‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती’ ही संतांची उक्ती त्याची सत्यता किती दृढ करते हे आतापर्यंतच्या आपल्या श्री गणेशाबरोबरच्या प्रवासातून लक्षात आलेच असेल. आता पर्यंत आपण विविध देशातील श्री गणेशांची माहिती मिळविली. त्याबरोबर आता आपण आपल्या राज्यातील आणि भारतातील गणेशांची माहिती मिळविणार आहोत. आणि ही माहिती मिळावीत असता असे लक्षात आले की श्री गणेश विश्वाच्या अणुरेणूत भरलेले आहेत त्यामुळे ते आपले सखा, मित्र, जीवलाग आणि पालक आहेत. असेच आपण आता कोकणातील गुहागर गावाचा उफराटा श्री गणेशाबद्दल जाणून घेणार आहोत.
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहाघर येथील कोळी समाजातील लोकांना समुद्रात एक गणेशमूर्ती सापडली होती. सर्वांनी मिळून या गणेशाची प्रतिष्ठापना केली. एकदा समुद्राला भरती येऊन गुहागर बुडण्याची वेळ आली असताना ग्रामस्थांनी या गणपतीची आराधना केली. त्या वेळी पूर्वाभिमुख गणेशाने आपले तोंड पश्चिमेकडे करून समुद्राची दिशा बदलल्याची दंतकथा आहे. त्यामुळे या गणपतीचे नाव ‘उरफाटा गणपती’ असे पडले. या गणपतीची प्रतिष्ठापना सुमारे तीनशे वर्षांपूर्वी झाल्याचे सांगण्यात येते. हा गणपती खरे कुळाचा आहे. खरे घराण्यातील सदस्य हे मातीच्या मूर्तीची पूजा भाद्रपद गणेश चतुर्थीला न करता घरातील पितळेची मूर्ती घेऊन किंवा नर्मदेचा गणपती म्हणून लाल दगडाची पूजा करतात. नवसाला पावणारा गणपती म्हणून या गणपतीची ओळख आहे. ही मूर्ती पांढरी शुभ्र आहे. या मूर्तीची उंची जवळपास अडीच फूट असून चतुर्भुज संबोधली जाणारी ही गणेशाची मूर्ती डाव्या सोंडेची आहे. हातात परशू व त्रिशूल असून पोटाभोवती नागसूत्र आहे. या मंदिराची नित्यपूजा ही दीक्षित घराण्याकडे आहे. भाद्रपद महिन्यात लोक उत्सव साजरा करतात.
।। ॐ गं गणपतये नम: ।।
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply