साहित्य:
दोन वाट्या गहू,
२ मोठे कांदे
तेल
हिंग, हळद, तिखट
अर्धी वाटी नारळाचं दूध
मीठ
गुळ
ओलं खोबरं
कोथिंबिर
काजू
अक्रोडचे तुकडे
साजूक तूप
मसाल्यासाठी : कांदा, सुकं खोबरं, आलं, लसूण, दालचिनी, लवंग, तमालपत्र, मसाला वेलची, लवंग, शहाजिरे, बडिशेप.
कृती:
गहू ७-८ तास भिजत घालावे. नंतर ते उपसून १५ मिनिटे ठेवावे. त्या गव्हाला उकड द्यावी. चांगले बोटचेपे झाल्यावर ते चाळणीत उपसून ठेवावे.
पातेलं चांगले तापवून घेउन त्यात तेल घालावे. तेल चांगले तापले की त्यात फोडणीला दालचिनी, लवंग टाकावी. नंतर तमालपत्र व शहाजिरे टाकावे. त्यानंतर त्यात हिंग टाकून थोडासा कांदा टाकावा. त्यावर हळद, तिखट टाकावे व नंतर बाकीचा कांदा, गहू, वाटलेला मसाला घालून चांगले परतावे. त्यानंतर गहू बुडतील एवढे उकळते पाणी घालावे. त्यात थोडासा गुळ घालावा आणि उकळून द्यावे. पाणी आटत आले की त्यात मीठ घालावे. काजू व अक्रोडचे तुकडे घालावे. नंतर ते सगळे मिश्रण चांगले घाटावे व त्यावर झाकण ठेउन चांगली वाफ येउन द्यावी. नंतर झाकण काढून मसालेभातावर नारलाचे दूध घालून झाकण ठेवावे. थोडा वेळ गॅस बंद करुन २ मिनिटांनी परत त्याला चांगले घाटून झाकण ठेउन पुन्हा एक वाफ द्यावी व गॅस बंद करावा.
आता डिशमध्ये मसालेभात काढून त्यावर आवडीप्रमाणे साजूक तूप घालावे. ओलं खोबरं व कोथिंबीर घालावी. गव्हाचा मसालेभात तयार झाला.
टिप: हा गव्हाचा मसालेभात डायबेटिस वाल्यांना उत्तम आहे. कारण तांदूळ खावा लागत नाही आणि गव्हाच्या चपातीऐवजी गव्हाचे काहीतरी वेगळे खाणे होते.
Leave a Reply