नवीन लेखन...

गर्भावस्था व बस्ति चिकित्सा

अपानो अपानगः श्रोणिवस्तिमेढ्रोरुगोचरः शुक्रार्तवशकृन्मूत्रगर्भनिष्क्रमणक्रियः l . . . . अ. हृ. सूत्रस्थान १२/९

मोठे आतडे (पक्वाशय) हे अपान वायूचे मुख्य स्थान आहे. हा अपान वायु उदराचा खालचा भाग, मूत्राशय (बस्ति) आणि प्रजनन यंत्रणेच्या भागात राहतो. शुक्रनिष्क्रमण, मासिक रजःस्राव, मल वेग प्रवर्तन, मूत्र वेग प्रवर्तन आणि प्रजनन ह्यांचे कार्य सुरळीत ठेवणे हे अपान वायूचे कार्य आहे.

कोणतेही काम करण्यापूर्वी त्या कामासाठी साठी निवडलेली जागा निर्मळ असावी ह्याबाबत दुमत असणे शक्य नाही. पूजा असो, स्वयंपाक असो वा दुसरे कोणतेही शुभकार्य असो स्वच्छतेला पर्यायच नाही. दिवसाची सुरुवातही मलमूत्र विसर्जन आणि स्नानाने केली जाते. शरीराची स्वच्छता जशी आपण बाहेरून करतो तशीच आतूनही करण्याची गरज असते. पूर्वी घरातील वडील मंडळी सर्व लहानामोठ्यांना आठवड्यातून एकदा ‘एरंडेल तेल’ पिण्याची सक्ती करीत असत. शरीराची आतून स्वच्छता करण्यासाठी ही प्रथा चांगली होती परंतु काळाच्या ओघात लोकांना ह्याचा विसर पडला. मात्र अशी स्वच्छता गर्भावस्थेत करणे योग्य नाही व शक्य नाही म्हणून काही निराळ्या प्रकाराने स्वच्छता करून मगच गर्भधारणेचा विचार करावा. आयुर्वेदात ह्यासाठी पंचकर्म करून देहशुद्धी करण्याचे वर्णन आहे. वमन, विरेचन, बस्ति, नस्य आणि रक्तमोक्षण अशा ५ देहशुद्धीकर क्रियांना एकत्रिपणे ‘पंचकर्म’ म्हणतात. गर्भाधानाचा संकल्प केल्यावर ह्या ५ पैकी किमान बस्ति चिकित्सा तरी स्त्री-पुरुषांनी नक्कीच करून घेतली पाहिजे.

बस्ति म्हणजे काय –

साध्या शब्दात बस्ति म्हणजे एनिमा. शौच मार्गाने तेल आणि काढे वापरून मोठ्या आतड्याद्वारे करण्याची ही एक चिकित्सा पद्धती आहे. इसवी सन पूर्व १५०० वर्ष इजिप्तच्या वैद्यकीय चिकित्सेत कोलोन लॅव्हेज म्हणजे आतड्यांची स्वच्छता करण्याचे उपाय ताडपत्रांवर लिखित आहे. ह्यामध्ये फक्त पाण्याचा वापर केला जात असे. आयुर्वेद शास्त्र त्याहीपेक्षा पुरातन आहे आणि त्यात बस्ति चिकित्सेचा उल्लेख पंचकर्म विषयात आढळतो. त्यात तेल, तूप, मध, काढे, गोमूत्र अशी अनेक प्रकारची द्रव्ये वापरली जातात.

आयुर्वेदाने शरीराचे ढोबळ मानाने तीन हिस्से केले आहेत. डोक्यापासून हृदयापर्यंत कफाचा, हृदयापासून बेंबी (नाभी) पर्यंत पित्ताचा आणि बेंबीच्या खालचा वाताचा. गर्भाचे वास्तव्य शरीराच्या खालच्या भागात (वाताच्या) असल्याने तेथे स्वच्छता आणि स्निग्धता असणे गर्भवाढीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे.

आयुर्वेदाने वाताच्या चिकित्सेत बस्ति चिकित्सेचे महत्व श्लोकरूपाने दिले आहे.

तस्यातिंवृद्धस्य शमाय नान्यद्वस्तेर्विना भेषजमस्ति किञ्चित् l

तस्माश्चिकित्सार्द्ध इति प्रदिष्टः कृत्स्ना चिकित्सा अपि च बस्तिरेकैः ll अ. हृ. सूत्रस्थान १९/८७

अतिप्रमाणात वाढलेल्या वाताला नियंत्रणात ठेवण्यासाठी बस्ति पेक्षा दुसरी कोणतीही चिकित्सा श्रेष्ठ नाही, अर्थात बस्ति हीच सर्वश्रेष्ठ चिकित्सा आहे.

