घराच्या भिंतीसाठी वापरण्यात येणारे रंग हे आपल्या मनावर जसा परिणाम करत असतात तसेच ते आरोग्यावरही करत असतात. त्यामुळे घराचे रंग हे पर्यावरणपूरक असायला हवेत.
गेल्या काही वर्षांमध्ये ग्राहकांमध्ये अनेक बाबतीत जागरुकता येत आहे. जगभरातले ग्राहक ते वापरत असलेल्या उत्पादनांच्या दर्जाविषयी सतर्क असतात. भारतीय ग्राहकही त्याला अपवाद नाहीत. म्हणूनच देशात अनेक ग्राहक ते वापरत असलेली उत्पादनं पर्यावरणपूरक असावीत असा आग्रह धरताना दिसतात. या सर्वांचा परिणाम असा झालाय की देशासह जागतिक पातळीवर घराचा पेण्ट आणि कोटिंगशी संबंधित उद्योगही आपली उत्पादनं जास्तीत जास्त पर्यावरणपूरक असतील असा प्रयत्न करत आहेत. आपण वापरत असलेल्या अनेक उत्पादनांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम थोड्या – फार प्रमाणात आपल्या आरोग्यावर होत असतो. पण तुम्हाला हे माहित आहे का की, आपल्या घरातल्या अंतर्भागात वापरल्या जाणाऱ्या रंगांचा प्रतिकूल परिणाम होत असतो. आपण घरात अधिक वेळ घालवत असतो आणि रंगांतली विषारी द्रव्यं, क्षोभकं, अॅलर्जीकारक घटक आणि वायूचा सामना करत असतो. म्हणूनच हे टाळण्यासाठी चांगल्या म्हणजे पर्यावरणपूरक रंगांचा वापर केला पाहिजे. तसंच खालील गोष्टी केल्या पाहिजे.
घरात भरपूर मोकळी हवा राहिल, अशी उपाययोजना करा.
आर्द्रता आणि पाण्यामुळे भिंती किंवा रंगांचं नुकसान होणार नाही, याची काळजी घ्या.
विषारी द्रव्यांशी थेट संपर्क येणार नाही, यासाठी खबरदारी घ्या.
घराला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि नूतनीकरण व रिमॉडेलिंगमध्ये आपल्या नकळत होणारी हानी टाळण्यासाठी देखरेख पद्धतीत बदल घडवून आणा.
घर सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपायोजना करा. उदा. ओलावा काढून टाकण्यासाठी आणि आर्द्रता कमी करण्यासाठी प्रत्येक बाथरूम आणि किचनला एक्झॉस्ट फॅन बसवून घ्या.
आरोग्याची हानी टाळण्यासाठी घराची नियमित तपासणी करा.
घरातल्या हवेचा दर्जा राखणं फार महत्त्वाचं असतं. कारण त्या हवेचा तुमच्या आरोग्यावर थेट आणि दीर्घ परिणाम होत असतो. बऱ्याच घरांमधली हवा घराबाहेरच्या हवेपेक्षा २२०० पटीने अधिक प्रदूषित असते, असं एका संशोधनात आढळून आलं आहे. अशा प्रदूषित हवेमुळेच श्वासोच्छवासाच्या समस्या उद्भवणं, डोळे आणि त्वचा जळजळणं असे त्रास होतात. म्हणूनच घरातली हवा प्रदूषित असेल तर ती सायलेण्ट किलर असते.
घरातल्या भिंतींसाठी वापरण्यात येणाऱ्या बहुतांशी रंगांची निर्मिती ही व्होलटाइल ऑर्गेनिक कंपाउण्ड्स (व्हीओजीस)पासून केली जाते. पण या घटकांमुळे हवेचा दर्जा खालावतो आणि ती आरोग्यासाठी धोकादायक बनते. या घटकांना न्यूरोटॉक्सिन्स असं म्हणतात. व्हीओसींमुळे बाळांना फुफ्फुसाशी संबंधित विकार, अॅलर्जी, पाणावलेले आणि लाल डोळे, वाहतं नाक, कफ, घशाचा संसर्ग अशा समस्या जाणवतात. तसंच त्यांची रोगप्रतिकारशक्तीही कमी होते.
मुलं दिवसातला भरपूर वेळ घरातच असतात. अशा परिस्थितीत मुलांचा संपर्क हवेतल्या प्रदूषकांशी येत असेल तर त्यामुळे त्यांच्या रक्तातलं शिशाचं प्रमाण वाढणं तसंच दमा आणि श्वसनसंस्थेशी संबंधित आजार होऊ शकतात. घराच्या रंगांमध्ये व्हीओसीजचं प्रमाण अत्याधिक असेल तर त्याची झळ प्रौढांनाही बसू शकतो. त्यांना गंभीर स्वरूपाचे आजार होऊ शकतात.
आजचे ग्राहक जागरूक असून ते आरोग्यदायी आणि सुरक्षित घरांना प्राधान्य देतात. त्यामुळे ग्राहकांनी पर्यावरणपूरक रंगांचा वापर करायला हवा. हे रंग घरात असतील तर डोकं दुखणं, मळमळणं, श्वसनविकार, चक्कर येणं, छातीत दुखणं, फुफ्फुसात जळजळणं, नाक, घसा आणि डोळ्यात जळजळ होणं आदी समस्या सहसा जाणवत नाहीत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
Leave a Reply