सर्व वाद मागे पडून आता राष्ट्रकुल स्पर्धांना प्रारंभ होत आहे. देशाच्या संस्कृतीचे निदर्शक असल्याने अशा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत. या स्पर्धेमधून विविध क्रीडाप्रकारांमध्ये आयकॉन्स निर्माण होतील. हे आयकॉन्स होतकरू खेळाडूंना आकर्षित करतील. त्यांना उत्तम सुविधा मिळाल्या तर क्रीडाक्षेत्रात भारताचे भवितव्य उज्ज्वल राहिल. ही भावना हृदयी ठेवून राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेचा जल्लोष अनुभवायला हवा.
|
राष्ट्रकुल स्पर्धा एकदाची सुरू होत आहे. त्यात भारतासह एकूण 71 देश विविध क्रीडाप्रकारांमध्ये आपले कौशल्य आजमावून पाहणार आहेत. प्रत्येक देशाला पदके मिळवण्याची इच्छा असली तरी ठरावीक देशच पदकतालिकेत वरच्या क्रमांकावर राहतात. राष्ट्रकुल स्पर्धेची कामे सुरू असताना सगळीकडे भ्रष्टाचाराचे आरोप, निकृष्ट बांधकाम, खेळाडूंच्या गैरसोयी अशा अनेक नकारात्मक बातम्या बाहेर येत होत्या. आयोजन समितीला सर्वत्र दोष दिला जात होता. भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांमुळे भारताची प्रतिमा जगभरात मलीन होत होती. अनेक देशांच्या नामवंत खेळाडूंनी सुरक्षेच्या आणि इतर कारणांमुळे या स्पर्धेतून माघारही घेतली. अशा परिस्थितीत ही स्पर्धा यशस्वी करून दाखवण्याचे मोठे आव्हान देशापुढे आहे.
आता कॉमनवेल्थ फेडरेशन आणि विविध देशांनीही भारताला पाठिंबा दिला असून या स्पर्धा यशस्वी होतील असा विश्वास व्यक्त केला आहे. यापूर्वीचा वाद तुर्तास बाजूला ठेवून आयोजन समिती आणि सरकारने मिळून या स्पर्धा यशस्वी करून दाखवायला हव्यात. अशा स्पर्धा आपल्या संस्कृतीच्या निदर्शक असतात. आपल्याला भारतीय संस्कृती श्रेष्ठ असल्याचे दाखवण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. ही संधी आपण साधली पाहिजे. राष्ट्रकुल स्पर्धा आशियाई स्पर्धांएवढ्याच महत्त्वाच्या असतात. या स्पर्धांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धेप्रमाणेच विविध क्रीडाप्रकार एकाच वेळी सुरू असतात आणि त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष (किमान राष्ट्रकुलातील देशांचे) या स्पर्धेकडे लागून राहिलेले असते. त्यामुळेच सर्व खेळाडू या स्पर्धेसाठी जोरदार सराव करत असतात. प्रत्यक्ष स्पर्धेच्या वेळी उत्तम कामगिरी व्हावी म्हणून ते अथक परिश्रम घेत असतात. या परिश्रमांचे चीज होण्याची वेळ आली आहे.
यावेळी आपल्या खेळाडूंची तयारी चांगली झाली असल्याचे जाणवते. त्यामुळे यापूर्वीच्या राष्ट्रकुल स्पर्धांच्या मानाने यावेळी आपल्या पदकांची संख्या वाढू शकेल. पूर्वी आपल्याकडे खेळांना फारसे महत्त्व दिले जात नसल्यामुळेच राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये आपली कामगिरी निराशाजनक असायची. नेमबाजीमध्ये गेल्या 20 वर्षांमध्ये बरीच प्रगती झाल्याचे दिसते. आता टेनिस, टेबल टेनिस, बॅडमिंटन, वॉटरस्पोर्टस्, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, कुस्ती या खेळांमध्येही दर्जेदार खेळाडू तयार झाल्याने या खेळातील खेळाडूंकडून पदकांची अपेक्षा करता येऊ शकते. परंतु, अॅथलेटिक्स आणि जिम्नॅस्टिक्स या क्रीडाप्रकारांमध्ये भारताचे नाव कुठेही दिसत नाही ही खंत आहे. मेलबोर्न राष्ट्रकुल स्पर्धेच्या पदकतालिकेत आपला क्रमांक चौथा होता. यावेळी तो पहिल्या तीनमध्ये असावा अशी सर्वांचीच इच्छा आहे. यावेळी या स्पर्धा आपल्या देशात होत असल्याने खेळाडूंना घरच्या प्रेक्षकांचा पाठींबा मिळू शकेल. घरच्या प्रेक्षकांचा पाठींबा ही जमेची बाजू असल्याने त्यामुळे खेळाडूंच्या कामगिरीत निश्चितच सुधारणा होते. या स्पर्धेचे आयोजन नेटके करण्याची जबाबदारी इंडियन ऑलिम्पिक कमिटीवर आहे. पंतप्रधान मनमोहनसिंग यांनीही स्पर्धेच्या तयारीत जातीने लक्ष घालून स्पर्धा व्यवस्थित पार पडतील अशी खबरदारी घेतली आहे. त्यामुळे क्रीडारसिकांना स्पर्धेच्या निमित्ताने उत्तमोत्तम क्रीडाप्रकार पहायला मिळतील आणि विविध देशांमधील खेळाडूंचे कसब अनुभवायला मिळेल अशी आशा करायला हरकत नाही.