नवीन लेखन...

चंद्रगुप्त मौर्य – एक धगधगती यशोगाथा



आजपासून साधारणपणे अडीच हजार वर्षांपूर्वी एका वीराने अखंड भारताचे स्वप्न बघत आपल्या मातृभूमीची पूजा बांधली होती. त्या वेळीपण भरतखंडातून आवाज उठला होता ‘स्वतंत्रते भगवती I त्वामहं यशोयुतां वंदे.’ आणि त्या आवाजाची गूंज मेसिडोनियापर्यंत जाऊन भिडली होती. त्या आवाजाने संपूर्ण ग्रीक साम्राज्याला हादरवून टाकले होते. तो योद्धा होता ‘चंद्रगुप्त मौर्य’. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या इतिहासाला इतिहासाचे पहिले सोनेरी पान म्हणून गौरविले तो हा पहिल्या स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास. या इतिहासाकडे वळण्याआधी त्या काळची व त्या आधीची परिस्थिती थोडी समजून घेतली पाहिजे.

भारत वैभवाच्या शिखरावर नांदत होता. भारतातील सर्वात प्रतापशाली अशा मगधसाम्राज्याच्या अधिपत्याखाली छोटी राज्ये सुखात नांदत होती. तक्षशिला विद्यापीठासारखे विद्यापीठ भारताचा गौरव वाढवीत होते. पण अशा भरतखंडाला दृष्ट लागली. त्याच्या मध्ये स्वार्थाचे आणि अहंकाराचे वारे वाहू लागले. गणराज्यामधला कलह वाढू लागला. मगधावर धनानंद नावाचा एक विषारी नाग कुंडली मारून बसला. प्रजेचे शोषण करण्यात व स्वतःचा व्यक्तिगत कोष भरण्यात तो धन्यता मानू लागला. सारी प्रजा त्याच्या त्रासाने पिचून गेली. राज्यसंस्थेच्या निर्मितीचा हेतू हा उपभोग नाही तर नियंत्रण आहे. एखाद्या व्यक्तीच्या वासना वा विकारांच्या पूर्तीसाठी ती जागा नाही.

प्रजेमधला असंतोष वाढत होता. पण खुनशी धनानंदाला त्याची फिकीर नव्हती. मगध साम्राज्याची ही परिस्थिती होती तर बाकी गणराज्ये स्वतःच्या क्षुद्र अस्मिता जपत एकमेकांच्यावर तलवारी चालवत होते. संपूर्ण भारतात अनागोन्दीचे वातावरण झाले होते. सुंदर मोत्यांचा हार इतस्ततः विखरून पडला होता. त्यातला प्रत्येक मोती गोळा करून सूत्रबद्ध करणारा कुशल कारागीर मिळत नव्हता. अशावेळी हिदुकुश पर्वतापलीकडून एका युद्धपिपासू, महत्वाकांक्षी विदेशी सम्राटाची नजर या मोत्यांकडे वळली. तो विदेशी सम्राट होता यवन सम्राट अलेक्झांडर.त्यावेळी या विराट भरतखंडाचे प्रवेशद्वार होते तक्षशिलेचे राज्य. या तक्षशिला राज्याचा राजकुमार होता आंभी. पण अलेक्झांडरच्या सैन्याविरुद्ध ढाल बनून उभे राहण्याऐवजी त्याच्या दिशेने आंभीने मैत्रीच्या पायघड्या घातल्या आणि अलेक्झांडर बरोबर एक पापी संधी केली. तक्षाशिलाधीशाने मांडलिकत्व पत्करताच अलेक्झांडर गर्वाने फुगून गेला. त्याने आजूबाजूच्या सर्व राजांना शरण येण्याचे फर्मान सोडले. काही कपाळकरंटे त्याला बिनशर्त शरण आले.