स्त्री व पुरुषाने गर्भधारणेपूर्वी ही चिकित्सा करणे अत्यंत आवश्यक आहे किंबहुना बस्ति चिकित्सा केल्याशिवाय गर्भधारणा होऊ देणे म्हणजे कोणतीही पूर्वतयारी न करता लांबच्या प्रवासाला जाण्यासारखे आहे.

पुरुषांमध्ये बस्तिचे महत्व –

पुरूषबीज (शुक्र) निर्मिती वृषणात होते. त्याठिकाणी तयार झालेले शुक्र उदराच्या खालच्या भागात असलेल्या इंगॉयनल कॅनलच्या मार्गे शिस्नातून बाहेर पडते. ह्या कॅनलवर अख्ख्या उदराचा दाब पडतो. त्यामुळे उदरातील रचना जेवढ्या हलक्याफुलक्या असतील तेवढे ह्याचे वहन कार्य सुलभ होते. बरेचदा शुक्र तपासणी केल्यावर शुक्राणूंची संख्या कमी असल्याचे निदर्शनास येते. अशावेळी फक्त बस्ति चिकित्सा करून पुन्हा तपासणी केल्यास ही संख्या वाढल्याचे दिसते. बस्तिमुळे आतड्यातील मळाचे खडे, साठलेला वायु बाहेर पडून जातो आणि इंगॉयनल कॅनलवरचा दाब हटतो. नळाला रबरी पाईप लावून नाल सोडला पण पाईपवर कोणी पाय ठेऊन उभा राहिला तर पाईपमधून पाणी बाहेर पडणार नाही व पाय हटवला की ताबडतोब पाणी येऊ लागते तसाच हा प्रकार आहे. वैद्यांनी बस्ति सुचवल्या बरोबर रुग्ण म्हणतात “आम्हाला दररोज शौचाला साफ होते, मग ही भानगड कशाला?” त्याचे उत्तर – “घरी रोज दैनंदिन साफसफाई आपण करतोच तरीही सणासुदीच्या वेळी कपाटे, पलंग किंवा इतर फर्निचर बाजूला केल्यावर लक्षात येते की त्यामागे किती मोठ्या प्रमाणात कचरा साठला आहे. शरीरातही असाच कचरा साठतो आणि त्याचा दाब इंगॉयनल कॅनलवर पडून शुक्रवहनात अडथळा होतो. शिवाय हा दाब शुक्रजनन यंत्रणेला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्त वाहिन्यांवरही पडतो. त्यामुळे त्या भागांना प्राणवायूची कमतरता होते. परिणामी त्यांचे शुक्रजननाचे कार्य खालावते. झोपेत हातावर उशीचा किंवा शरीराच्या इतर भागाचा दाब पडल्यामुळे हाताला मुंग्या येतात, बधिरता येते व त्याची हालचाल जवळजवळ बंद पडण्याची वेळ येते. दाब नाहीसा झाल्यावर परत रक्तपुरवठा सुरळीत होऊन त्याचे कार्य पूर्ववत सुरु होते. तसाच हा प्रकार आहे. बस्ति द्रव्यांमध्ये तेल, तूप, वनस्पतींचे काढे इत्यादींचा वापर धातुपोषणासाठी होतो आणि संपूर्ण प्रजनन यंत्रणेचे उत्तम प्रकारे सर्व्हिसिंग होते.

स्त्रियांमध्ये बस्तिचे महत्व –

स्त्री शरीरामध्ये बस्तिचे कार्य अधिक व्यापक स्वरूपाचे असते कारण गर्भाच्या संपूर्ण वाढीची जबाबदारी तिच्या स्वास्थ्यावरच अवलंबून असते. पुरुषांमध्ये प्रजनन यंत्रणेच्या सर्व्हिसिंग साठी जसा बस्तिचा उपयोग होतो तंतोतंत तसाच उपयोग स्त्री शरीरातही होतो. बीजकोष, बीजवाहिन्या, गर्भाशय ह्या भागांवरील दाब आणि त्यांना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांवरील दाब हटतो. परिणामी त्यांचे कार्य निर्विघ्नपणे सुरु होते. गर्भधारणा झाल्यावर गर्भाशयाचा आकार हळूहळू वाढू लागतो. बाजूचा दाब हटल्यामुळे गर्भाशयाचा विस्तार होण्यास पुरेशी जागा उपलब्ध होते. अशी जागा उपलब्ध न झाल्यास गर्भाची वाढ होण्यात बाधा येऊ शकते. गर्भाधानापूर्वी ही चिकित्सा केल्याने गर्भवाढीमध्ये अडथळा येत नाही.

