मी माझ्या नातवाला घेऊन मित्र गणपत पवार याचेकडे गेलो होतो. त्याचा नातू माझ्या नातवाशी समवयाचा. दोघेही एकाच कक्षेत शिकणारे. आम्ही दोघे मोठ्या झोपाळ्यावर गप्पा मारीत बसलो. समोर बागेत दोन्ही नातवंडे खेळत होती. अचानक आमचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. ते त्यांच्या भांडणामुळे. दोघेही हामरी तुमरीवर येऊन वाद विवाद व त्यांत मारामारी करु लागले. गणपत बेचैन झाला. तो लगेच उठून त्यांना आवरण्यासाठी जाऊ लागला. पण मी त्याला रोकले. ” आरे जाऊ दे . मुले आहेत ती. भांडू देत त्याना. थोडीशी मस्ती करतील व शांत होतील. सार विसरतील व पुन्हा खेळतील. ” तो हसला. जवळ येऊन बसला. थोड्या वेळाने जे घडले, त्यानी आम्ही चकीत झालो. गणपतच्या नातवाने माझ्या नातवाला दोन टोले लगावले. खाली पाडले. तसे दोघेही रडत होते.
गणपत मोठ्याने हासू लागला. थोडासा अहं भाव वा फुशारकी त्याच्यां चेहऱ्यावर मला जाणवली. “बघ साला नातू कुणाचा आहे. शेर का बच्चा. लेचापेचा नाही ये.” तो जरा जास्तच हासला. “आखेर खानदानी आहे तो. “माझ्याशी टाळी देत उत्तरला.
मी त्या प्रसंगाचा विचार करु लागलो. त्याच बरोबर त्याच्या “खानदानी” ह्या उपाधीवर दिलेला जोराचा, पण विचार करुं लागलो. कारण त्या समवयी नातवांत शक्ती, युक्ती पेक्षा त्याची आक्रमकता हा गुणधर्म उठून दिसला होता. ज्याने त्याला वेगळेच दालन मिळवून दिले होते.
सिडने-ब्रेनर हा आफ्रिकन विद्वान विचारक. वैद्यकीय क्षेत्रातला शास्त्रज्ञ. त्याला नुकताच 2004 सालचा सर्वश्रेष्ठ नोबेल पुरस्कार मिळाला. त्याचा विषय होता जेनेटिक्स ( Genetics). तसा हा अत्यंत अवघड विषय. निसर्गातील सजीवांच्या प्रकृतीसंबंधीची मुलभूत तत्वे त्यानी शोधली. प्राणी वा व्यक्ती ह्यांची स्वभाव धारणा ह्याचाच जणू त्यानी सिद्धांत मांडला. व्यक्तीच्या आक्रमकता वा बचावात्मक पैलूवर प्रकाश पाडला.
गम्मत म्हणजे त्याच्या ह्या वैचारीक धारणेला त्याने बाल वयांतच त्याची झलक दाखविली होती. एक विचार, एक शंका त्याच्या शाळकरी विद्यार्थी दशेतील मनांत डोकावली. आणि ते रुजले गेलेले बीज पुढे फोफावत, त्याचा प्रचंड वृक्ष झाला. ज्याला नोबेल पारितोषकचे फळ लागले.
शाळकरी वयांत असताना सिडने ब्रेनरने एक चित्र बघीतले. एक भली मोठी, सशक्त गाय दाखविली गेली, जीला मोठी अनकुचीदार अशी शींगे होती. ती वेगाने धावत होती. त्याचवेळी तीच्यावर एक रोड, हडकुळा, किरकोळ प्रकृतीचा वाघ तुटून पडला होता. वाघ छलांग मारुन तीच्या मानगुटीवर आरुढ होण्याचा प्रयत्न करीत होता. हे एक नैसर्गिक सत्यावर आधारलेले चित्रण होते. परंतु सिडने ब्रेनर साशंक होता. गाय सशक्त, मोठी, अनकुचीदार मोठी शींगे बाळगुण असलेली, परंतु भित्री आहे, असे त्याला वाटले. वाघ चपळ व आक्रमक होता. त्याने त्याच्या शिक्षकाला प्रश्न केला. “ही एवढी सशक्त मोठी गाय. कां भिते ती त्या किरकोळ वाघाला.? कां ती संघर्ष करुन त्या वाघावरच तुटून पडत नाही.? कदाचित् वाघ हरेलही”
शिक्षक म्हणाले “तुझा विचार तर्कला धरुन आहे. परंतु येथे शक्ती, युक्ती पेक्षा प्रकृती श्रेष्ठ ठरते. हा निसर्ग होय” आणि त्या क्षणापासून सिडने ब्रेनर “प्रकृती च्या अर्थात निसर्गाच्या मुळ धाग्याच्या रचनेकडे” वळला.