पण पुरुने अलेक्झांडरचे अधिपत्य स्वीकारायचे नाकारले. पुरुची सेना या परकीय सेनेचा मुकाबला करण्यासाठी पाय रोवून उभी राहिली. पण पुरुराजाचे दुर्दैव कि युद्धाला तोंड लागण्या आधीच अकस्मात मोठा वादळी पाऊस पडू लागला. सगळीकडे चिखलाचे साम्राज्य पसरले. पुरूच्या हत्तींना चिखलामुळे हलता येईना. रथ चिखलात रुतून बसले. पुरूचा दारुण पराभव झाला. या भरतभूमिचा एक अनमोल मोती अलेक्झांडरच्या ताब्यात गेला. पुरूला जिंकल्यावर देखील अलेक्झांडरची राज्यतृष्णा त्याला गप्प बसू देईना. पण पुढे अगदी छोट्या-छोट्या गणराज्यांनीदेखील ग्रीकसेनेच्या नाकात अगदी दम आणला. या सततच्या लढायांना ग्रीकसेना पूर्णपणे कंटाळली. अलेक्झांडरचा नाईलाज झाला. त्याने परत फिरण्याचा निर्णय घेतला. पण जाताना आपले दोन विश्वासू सेनानी फिलीप आणि निकोनर यांना क्षत्रप (गव्हर्नर) म्हणून नेमले.

तक्षशिला विद्यापीठातून दोन व्यक्ती या सर्व घडामोडींकडे डोळ्यात तेल घालून बघत होत्या. त्यातील एक होती, तरुण चंद्रगुप्त व दुसरी व्यक्ती होती आपल्या या दिव्य शिष्याला प्रेरणा देणारे त्याचे शिक्षक आचार्य चाणक्य.

या चंद्रगुप्ताची कथा मोठी विलक्षण आहे. याच्या जन्माबद्दल अनेक आख्यायिका आहेत. पण जागे अभावी सर्वात जास्त प्रचलित कथेचाच फक्त उल्लेख करतो. गौतम बुद्ध ज्या शाक्य जातीत जन्माला आले त्या शाक्य जातीतल्या एका समुहावर काही संकट आल्यामुळे ते टोळ्या-टोळ्यांनी वेगवेगळ्या भागात निर्वासित होऊन फिरत होते. त्या टोळीच्या सरदाराची बायको मुरा ही अतिशय सुंदर होती. जुलमी धनानंदाची विखारी नजर तिच्यावर पडली. त्याने त्या टोळीवर हल्ला केला. शाक्यांनी प्रखर विरोध केला पण धनानंदाच्या सेनेपुढे एवढ्याशा टोळीचा काय टिकाव लागणार. मुरेच्या नवऱ्याचा शिरच्छेद केल्या गेला आणि मुरेची रवानगी धनानंदाच्या अंतःपुरात झाली आणि त्या मुरेचा मुलगा म्हणजे चंद्रगुप्त. एका अर्थी धनानंदाचा दासीपुत्र. हा चंद्रगुप्त लहानपणापासूनच तेजस्वी आणि बुद्धिमान असा होता. त्याच्या बुद्धिमत्तेच्या अनेक कथा आहेत. तो लहानपणी जेव्हा धनानंदाच्या राजवाड्यात वाढत होता त्या वेळी त्याच्या बुद्धिमत्तेचा प्रभाव साऱ्यांवरच पडत होता. एकदा सिंहल प्रदेशाच्या राजाने एका पिंजऱ्यात एक हुबेहूब मेणाचा सिंह करून पाठवला आणि निरोप पाठवला कि जर तुमच्या राज्यात कोणी बुद्धिमान असेल तर पिंजरा न खोलता या सिंहाला बाहेर काढेल. चंद्रगुप्त पुढे झाला आणि त्याने लालभडक तापवलेली एक सळई घेतली आणि पिंजऱ्यात घालून त्या सिंहाला टेकवली, त्याबरोबर मेण वितळून भराभर पिंजऱ्यातून बाहेर आले.

त्याच्या याच बुद्धिमत्तेची धनानंदाला आणि त्याच्या बाकी परिवाराला भीती वाटायला लागली कि हा मोठा झाल्यावर आपल्या विरुद्ध असलेले मंत्री आणि राजकारणी याला हाताला धरून आपल्याला सिंहासनावरून खाली खेचतील. ज्यांनी कपटाने सत्ता बळकावलेली असते त्यांच्या मनात ही भीती कायम सतावीत असते. नंदवंशाने शिशुनागवंशाकडून अशीच सत्ता घेतली होती. नंदाने मुरेवर बदफैलीपणाचे आरोप करून, तिला आणि चंद्रगुप्ताला राजवाड्याबाहेर काढले. असहाय्य मुरा आपल्या लहानग्याला घेऊन भावाच्या आश्रयाला गेली. मामाने आपल्या या तेजस्वी भाच्याला गुरे वळायच्या कामाला लावले. अपमान आणि अवहेलना मनात घेऊन ती माऊली आपल्या लेकराला वाढवीत होती. मुरामात्र त्याच्या मनात जुलमी राजा विरुद्ध बंड करण्याची बीजे रोवीत होती.

