
“हा काय विचित्र प्रकार? ही काही भुताटकी तर नाही ना? या लिंबांना वेड लागलंय कि मला? ही खालि का पडत नाहीत?” मुख्याध्यापक चाचरत म्हणाले.
“ तुम्ही बघताय काय माझ्याकडे? आधी खाली पाहात गणितं करा. नाहितर नापास करुन टाकीन सगळ्यांना.”ते वैतागून मुलांवर ओरडले.
मुलांनी पटकन माना खाली घातल्या आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. अतिशय सुंदर अक्षरात सर्व मुलांनी, सर्व गणिते सोडविलेला पेपर तयार होता!
मुले आनंदाने टाळ्या वाजवत ओरडली,“सर झाऽऽऽला पेपर.”
आणि त्याक्षणी.. ..चमत्कार झाला.. ..
सगळी लिंबं गायब झाली.
मुख्याध्यापकांना वाटलं आपल्याला भास झाला की काय? त्यांनी हळूच मिशीवरुन, पोटावरुन हात फिरवला, नाक चोळलं पण त्यांना कुठेच लिंबं आढळली नाहीत.
मुलांचे सुंदर अक्षरातले पेपर पाहून मुख्याध्यापक खूश होऊन म्हणाले,“व्वा! काय वळणदार अक्षर! व्वा काय टापटीप! व्वा व्वा सगळी गणितं बरोबर!! व्वा व्वा व्वा, माझ्या समोरची ही मुले आहेतच हुशार!!”
इतक्यात त्यांच्या मागून एक गुळगुळीत आवाज आला.“मी पण आहे की होऽऽऽ तुमच्या वर्गात..”
मुख्याध्यापकांनी दचकून मागे वळून पाहिलं. पण तिथे कुणीच नव्हतं.
मुलांकडे पाहात ते म्हणाले,“व्वा लेखी परीक्षा तर छान झाली. पण अजून तोंडी परीक्षा बाकी आहे. आणि जोशी सरांबरोबर मी ही येणार आहे.”
मुख्याध्यापक तरातरा निघून गेले. मुले भिऊन बसून होती.
दुपारच्या सुटीत मुले जाम टेन्शन मधे होती. कारण आता तोंडी परीक्षेला जोशी सर आणि स्वत: मुख्याध्यापक पण येणार. लेखी परीक्षेला कसा कुणास ठाऊक पण चमत्कार झाला आणि जीव वाचला. पण आता तोंडी परीक्षेला काय होणार?
मुलांनी दुपारचे डबे आणले होते. पण कुणालाच जेवायचि इच्छा होईना. सगळ्यांना एकच चिंता.. आता तोंडी परीक्षेला नापास झालो तर काय करायचं?
रैना सगळ्यांना म्हणाली,“अरे आधी आपण डबा खाऊया मग काय करायचं ते ठरवूया.” कपाळावर हात मारत प्रिया म्हणाली,“आता काय ठरवायचं? नापास झालो तर शाळा सोडावी लागेल. या मुख्याध्यापकांचि कमालच आहे. माझी तर आता काही खाण्याची इच्छाच गेलीय.” बाकीची मुलं पण तसंच म्हणू लागली. सगळी मुले गोलात बसली होती. मध्यभागी सगळ्यांचे डबे. नेहमी ही मुले अंगत पंगत करत खातात. आज मात्र सगळ्या मुलांचि तोंडं भुकेने सुकलेली आणि मधे बंद डबे.
रैनाने हळूच डाव्या हाताची मूठ घट्ट बंद केली. उजव्या हाताच्या तळहातावर डाव्या हाताची मूठ ठेवली. उजव्या हाताच्या चार बोटांनी ही मूठ पकडली पण अंगठा मात्र सरळ ठेवला.
मग डोळे बंद करुन मुठीमधे तीन वेळा फुंक मारत, दोन वेळा हळूच म्हणाली,“प्रेऽऽऽमळ भूऽऽत.. .. प्रेऽऽऽमळ भूऽऽत”
त्याक्षणी रैनाच्या मानेवरुन एक बर्फाचा खडा घरंगळत गेला.
आणि खिशिफिशी हसत प्रेमळ भूत म्हणालं,“बोल रैना तुला काय मदत करू? गरम होत असेल तर या सर्व मुलांना हिमालयातल्या बर्फात बुडवू? की सगळ्या वर्गात काठोकाठ खचाखच बर्फ भरुन टाकू?”
“असलं काही नको रे भुता.” असं म्हणत, मग रैनाने मनातल्या मनात प्रेमळ भुताला सगळं सांगितलं. आणि पुढे म्हणाली “आता तूच या मुलांना मदत कर.”
“ओके..बोके..पक्के.. काम शंभर टक्के” प्रेमळ भूत खुसफूसलं.
आणि अचानक डब्यांची झाकणं थरथरू लागली. अलगद थोडी वर उचलली गेली. डब्यातून गरमागरम पाव-भाजी, मसाला ऑम्लेट, बटाटे वडे, कांदा भजी, जिलेबी यांचा घमघमाट येऊ लागला. काहींच्या डब्यातून आम्रखंड, गुलाबजाम, पुरणपोळ्या बाहेर डोकावू लागल्या.
Leave a Reply