नवीन लेखन...

गुडमाॅर्नींग पथक आणि मास्तर

पहाटं पहाटं कावळे मास्तर नि शेरगाव गाठलं. झावळातच गडी ग्रामपंचायती समोर हजर. गाडी उभी केली.उपरण्याने आळपलेले थोबाडं मोकळ केल. इकडं तिकडं पाहिलं .कुणाचाच पत्ता नव्हता. कुणाचा म्हंजी पथकातलं एक ही मेंबर अजून टपकालं नव्हता. सीयोची आडर असल्यामुळे येतेल सारी. पण कोणं टॅन्शाॅन घेत एवढं ? ग्रामपंचायतीचा चपराशी सुदाक आला नव्हता अजून…

आता काय करावं म्हणून मास्तरं नी तंबाखूची पुडी काढली .चुन्याची डब्बी काढली. केला घाणा मळायला सुरू…

आता हे बसले तंबाखू मळीत पण पंचायत बायांची झाली. बायाच्या हागणदारीच रस्ताचं ग्रमपंचायती म्होरून जातो.तिथंचं हे मास्तरं उभं टाकलं.बरं लयं उशीर झाला की मग पंचाईतच व्हती बायांची. झावळात उरकून यावं लागतं.नाहीतर सकाळ सकाळ झॅक होऊन बरीचं गडी ग्रमपंचायती म्होरं थांबत्यात. खंडाची खंडाच असतो.उग उग चकाटया पिटीत बसलेला. तसल्या ख॓डयातून जमतं असतं व्हयं कुठं बायाला पोरीला टरमेल घेऊन जायला ? पाच सहा महिने झालं असलं. काळयाची सून अशीचं परसाकडं चालली व्हती.ते पवाराचं येडकोंढूळ माग माग गेलं. हासलं. पवारचं घर तसलं डेंजर..
दहा बारा जणांनी मरणाचं चेचलं.केसी भानगडी झाल्यात.बसलेतं खेटं देत कोर्टात…बाया तरी काय करत्याल ?

जागाच नाही दुसरी. खालतून पाटलाचा अख्खा नंबर आला. तिकडं कुणाला पाय ठेऊन देत नाही . तेवढयात एक दोनजणी आल्या झराझरा पण मास्तरला पाहिलं की रिव्हस गेअरच टाकला. लगेचं पारू आत्याच्या पवळीवर चढून उडी टाकून पांदीत गेल्या. बायाची पंचाईत झालेली मास्तराच्या काय लक्षात आलं नाही. बरं असं उघडयावर जाणारचं सारे आज आडवायचं काम व्हतं त्यांचं पण एकटयानं कशाला झंझटीत पडायचं. बाकीचं पथकातले मेंबर आल्यावर बघू… मास्तरं बसलं मोबाईल चिवडीतं. बायाची पंचाईत झाली पण गडी माणसं कुठं लाजत असतेत व्हयं ? ते आपलं ऐटीत डुलत डुलतं जातं. कुणी टरमेल फिरीत..कुणी बाटली हल्लीत.कुणी सिगारेटीचं धुराडं फुकीत. काही पट्टे मोबाईलचं तुटाणं वाजवीत जातं. काही पट्टे….बॅटरीकी चमकीतच जाईत. इच्चू काटाच्या उजेड भी पाहयजीचं ना ?

कुणी पळतं पळतं जाईत. अर्जंट काॅल असल्यावर…काय करतेल ? बरं माणूस पाहिलं की मास्तराला रामराम शाम शाम करावचं लागतं. रावू नाना चाला व्हता. ते होता गरबडीत..मास्तरं …ने ठोकला राम राम…तसाचं गडी वसकला.

मास्तरं…हे टायमं का ? राम राम घालायचा ?”

