अचानक एका जुन्या मित्राचा फोन आला. गेले काही आठवडे म्हणे शर्टाला घामाचा खूप वास येतो म्हणे. काही करु काही कळत नाही. साबण बदलले, परफ्युम कधी नव्हे ते वापरायला सुरुवात केली तरी काही उपयोग होत नाही. स्नान करुन बेहमीप्रमाणे पावडर वगैरे अंगावर मारून कामाला बाहेर पडल्यावर एक दोन तासतच वाटतं की शर्ट बदलायला हवा. काही उपाय सुचव ना ! पंधरा सोळा वर्षांपूर्वी कुठेतरी आयुर्वेदिक ग्रंथात वाचलेलं आठवलं. बेलाच्या पानांचं चूर्ण पोटात घेतल्यामुळे घामाची दुर्गंधी जाते. इतक्या वर्षांत असा प्रश्न कोणी विचारला नव्हता म्हणून त्यासाठी काही उपाय आहे हे लक्षातच आलं नव्हतं. ह्या मित्राने विचारल्यावर ग्रंथात लिहिलं आहे तर करुन बघायला काय हरकत आहे? फायदा होतो की नाही निदान समजेल तरी, दुष्परिणाम तर काही होणार नाही. फोनवरच त्या मित्राला सल्ला दिला – बेलाच्या पानाचं चूर्ण आणि बरोबर तेवढ्याच प्रमाणात त्रिफळा चूर्ण एकत्र करुन रात्री झोपताना अर्धा चमचा घे आणि आठ दिवसांनी मला कळव. जवळ जवळ १०-११ दिवसांनी त्याने परत फोन केला. काय म्हणतो ह्याविषयी जरा कुतुहल मनात होतंच. तो म्हणाला “गेले दोन दिवस एकच शर्ट वापरला, आता मळला आहे म्हणून धुवायला टाकतो आहे पण ह्या शर्टाला घामाचा दुर्गंध नाही.” हे ऐकून मलाही आश्चर्यच वाटलं.
आमच्याच ऑफिसमधली एक स्मार्ट मुलगी, काही कामासाठी केबिनमध्ये आली की असं वाटायचं की केव्हा एकदा हिचं काम संपवतो आणि ही बाहेर जाते. तिच्या पण घामाला विलक्षण दुर्गंध येत होता. मग विचार केला “हि पावडर पण हिला पण देऊन बघुया.” स्वत: त्रिफळा चूर्ण आणि बेलाच्या पानंचं चूर्ण आणलं आणि एकत्र करुन तिला दिलं. तिने विचारलं हे कशासाठी आहे? आता सांगणार काय म्हणून म्हटलं “हे टॉनिक चूर्ण आहे, तू इतकी थकल्या सारखी दिसते, दोन जिने ऑफिसचे चढून आली की धापा टाकते, त्यासाठी मी स्वत: तुझ्यासाठी ही पावडर बनवली आहे, रात्री झोपतांना अर्धा चमचा घेत जा.” ओ.के. सर म्हणून ती गेली. ८-१० दिवसांनी तिला विचारलं “आता कसं वाटतं आहे तुला?” सर, काहीच फरक वाटत नाही. माझा थकवा अगदी आहे तसाच आहे. पण सर माझ्या आईनी एक गोष्ट परवा मला सांगितली की माझ्या कपड्यांना जो घामट वास यायचा तो आता येत नाही. मग तीला खरी गोष्ट सांगावीच लागली. खरं तर मी तुला ही पावडर त्याच कारणासाठी दिली होती. पण तुला असं सांगितलेलं आवडेल की नाही असा विचार करुन मी “टॉनिक चूर्ण आहे” असं खोटचं सांगितलं होतं. हे कळल्यावर म्हणाली, “मी तुमचे कसे आभार मानू मला कळत नाही. सर इतके साबण बदलून बघितले, वेगवेगळे डिओ, अॅंडी परस्पिरंट वापरले, बॉडी स्प्रे वगैरे वगैरे, काहीही उपाय सोडले नाहीत पण घामाच्या दुर्गंधी पासून मला कधि मुक्ती मिळाली नाही. तुम्ही फार उपकार केलेत माझ्यावर. अशा प्रकारे आणखीन काही जणांवर हा प्रयोग करुन बघितला तर सर्वांनाच याचा फायदा होतो असं लक्षात आलं. मग जिज्ञासा म्हणून ह्या विषयी जास्त वाचायला सुरुवात केली. बेलाच्या पानांमध्ये असं काय आहे? त्याचा परिणाम कसा होतो? घामाची दुर्गंधी कशी येते? अभ्यास करतांना काही कोडी उलगडत गेली.
माणसाच्या शरिरात दोन प्रकारच्या स्वेद ग्रंथी असतात अॅपोक्राइन आणि अॅक्राइन ग्लॅंड, त्यापैकी अॅपोक्राइन ग्रंथी ह्या काखेत व जांघेत असतात आणि अॅक्राइन ग्रंथी इतर भागात असतात. अॅपोक्राइन ग्रंथींवर मेंदूतील विशिष्ट यंत्रणेचा प्रभाव असतो. शिवाय थायरॉइड नावाच्या ग्रंथीचे विशिष्ट हार्मोन ह्या अॅपोक्राइन ग्रंथींच्या कामावर नियंत्रण ठेवून असतात. हे नियंत्रण कमी अधिक झाले तर बगलेत घाम येण्याचं प्रमाण वाढतं. ते कपड्यांवर ओलावा आणतं आणि त्वचेवर सतत राहणारे कोरिनीफॉर्म बॅक्टेरिया त्याठिकाणी जमून मग ही दुर्गंधी निर्माण होते. हे कळल्यावर पुढे अभ्यास केला तो बेलाच्या पानांवर झालेलं संशोधन. त्यात अनेक उपयुक्त असे संदर्भ मिळत गेले. सर्वात महत्वाचा रिसर्च, घामाच्या दुर्गंधीच्या दृष्टिकोनातून बघायला मिळाला. बेलाच्या पानांमधील एक घटक हा थायरॉइड ग्रंथीवर योग्य नियंत्रण करतो आणि त्यामुळे अॅपोक्राइन ग्रंथींमधून होणारं स्वेद जनन कमी होतं. ह्या घटकाचा दुसरा परिणाम म्हणजे रक्तातील अनावश्यक किंवा वाढलेली साखर नियंत्रित केली जाते.
सगळा अभ्यास केल्यानंतर आयुर्वेदाचं महत्व आणखीनचं पटलं. आयुर्वेदात एंडोक्रायनोलॉजीचा अभ्यासही केला आहे असं लक्षात आलं, फक्त गणिताचं उत्तर दिलं आहे पण ते उत्तर कसं आणलं त्याची कृती मात्र दिलेली नाही. हा प्रश्न असेल तर त्याचं हे उत्तर, हे उत्तर कसं मिळालं हे संशोधन आपण वर्षानुवर्ष करतो, त्यात पी.एच.डी. मिळवतो, अॅवॉर्ड, मान सन्मान मिळतो पण हे काम कुणीतरी आधीच करुन ठेवलं आहे हे मात्र सोइस्करपणे विसरुन जातो. आयुर्वेदीय ग्रंथामध्ये एका एका श्लोकात अशी एकेक पी.एच.डी. लपली आहे.
— डॉ. संतोष जळूकर
फारच खूपयुक्त माहिती