गर्भधारणेनंतर –

गर्भधारणेनंतर आठव्या महिन्यापर्यंत पंचकर्मातील कोणताही उपक्रम करू नये. गर्भधारणेपूर्वी केलल्या देहशुद्धीचा सुपरिणाम आठव्या महिन्यापर्यंत टिकून राहतो. शास्त्रादेशानुसार आहार-विहाराकडे लक्ष केंद्रित करावे जेणेकरून गर्भपोषण योग्यप्रकारे होत राहील.

आठव्या महिन्यात बस्ति महत्व –

आठव्या महिन्यापासून गर्भाचे आकारमान जास्त वाढते म्हणून आयुर्वेदात आठव्या महिन्यात पुन्हा खालील औषधी द्रव्यांनी सिद्ध केलेले बस्ति देण्यास सुचविले आहे.

शुष्कमूलककोलाम्लकषायेण प्रशस्यते । शताह्वाकल्कितो वस्तिः सतैलघृतसैन्धवः । . . . . अ.हृ. शारीर १/६५

अष्टमे बदरोदकेन बलातिबलाशतपुष्पापललपयोदधिमस्तुतैललवणमदनफलमधुघृतमिश्रेणास्थापयेत् पुराणपुरीषशुद्ध्यर्थमनुलोमनार्थं च वायोः, ततः पयोमधुरकषायसिद्धेन तैलेनानुवासयेत्, अनुलोमे हि वायौ सुखं प्रसूयते निरुपद्रवा च भवति, अत ऊर्ध्वं स्निग्धाभिर्यवागूभिर्जाङ्गलरसैश्चोपक्रमेदाप्रसवकालात्; एवमुपक्रान्ता स्निग्धा बलवती सुखमनुपद्रवा प्रसूयते | . . . . संदर्भ: सुश्रुत संहिता, शारीर १०/४

आठव्या महिन्यात ओज अस्थिर असते. अशा वेळी गर्भस्थैर्यासाठी विशिष्ट द्रव्यांनी सिद्ध असा निरूह बस्ति प्रयोग ग्रंथात नमूद आहे. अष्टांगहृदयकारांनी ह्यामध्ये शुष्क मुळा, आंबट बोरे, बडीशेप, तिळ तेल, तूप व सैंधव ह्या द्रव्यांचा अंतर्भाव केला आहे. सुश्रुत संहितेत बोरे, बला, अतिबला, बडीशेप, मांसरस, दुध, दह्याची निवळ, तेल, मीठ, गेळफळ, मध व तूप असा पाठ सांगितला आहे. निरुह बस्ति मुळे आतडी स्वच्छ होतात, त्यानंतर “सुप्रसव पिचु तेलाचा” अनुवासन बस्तिही घेणे आवश्यक आहे. ह्यामुळे प्रसुती अतिशय सहज व सुलभ होते. ह्या औषधी द्रव्यांचा नेमका लाभ कसा होतो हे आजच्या घडीला सांगणे कठीण आहे. सूज्ञ आणि जाणकार मंडळींनी “अप्तोपदेश” समजून ह्या चिकित्सांचा अनुभव घ्यावा. अनेक वैद्यक व्यावसायिकांनी ह्या बस्तिचा प्रयोग आपल्या रुग्णांवर करून त्यापासून होणारे लाभ प्रत्यक्ष पाहिले आहेत. आयुर्वेदीय औषधे आणि चिकित्साक्रम निर्धोक असतात असे सर्वमान्य असले तरीही वैद्यांच्या सल्ल्याशिवाय केवळ वाचून किंवा ऐकून बस्तिप्रयोग करणे योग्य नाही हे कायम लक्षात ठेवावे.

— वैद्य संतोष जळूकर
संचालक – अक्षय फार्मा रेमेडीज, मुंबई
+917208777773
drjalukar@akshaypharma.com

 

Avatar
About डॉ. संतोष जळूकर 33 Articles
डॉ. संतोष जळूकर हे आयुर्वेदिक डॉक्टर असून ते आयुर्वेदिक औषधनिर्मितीच्या व्यवसायात आहेत. त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..