दुसरीकडे आचार्य चाणक्य तक्षशीलेमध्ये ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत होते. त्याचवेळी तक्षशिलेचा राजकुमार आंभी मात्र अलेक्झांडरशी अपवित्र युती करण्यात दंग होता. या अभद्र युतीचा परिणाम त्यांना स्पष्ट दिसत होता. पारतंत्र्य. आणि पारतंत्र्य म्हणजे राष्ट्राच्या चैतन्यावर घाला. विदेशी आक्रमण म्हणजे देशाच्या संस्कृतीवर घाला. विदेशी आक्रमणकारी आपल्या बरोबर स्वतःची संस्कृती घेऊन येतो आणि जेता ती संस्कृती पराभूतांवर लादत असतो. राष्ट्राच्या सनातन संस्कृतीचा आणि जीवनमूल्यांचा ऱ्हास होतो. त्याचा परिणाम ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या गुरुकुलांवर होणार आणि त्यातून अस्मिताहीन पुढची पिढी निर्माण होणार.पुढे चंद्रगुप्ताच्या नंतरच्या काळात पुन्हा ग्रीकांचे आणि पर्शियन आक्रमण झाले तेव्हा त्यांनी आपली ब्राह्मी लिपी बंद करून खरोष्टी लिपीचा वापर सुरु केला. नंतर अशोकानंतर जेव्हा पुन्हा गीकांनी आक्रमण केले त्यावेळी तक्षशिलेच्या शिक्षण पद्धतीवर त्यांनी आपली छाप सोडलीच. तक्षशिला विद्यापीठात ग्रीक तत्वज्ञान व साहित्य शिकवल्या जाऊ लागले. आजूबाजूच्या लोकांनीदेखील जेत्यांची भाषा आत्मसात केली जेणे करून सरकार दरबारी नोकरी मिळणे सुलभ होईल. इंग्रजांच्या काळात आपण हे अनुभवलेले आहे. लॉर्ड मेकॉलेने ब्रिटीश पार्लमेंटमध्ये १८३५ मध्ये म्हटले होते,

“I have traveled across the length and breadth of India and I have not seen one person who is a beggar, who is a thief. Such wealth I have seen in this country, such high moral values, people of such calibre, that I do not think we would ever conquer this country, unless we break the very backbone of this nation, which is her spiritual and cultural heritage, and, therefore, I propose that we replace her old and ancient education system, her culture, for if the Indians think that all that is foreign and English is good and greater than their own, they will lose their self-esteem, their native self-culture and they will become what we want them, a truly dominated nation.”

आणि त्या शिक्षणपद्धतीतून केवळ गुलाम बनविण्याचे कारखाने तयार झाले. त्याचे परिणाम आपण आजपर्यंत भोगतो आहोत. जेत्याची आस्था ही कायम स्वतःच्या मायभूमीवर असते त्यामुळे येथील साधनसंपत्ती लुटून नेण्याचीच त्याची प्रवृत्ती असते. देश कंगाल बनतो. आचार्यांनी विदेशी आक्रमणाचा हा धोका ओळखला. त्यांनी तडक मगध सम्राट धनानंदाकडे प्रयाण केले. त्यांना माहित होते कि मगधच एक असे राज्य आहे, ज्यामध्ये अलेक्झांडरला रोखण्याचे सामर्थ्य आहे. आचार्य याचना करत होते पण धनानंदाच्या डोक्यात काही प्रकाश पडत नव्हता. सत्तेच्या नशेत चूर असणाऱ्या धनानंदाने आचार्य चाणक्यांना धक्के मारून दरबारातून बाहेर काढले. आचार्य संतप्त झाले. त्यांनी भर दरबारात प्रतिज्ञा केली, या धुंद, विवेकशून्य, नालायक राजाला सिंहासनावरून खाली खेचीन तेव्हाच मी माझ्या शेंडीला गाठ मारीन.