महाभारतामधील एक प्रसंग. कर्ण ब्राह्मणाचे रुप घेऊन, गुरु परशुराम यांच्याकडे शिक्षण घेत होता. एके दिवशी कर्णाच्या मांडीचा आसरा घेत गुरु विश्रांती घेत होते. एका भुंग्याने कर्णाची मांडी चाऊन त्याला रक्तबंबाळ केले. कर्ण तटस्थ बसला. हालचाल केली नाही. कारण त्यामुळे परशुरामाची झोप मोड झाली असती. नंतर परशुरामाला उठताच हे कळले. त्यांचा तर्क बरोबर निघाला. कर्ण ब्राह्मण नाही. तो क्षत्रीय आहे. कारण त्याची सहनशिलता ही क्षत्रीयाची होती.
प्रकृती अर्थात स्वभाव ठेवन ही भिन्न भिन्न असते. सारे तेच. रक्त, मास, हाडे, कातडे. परंतु प्रत्येकामधल्या नैसर्गिक चेतना निराळ्या. त्यालाच सामान्यासाठी “जेनेटिक्स.” (Genetics) म्हणता येईल. रक्तामधला एक अत्यंत मुलभूत प्रकार “जीन्स ” असतो. शरीर मन बुद्धी ह्या धारणेच्या सर्व हालचालीवर ताबा मिळविणारा.
माणसाची शक्ती, युक्ती बुद्धीमत्ता ज्ञान समज इत्यादीच्या संकल्पना वेगळ्या असतात. ज्यांत सभोवताल अर्थात वातावरण, परिस्थीती व्यक्तीचे स्वभाव निर्माण करतात. ह्यात आठवणींचे चक्र दडलेले असते व त्या प्रमाणे परिणाम. हा सारे सत्य व द्रष्य व्यक्त भाग. परंतु खोलांत शिरले तर मुळ ताबा असतो त्याच्या जीन्सचा. ज्याला मुळ स्वभाव म्हणतात. सारे वरकरणी आत्मसांत केलेले स्वभाव त्या क्षणी बाजूस सारले जाऊन, मुळ स्वभाव त्याची जागा घेतो. ह्याला चांगले, वाईट, योग्य अयोग ह्याची जाण नसते. आणि तेच तर नैसर्गिक होय. येथेच संकल्पना येते ती वंश परंपरेची. जीन्सचा प्रवाह एकच नसतो. त्यांत सतत मिश्रण होत राहते. स्त्री वा पुरुष बीजांचे. म्हणूनच त्यात प्रसंगीक भिन्नता होत राहते. मात्र प्रवाह पुढेच जात असतो.
हे तुझ्या आई वडीलांचे, आजोबा-आजीचे, गुणधर्म तुझ्या आले आहेत असे म्हणतो. ते ह्याच मुळे. आपले सर्व साधारण वंशाचे ज्ञान आजा- आजी, पंणजोबा-पंणजी, खापर पंणजोबा-खापर पंणजी (अर्थात दोन्ही बाजूंचे पित्र-मात्र धरुन) येथ पर्यंतच मर्यादीत असते. कदाचित् कांही जुने रेकॉर्ड ह्या बाबतीत थोडासा प्रकाशही टाकू शकतील. मात्र सत्य कायम राहते. ते म्हणजे “वंश परंमपरागत गुणधर्म”.अर्थात आज कालच्या पुरोगामी शब्दांत “खानदानी गुणधर्म”. ज्याला म्हणतात मुळ स्वभाव. चांगला वा विक्षीप्त, आक्रमक वा बचावात्मक, वा इतर कोणता. हे शब्द फक्त बदललेल्या परिसिथितीला अनुसरुनच व्यक्त होत असतात.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
विवीध-अंगी *** ६
निवृत्तीचा कांठ विसावा घेण्यासाठी नसतो
अनुभवाची शिदोरी घेऊन नवा मार्ग शोधण्यासाठी असतो.
Leave a Reply