मास्तरं नुसतं हासलं. आता काय बोललं ? दोन चार म्हतारी कोतारी तिथंचं पलीकडं गेली नि तिथंचं जवळचं बसली. आता यांना कसं सांगणार ? बरं ते एकून घेतेत व्हयं ? मास्तरला प्रश्न पडला. तेवढयात एक जण बुटाटं वाजीतचं आलं होतं. टाक ..टाक…काठी हातात. डायरेक्ट बॅटरीक त्याने मास्तराच्या डोळयावरचं चमकीली .मास्तरंने मस्स हात आडवे धरलं पण ते काय खाली घेईना . बरं ते कोण आसणं याचा अंदाज ही काढता येईना… बघता येईना .
“आर, कोणं ? ”
“मीचं…?”
“मीचं…? तोहया आयबापानं तोव्हं नाव नाय ठेवलं का ?”
” मीचं कावळे सर …?”
” कावळे मास्तरं व्हयं ? इथं कशाला थडपडताय ?
“डियुटीचं तसली आज ?”
“आरं आसली कसली डियुट?”
आता मास्तरांन बळबळचं थोडं हासून घेतलं.
” आज गुडमाॅर्नींग पथक हाय ?”
” आता हे कसलं गुडमार्नींग …फिडमारनिंग …?”
” जे असं हागणदारीला संडासाला जातेत. टरमेल…घेऊन येतेल…त्यांना गुलाबाचं फुलं देऊन स्वागत करायचं.”
“कुठतं फुलं ?”
” आता येत्याल ना मॅडम फुलं घेऊन..
अंगणवाडीच्या ”
” ती आणणारे फुलं…. सुशी आणणारं का फुलं…? तिलात केसात खोसायलाचं पुरायचे नाहीतं.”
” तसं नाही तात्या कालचं शाळेतल्या पोरीनी व मॅडम नी पाटी बरं फुलं तोडून ठेवलीत . यात्यालं घेऊन..”
” येईल तवा येईल. इथं काय करता. जरा बाजूला जावं की .
बायाची कसली पंच्यात झाली. आसं ऐन वाटावरचं थांबल्यावर त्यांनी काय करायचं ?एवढं कळू नाय का मास्तरं ?.पोराला कसं शिकीता कायनू.” आता पार अक्कलचं काढल्यावर…मास्तरचं डोकच सटाकलचं पण काय करता येत? गावात नोकरी करायची असती. काय बोलता येतं ? मुरली तात्या… सरपंचाच बाप. गडी लयं पावरबाज. टर्रीबाज. आपलीचं टर्र कडीला नेणारं.
” आसलं करायचं कुणी सांगितलं तुम्हाला?”
” सरकारनं… ते आपलं गावं हागणदारी मुक्ती साठी निवडलं. असं उघडयावरं संडासला बसायचं नाय.”
” कुणी आणली रं ही स्कीम येडमाटांनी ?”
” सरपंचानीच निवडलं आसलं गावं.
आता इक्कास करायचा म्हजी ..हागणदारीमुक्ती होणं भी लयं गरजेचं ”
” आमच्या शहाण्यानी आणली व्हयं ही स्कीम ? सा-या स्कीमा बंद झाल्या की काय ? ती हागणदारीची स्कीम आणली ?”
” नाही तात्या,…”
” काय नाय तात्यान काय ? बरं आणली तर आणली मग हागणदारीला काय ? बसावंन तिकड…उग रस्त्याला उभा राहिलावं.
राखणं केल्यावाणी. बायाची लयं पंच्यात होती.
” म्हणूनचं सरकार म्हणतयं संडास बांधा. बाया माणसाचं लयं आवघाड होतं.”
” तुमच्या सरकारला लयचं टॅन्शान काय बायाचं. मग दया की म्हणावं बांधून…पाण्याचा हाय का पत्ता ?”
आता मास्तरनी हेरलं. तात्याच्या तोंडी न लागलेचं बरं. तेवढयात अंगणवाडीच्या मॅडम आल्या. फुलाचं गठूडचं आणलं. बारकाल्या पोरी व्हत्या सोबतं.
” सर, उशीर झालावं का ? कोण सायब यायचे होतं ते आल्लेत का ?”
” नाय आजूक… येतेल ना ते. ते सायब..त्यांना कोण इचारणारं..”आपलं काम सुरू करा. त्या पवळी जवळ थांबा. लेडीजच्या हागणदारीच्या रस्त्यावर…मी इथं थांबतो. ” मास्तरांनी बरीचं फुलं घेतली.