राष्ट्रकुल स्पर्धेच्या तयारीसाठी 72 हजार कोटी रुपयांचा खर्च आला. एवढा खर्च करून ऑलिम्पिक दर्जाच्या सुविधांचे निर्माण झाले आहे. पुण्यात युवा राष्ट्रकुल स्पर्धांच्या निमित्ताने अशाच दर्जेदार सुविधा निर्माण झाल्या आहेत. या दोन्ही ठिकाण
च्या सुविधांचा यापुढील काळातही योग्य वापर व्हायला हवा. स्पर्धा संपल्यानंतर मैदाने ओस पडून जातात. यावेळी तरी तसे व्हायला नको. 72 हजार कोटींमध्ये आणखी दहा हजार कोटी रुपयांचे बजेट क्रीडा विकासासाठी आखले पाहिजे. 2016 मध्ये भरणार्याऑलिम्पिक स्पर्धांपर्यंत या सुविधांचा वापर झाला पाहिजे. ही क’ीडांगणे इतर कार्यक’मांना भाड्याने देण्यापेक्षा देशातील उदयोन्मुख खेळाडूंना त्यांचा लाभ मिळायला हवा. ही जबाबदारी इंडियन ऑलिम्पिक कमिटी, सरकार, विविध खेळांच्या संघटना आणि समाजाची आहे. प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून खेळ आणि खेळाडूंना प्रोत्साहन द्यायला
हवे. देशात चांगले प्रशिक्षक असल्याशिवाय दर्जेदार खेळाडू निर्माण होऊ शकत नाहीत. आजघडीला पंधरा ते वीस हजार चांगल्या प्रशिक्षकांची
आवश्यकता आहे. पटीयाला आणि ग्वाल्हेरला प्रशिक्षक तयार करण्याची केंद्रे आहेत. या केंद्रांकडे विशेष लक्ष देऊन उत्तमोत्तम प्रशिक्षक निर्माण होतील याची काळजी घ्यायला हवी.
आता पुढील काही दिवस प्रसारमाध्यमांचे लक्ष राष्ट्रकुल स्पर्धांकडेच असेल. क्रिकेटचे सामने सुरू असतानाही प्रसारमाध्यमांनी राष्ट्रकुल स्पर्धांना विशेष महत्त्व दिल्याने सर्वत्र खेळाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत खेळाडूंची कामगिरी कशी होते आणि स्पर्धेत किती नव्या विक्रमांची नोंद होते यालाही महत्त्व असते. ऑलिम्पिक, विविध खेळांच्या जागतिक स्पर्धा, आशियाई स्पर्धा यांच्यानंतर राष्ट्रकुल स्पर्धांचा क्रमांक लागतो. या स्पर्धेमध्ये विविध खेळ एकाच वेळी खेळले जात असल्याने चांगली वातावरणनिर्मिती होते. या स्पर्धा भारतात होत असल्याने आपल्यासाठी त्या ऑलिम्पिकएवढ्याच महत्त्वाच्या आहेत. देशातील खेळाडूंनी विविध खेळांमध्ये पदके मिळवली की त्यांची नावे घराघरात पोहोचतील. या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले की तो खेळाडू पुढील चार वर्षे त्या खेळाचा विजेता राहतो. त्यामुळे तो होतकरू खेळाडूंसाठी ‘आयकॉन’ ठरतो. या आयकॉन्समुळेच होतकरू खेळाडू त्या खेळाकडे आकर्षित होतात आणि त्यातून देशाला नवी गुणवत्ता सापडते. क्रिकेटच्या बाबतीत हेच झाले आहे. सुनील गावसकर, कपिल देव, सचिन तेंडुलकर, धोनी यांच्यासारख्या आयकॉन्समुळे क्रिकेटकडे दर्जेदार खेळाडूंचा ओघ सुरू असून भारत या क्षेत्रातील महासत्ता म्हणून ओळखला जातो. मानवजीत संधू, तेजस्विनी सावंत, अभिनव बिद्रा, विजेंदरसिंग, सुशीलकुमार, पेस-भूपती, साईना नेहवाल यांच्यासारख्या आयकॉन्समुळे या खेळांकडेही तरुणांचा ओढा वाढू शकेल. या स्पर्धेतून आणखी नवे आयकॉन्स मिळून अधिकाधिक तरुण विविध क्रीडाप्रकारांकडे आकृष्ट व्हावेत आणि दर्जेदार सुविधा मिळून त्यांनी सर्व स्तरांवर देशाचे नाव उज्ज्वल करावे हीच अपेक्षा.
(अद्वैत फीचर्स)
— भीष्मराज बाम, (प्रसिद्ध क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ)
Leave a Reply