भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला महाराष्ट्रात व देशातही गणपतीची स्थापना होते. प्रत्येक घरात प्रथेप्रमाणे गणपतीची प्राणप्रतिष्ठापणा केली जाते दहा दिवसांनंतर विसर्जन होते. चतुर्थीनंतर गणेशाची माता पार्वती-म्हणजेच गौरी चे त्यापाठोपाठ आगमन होत आहे.
पश्चिम महाराष्ट्रात गौरी-गणपती, तर मराठवाड्यात महालक्ष्मी असे म्हणतात. महालक्ष्मीचा हा सण तीन दिवस असतो व तो घरोघर साजरा केला जातो. खडय़ाची, कलशाची, मुखवटय़ाची अशा विविध रुपात तिची पूजा केली जाते. श्रावण महिन्यात प्रतिष्ठापना पेलेली ज्येष्ठा व भाद्रपद महिन्यात तिच्या शेजारी बसविण्यात येणारी कनिष्ठा अशा दोघींची जोडीने पूजा होईल. पहिल्या दिवशी आगमन, दुस-या दिवशी गौरी भोजन व तिसर्याज दिवशी म्हणजेच भाद्रपद शुक्ल अष्टमीला या गौरी -महालक्ष्मीचे विसर्जन करण्यात येते. या निमित्ताने गौरी रेखाटन कलाही विकसित झाली आहे. मातीच्या सुगडावर पिवडी व चुना यांचा वापर करून गौरीचे मुख रेखाटले जाते तर त्या सभोवती शंख, चक्र, पद्म, गदा, हस्त, गाय वासरु, तुळशी वृंदावन, स्वस्तिक, गौरीची पावले अशी प्रतिक चिन्हेही रेखाटली जातात. गुरवारी गौरीचे आगमन होईल. शुक्रवारी गौरीच्या जेवणाचा थाट असेल तर शनिवारी गणपतीसोबत गौरीला निरोप दिला जाईल.
कुटुंबाला एकत्र आणणाऱ्या या गौरीच्या आगमनाची उत्सुकता लहानथोर सर्वानाच असते. मग काय गौरीचं आवाहन, तिची पूजा ते तिच्यासाठी केली जाणारी सजावट, तिचं नटणं, थटणं, पंचपक्वानांचा केला जाणारा बेत आणि गौरीसाठी जागविलेल्या रात्री असं खूप काही गौरी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे. गौरीपूजनाला पहिल्या दिवशी शेपूची भाजी व भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी महालक्ष्मी पूजन असून सवाष्ण जेवायला घालतात. हा इथला मुख्य समारंभ असतो. त्यानंतर आरती करून पुरणपोळीचा बेत असतो.काही ठिकाणी गौरीच्या नैवेद्याला घावन घाटले करण्याची पद्धत आहे. आणि तिसऱ्या दिवशी पानावर दहीभात व कानवल्याचा नवेद्य देऊन गौरींचं विसर्जन केलं जातं.
Leave a Reply