अलीकडे खासगी वाहनधारकांची संख्या वाढली असली तरी सार्वजनिक प्रवासी सेवेचा लाभ घेणार्याची संख्या कमी नाही. त्यातही एस.टी.ने प्रवास करणार्यांची संख्या मोठी आहे. त्यामानाने वाहतुक सुविधा उपलब्ध होत नाहीत. या परिस्थितीचा गैरफायदा खासगी प्रवासी कंपन्यांकडून घेतला जातो. एवढेच
नव्हे तर त्यांच्याकडून प्रवाशांची अडवणूक, त्यांची आर्थिक लुबाडणूक असे प्रकार राजरोसपणे सुरू असते.सध्या जो-तो आपल्या फायद्याचा विचार करू लागला आहे. प्रत्येक गोष्टीतून मला काय मिळेल किबहुना मला काय साधता येईल हेच पाहिले जाते. त्यातून मग प्रसंगी इतरांची लुबाडणूक करण्याची वृत्ती बळावताना दिसते. त्या दृष्टीने विचार करायचा तर आजकाल ग्राहक वर्गाची विविध तर्हेने लुबाडणूक होताना दिसते. ‘ग्राहक देवो भव’ या जाणिवेने त्यांना सेवा देणार्यांची संख्या तुलनेने बरीच कमी आहे. विशेषत: अडचणीत सापडलेल्या किंवा नाईलाज असणार्या ग्राहकांची अधिकाधिक अडवणूक कशी करता येईल ते पाहिले जाते. उदाहरण द्यायचे तर दसरा, दिवाळी यासारख्या मोठ्या सणांच्या निमित्ताने विविध जीवनावश्यक वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते.मात्र, याच वेळी भेसळयुक्त वस्तू पध्दतशीरपणे बाजारात विक्रीसाठी आणल्या जातात. तर काही वेळा साठेबाजी, काळाबाजार यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते.खासगी प्रवासी सेवेत होणारी फसवणूक हा सुध्दा चिंतेचा विषय आहे. आजकाल कोणत्या ना कोणत्या निमित्ताने प्रवास करणार्यांची संख्या वाढत आहे. विशेषत: सणासुदीच्या निमित्ताने बाहेरगावी जाणार्यांची संख्या प्रचंड असते. अलीकडे खासगी वाहनांच्या संख्येत वरचेवर वाढ होत असली तरी सार्वजनिक सेवेचा लाभ घेणार्यांची संख्या काही कमी नाही. या संख्येच्या मानाने एस.टी. किवा रेल्वे सेवा पुरेशी ठरत नाही. तर काही वेळा वि
शिष्ट भागात या सेवा उपलब्ध नसतात. अशा वेळी बहुसंख्य प्रवासी खासगी वाहतुक कंपन्यांना प्राधान्य देत असल्याचे दिसते. मात्र, या सेवेविषयी अलीकडे बर्याच तक्रारी निर्माण होऊ लागल्या आहेत. अशा तक्रारींमध्ये बस वेळेवर न सुटणे, त्यानंतर ती प्रवासी
शोधण्यासाठी फिरवत राहणे, प्रवाशांकडून पैसे घेऊनही तिकिटे न दिली जाणे, बसमध्ये आवश्यक त्या सुविधा नसणे यांचा प्रामुख्याने समावेश होईल. या शिवाय बसचे नेमके अधिकृत थांबे कोणते, तिथे बस किती वेळ थांबणार, याची प्रवाशांना माहिती नसते. मुख्य म्हणजे या सेवेच्या तिकिटांचे दर सीझनप्रमाणे बदलत राहतात. त्यावर कोणाचेही नियंत्रण नसते. यावरुन खासगी प्रवासी वाहतूक कंपन्यांच्या नेमक्या कारभाराची कल्पना येईल.वास्तविक सणासुदीच्या निमित्ताने प्रवास करणारी मंडळी काही महिने आधीपासूनच तयारीला लागलेली असतात. गावाकडे घरे असणार्यांची तर ओढ इतकी अनावर असते की मिळेल त्या वाहनाने काही करून गाव गाठायचे हा निश्चय असतो. त्यानंतर मग थंड हवेची ठिकाणे किवा दूरवरची प्रेक्षणीय स्थळे कधी स्वत: आयोजित करून किवा एखाद्या टूर्स आयोजकांबरोबर प्रवास करून पाहिली जातात. ठिकाणे कोणतीही असोत, अशा पर्यटनासाठी करावा लागणारा प्रवास, त्याचे येणारे अनुभव बर्याचदा उद्वेगजनक असतात. त्यातून काही वेळा खासगी प्रवासी कंपन्यांच्या चालकांबरोबर तसेच व्यवस्थापकांबरोबर वादविवाद होतात. अशा सेवेबद्दल वरिष्ठांकडे तक्रारी दाखल केल्या जातात. पण परिस्थितीत फरक पडल्याचे दिसत नाही.खरे तर अलीकडे एस.टी. नेही निमआराम किवा व्हॉल्वो बससेवा अधिक प्रमाणात सुरू केली आहे. पण मुंबई-पुणे-नाशिक या मार्गावर ही सेवा घेण्यासाठी प्रवाशांना दादरपर्यंत यावे लागले. उपनगरातून प्रवास करणार्या प्रवाशांना हे गैरसोयीचे ठरते आणि केवळ जवळ उपलब्ध आहे म्हणून न
ईलाजास्तव खासगी सेवेकडे वळावे लागते. मग त्यातून होणारा मनस्ताप मुकाटपणे सहन करणे भाग पडते. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे अत्यंत योग्य आणि ठराविक दर असणार्या एस.टी. बसचे दर सीझनप्रमाणे बदलत नाहीत. शिवाय या बसचा मार्ग (रुट) ठरलेला, वेळापत्रक ठरलेले, दर ठरलेले, त्यातील पारदर्शकता एवढी जमेची बाजू असताना ही सेवा अधिकाधिक प्रवाशांपर्यंत का पोहोचत नाही, असा प्रश्न पडतो. वास्तविक प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता या बससेवेचे जाळे उपनगरात वाढले पाहिजे. केवळ पुणे-नाशिक असे न करता पर्यटकांना जाण्यासाठी अन्य ठिकाणीही अशी सेवा उपलब्ध झाली तर ती प्रवाशांना हवी आहे. वातानुकुलित बस सेवेचा फायदा आज केवळ उच्चभ्रू वर्गच फायदा घेतो असे नाही. तर सर्वसामान्य प्रवासीही या सेवेचा लाभ घेऊ इच्छितात. पण केवळ खासगी प्रवासी कंपन्यांच्या मनमानीपणामुळे तो त्यांना परवडत नाही हे वास्तव लक्षात घ्यायला हवं.ऐन हंगामात अमाप पैशाची लूट करणार्या किंवा प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारणार्या या खासगी प्रवासी कंपन्या ग्राहकांच्या सुरक्षितेची कोणती काळजी घेतात, याचाही विचार करायला हवा. दुर्देवाने काही विपरित (अपघात) घडल्यास या कंपन्यांनी प्रवाशांच्या विम्याची सोय केलेली असते का, या संपूर्ण खासगी बस सेवेवर कोणाचे नियंत्रण आहे का, अशा काही प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायला हवीत. आरटीओ सारख्या सरकारी यंत्रणेकडे या बससेवेचे नियंत्रण करण्याचे काही अधिकार असताना ते पूर्णपणे वापरते जातात का हाही प्रश्न आहे. ऐन दिवाळीच्या हंगामात पुण्यात खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी प्रवासी भाड्यात दुप्पट ते तिप्पट वाढ केली होती. उदाहरण द्यायचे तर पुणे ते नागपूर प्रवासाचे या सेवेचे भाडे एरव्ही 800 ते १२०० रुपये असतात. पण ऐन दिवाळीच्या धामधुमीत या मार्गावरील भाड्यात प्रचं
वाढ करुन ते 1800 ते 2300 रुपये इतके आकारण्यात आले. यावरुन प्रवाशांच्या आर्थिक लुबाडणुकीची कल्पना येईल.वास्तविक वर्षाचे जवळ जवळ 12 महिने ग्राहकांना सेवा पुरवणार्या या खासगी प्रवासी सेवेवर कठोर नियंत्रण आले पाहिजे. मुख्य म्हणजे त्यांचे वेळापत्रक, प्रवासाचा मार्ग, अधिकृत थांबे, क्वचित वेळ पडल्यास आरक्षण रद्द करावे लागते, त्या संदर्भातील नियम या सार्या बाबी सरकारी प्रवासी सेवेसारख्याच हव्यात. आपण एरव्ही सरकारी यंत्रणेला दोष देतो;
पण इथे उलटी परिस्थिती आहे. त्यामुळे सरकारी प्रवासी वाहतूक सेवा अधिकाधिक प्रवाशांपर्यंत पोहोचली तरच खासगी सेवेची मनमानी कमी होणार
आहे. शिवाय प्रवाशांना खर्या अर्थाने प्रवासाचा आनंद घेता येईल. आणखी एक बाब म्हणजे आज नाईलाजाने खासगी सेवेकडे वळलेला ग्राहक सरकारी सेवेकडे आल्यास त्याचा प्रवास भाड्याचा पैसा सरकारी तिजोरीत जमा होईल. म्हणजेच एस.टी. महामंडळाचे पर्यायाने सरकारचे उत्पन्न वाढेल. पण हे सारे प्रत्यक्षात कधी येणार हा प्रश्न आहे.
(अद्वैत फीचर्स)
— सुर्यकांत पाठक
Leave a Reply