आचार्य राजसभेतून बाहेर पडले पण त्यांच्या जीवाची नुसती तगमग होत होती. आता कोण वाचवील माझ्या मातृभूमीला? . ते मगधाच्या बाहेर पडले, एका गायरानात एका झाडाखाली विश्रांतीसाठी थांबले तोच त्यांची नजर बाजूलाच खेळणाऱ्या मुलांकडे पडली. एक तेजस्वी मुलगा राजा झालेला होता आणि मंत्री झालेला मुलगा सांगत होता कि आपल्या राज्याच्या एका माणसाने या व्यापाऱ्याचे पैसे बुडवले पण हा व्यापारी काही आपल्या राज्यातला नाही. राजा झालेला मुलगा कठोरपणे न्याय करीत म्हणाला, मला राज्यांच्या सीमा दिसत नाहीत, सम्पूर्ण भारत हे एक राष्ट्र आहे असे मी समजतो म्हणून खोटे काम करणाऱ्याला शिक्षा ही झालीच पाहिजे. या राष्ट्रात कोणीही आपला नाही आणि परका नाही, राजाच्या दृष्टीने सर्वजण समान आहेत. हे ऐकल्यावर आचार्यांचे नैराश्याने भरलेले डोळे एकदम चमकले. त्यांना त्यांचा भावी सम्राट मिळाला होता. आचार्यांनी चंद्रगुप्तासह थेट तक्षशिला गाठली आणि त्याला शिक्षण द्यायला सुरवात केली. संघटनकौशल्य असलेला अचल, अडिग असा नेता आचार्य घडवीत होते.त्याला स्वातंत्र्याच्या प्रेरणा देत होते.

अलेक्झांडरच्या आक्रमणामुळे निर्वासित होऊन वनवासी झालेल्या लोकांना चंद्रगुप्त एकत्र करू लागला. तुमल लढाईशिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही हे पटवून देऊ लागला. स्वदेशाला तुमचे विचार, आणि रक्त अर्पण करण्याची वेळ आली आहे हे समजावू लागला. चंद्रगुप्ताने ग्रीक सेनेवर छुपे हल्ले सुरु केले. चंद्रगुप्ताची सेना अंधारातून एकदम भुतासारखी प्रगट होई, ग्रीकसेनेची धूळधाण उडवून पुन्हा अंधारात पसार होई. त्याचवेळी अलेक्झांडरच्या मृत्यूची वार्ता येऊन थडकली. ग्रीकसेनेला प्रचंड मानसिक धक्का बसला. ग्रीकसेना या धक्क्यातून सावरायच्या आतच एका रात्री अचानक चंद्रगुप्ताने ग्रीक छावणीवर छापा टाकला. प्रचंड कापाकाप सुरु झाली. त्या कापाकापीत एका अज्ञात तलवारीने क्षत्रप फिलिपच्या मस्तकाचा वेध घेतला. ही वार्ता वाऱ्यासारखी सम्पूर्ण भारतभर पसरली. ताबडतोब चंद्रगुप्ताच्या नेत्तृत्वाखाली भारतीय राज्ये एकत्र यायला लागली आणि त्यांनी ग्रीकांचे अधिपत्य झुगारून लावले. अलेक्झांडरच्या मृत्युनंतर अवघ्या वर्ष, सहा महिन्यात अलेक्झांडरची सत्ता, त्याचा ध्वज उखडून फेकण्यात आला. भारतमाता बंधनमुक्त झाली होती.

स्वराज्यसंस्थापना झाली होती पण धर्मसंस्थापना अजून बाकी होती. प्रजेला धनानंदाच्या जुलमी सत्तेपासून मुक्त करायचे होते. चंद्रगुप्ताने मगधाची राजधानी पाटलीपुत्रवर हल्ला बोल केला. निकराची लढाई झाली. चंद्रगुप्ताच्या सैनिकांनी धनानंदाचा शिरच्छेद केला. धर्मराज्याचा मार्ग मोकळा झाला होता. भारत पुन्हा एकसंध झाला होता. भारताला युधिष्ठिरासारखा सत्यनिष्ठ सम्राट मिळाला होता.

पण दुष्टचक्र अजून संपले नव्हते. सेल्युकस निकेटर नावाच्या शूर ग्रीक सेनानीने पुन्हा भारतावर आक्रमण केले. चंद्रगुप्ताने त्याला सीमेवरच गाठले आणि या तुंबळ युद्धात सेल्युकसचा जबरदस्त पराभव झाला. त्याने चंद्रगुप्ताशी तह केला. पर्शियापर्यंतचा भूभाग बिनशर्त चंद्रगुप्ताच्या स्वाधीन केला एवढेच नव्हे आपली मुलगी चंद्रगुप्ताला देऊ केली. भारतमाता आता निश्चिंत झाली होती कारण तिच्या सीमा आता तिच्या एका समर्थ सुपुत्राच्या हातात सुरक्षित होत्या.

— राजेंद्र भालचंद्र देशपांडे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..