” आवं सर…हे वरचे लोक काय भी काढतात्यात… मला तर लयंच लाज वाटते बया..” उगीचं कारणं नसतानी हासली.
“आता करावं तर लागणचं. ”
दोघ कामाला लागली पण तवर उजाडत आलं होतं. मास्तरने शिव्या, भिम्या डुलतं डुलतं येत असलेलं पाहिलं. जवळ गेलं आणि हासत हासतच म्हणालं,” गुडमाॅर्नींग….नेते.” गुलाबचं फुलं शिव्याच्या हातात दिलं. आता शिव्याला काहीचं मेळ नाय .तेव्हं गेला आरबाळून. भिम्यानं मास्तरं बसले हासतं.
” काय सर? हे काय नवीन?”
” असं उघडयावर जायचं नाय. रस्ते घाण करायचे नाहीत. संडास बांधून घ्यायचं…. ” मास्तर पाठ केल्यासारख बडाबडा करतं राहिलं. इथं काय चाललयं म्हणून बाकीचं गडी जमा झाले. कुणी काही भी बोलतं.कुणी नुसतं हासतं. तेवढयात कुणी आलं की मास्तर….मास्तरं… नुसतं बोंबलतं. तसं मास्तरं फुलं घेऊन माग पळं. मास्तराला पळावं लागं व हसावं ही लागं. बेजारं झालं.
तेवढयात पप्या आला. ते पण गाडीवर
तसं ते सारंचं ओरडले,” मास्तरं…मास्तर…पप्या..पप्या..” मास्तर पळालं. गाडीच्या डिक्कीत बाटली घेऊन तेवूहं चालला होता. मास्तर नी त्याला फुलं दिलं आणि गुडमाॅर्नींग घातलं. तसा गडी इरमाटला पलीकडं तांबा-याच्या वठयावर उषी, निशी नि पुष्पी होत्या.आता पोर देखतं आपणं म्हणल्यावर… तेव्हं सटकलाचं. राग राग खाली उतरला नि डायरेक्ट मास्तराच
” मास्तरं बंद करा नाटकं. काय लावलं.”गडी डायरेक्ट अंगावरच आल्यावर मास्तर तर हॅगच झालं.
“नाय पप्पू. तस नाय.. सरकारी काम.मला तरी काय करयचं?”
” मग नीट निघायचं.गपचिप पोरं शिकायची. जो पर्यंत हयो सरपंच तोवर मी संडास नाय बांधणार…बघू आमची सत्ता आल्यावर…” गडयांनी तावानीच गाडीला किक मारली. आता असं डायरेक्ट राजकरणावरचं गडी घ सरल्यावर मास्तराची बोलतीचं बंद झाली.
आता तिकडं बायाच्या हागणदारीत गम्मच झाली. शब्बा काकूला फुल दिलं की तिन दुसरं मागितलं.
मॅडम अजून एक दया…”
आता ते कशाला ?”
” देते की स्वातीला.तिला लय आवडेत.
आता मॅडमलाच हसाव का रडावं तेच कळाना. शब्बा काकून घेतलं हातातलचं ओढून.
आता मॅडम फुल्लं देत्यात म्हणल्यावर.. सारा पोरीचा घोळकाचं तिथं उलथला. सा-या फुलं ओढू लागल्या. मॅडमला त्या पोरी मोजीत असत्यात व्हयं ?
ग्रमपंचाईतीचा शिपाई हळू हळू आला. मुरक्या मुरक्या हासला.
” मास्तरं, सारी गावं सुधरतील पण हयो आमचा गाव नाय सुधरायचा.”
” निल्या दादा असं लयं निगीटीव्हं नाही बोलावं. तुम्हीचं असं म्हणल्यावर…”
” मग सुधरा…बसा येना देत.”
मास्तरं गपच झालं. काय करील ?

परशुराम सोंडगे
पाटोदा (बीड )

9673400928

Avatar
About परशुराम सोंडगे 11 Articles
परशुराम सोंडगे हे स्तंभलेखक असून बीड येथून प्रसिद्ध होणार्‍या दैनिक सुराज्य, दैनिक चंपावतीप्रत्र वगैरे वृत्तपत्रांतून लेखन करतात. ते “आई गातो तुझी गाणी” हा कविता व कथांचा बहारदार कार्यक्रम सादर करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..