जूनच्या शेवटच्या शनिवारी सौ. बरोबर टिक्की खाण्याचा बेत केला होता. पण दैव आडव आलं. हृद्याने दगा दिला. सर्जरी नंतर घरी आल्यावर आपल्या मनातील बेत सौ.ला सांगितला. ती म्हणाली, आता वर्षभर टिक्की वैगरे विसरा. पुन्हा खाटल्यावर पडल्यास मी काही सेवा करणार नाही. त्याच दिवशी रात्री स्वप्न पडलं…..
उत्तम नगर येथील भोलू चाटवाल्याची आलूची टिक्की फार प्रसिद्ध होती. बाजारात मिळणाऱ्या आलू टिक्कीपेक्षा दुप्पट आकाराची, आत मध्ये भरपूर पनीर, काजू, किसमिस, वाटणे आणि चण्याच्या मोकळी डाळ भरलेली. शिवाय सजावटी साठी वर चिंच खजूरची चटणी, हिरवी चटणी, गोड दही, अदरकचे लांब काप, डाळींबाचे दाणे व चाट मसाला. स्वाद ही अप्रतिम. आलू टिक्कीचा रेट ८०रु प्लेट असला तरी ही रोज सायंकाळी टिक्की खाण्यासाठी ग्राहकांची लाईन लागायची.
काही दिवसांपासून एका कावळ्याने भोलू चाटवाल्याला हैराण-परेशान करून सोडले होते. हा कावळा दुकानात शिरून थेट ग्राहकांच्या प्लेट मधून टिक्की पळवायचा. भोलूच्या आरडा ओरड करून कावळ्याला दूर पळविण्याचा प्रयत्नाला कावळा काही दाद देत नव्हता. जालीम उपाय म्हणून भोलूने गुलेल विकत घेतली. दररोज प्रमाणे कावळा जसा टिक्की पळविण्याच्या उद्देश्याने दुकानाजवळ आला, गुलेल मध्ये दगड टाकून भोलूने त्यावर नेम धरला. निरीह कावळ्याला मारून तुला मुक्ती मिळणार नाही, तुझ्या समस्येचे समाधान होणार नाही, या आवाजाने भोलूचे ध्यान भंग झाले. त्याने समोर पहिले हातात एक कमंडल घेतलेला एक म्हातारा साधू उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर हास्य होते. साधूला पाहताच भोलू म्हणाला, महाराज या कावळ्याने मला हैराण परेशान करून सोडले आहे, कावळ्याला भिऊन ग्राहक येऊनासे झाले आहेत. तुम्हीच सांगा मी काय करू. साधू हसून म्हणाला, बेटा, कावळ्याला मारून ही समस्या दूर होणार नाही, अतृप्त प्रेतात्मा दुसरे रूप धरून तुला त्रास देईलच. भोलू म्हणाला, महाराज माझ्या असल्या भाकड कथांवर विश्वास नाही. साधू म्हणाला, स्वत:च्या डोळ्यांनी प्रत्यक्ष बघितल्या वर विश्वास होईल न, म्हणत साधूने कमंडलातले पंबी हातात घेऊन एक वर्तुळ जमिनीवर काढले. त्या अतृप्त आत्म्याला आव्हान केले. कावळा गुपचूप येऊन वर्तुळात बसला. तो पर्यंत काही बघे ही एकत्र झाले होते, तमाशा पाहण्यासाठी. साधूने कावळ्यास विचारले, तू या दुकानदाराला का त्रास देतो आहे, कावळ्याने काव-काव करत कावळ्याच्या भाषेत उत्तर दिले. साधूने पुन्हा विचारले, अरे पण अश्यारितीने टिक्की पळविणे म्हणजे पाप नाही का? त्याचे फळ तुलाच भोगावे लागणार ना. कावळ्याने पुन्हा काव-काव म्हणत उत्तर दिले. साधूला हसू आले, भोलूने विचारले महाराज हसताय का? साधू म्हणाला, कावळा म्हणतोय त्याच्या चोरून टिक्की खाण्यामुळे तुझ्या दुकानाला ही प्रसिद्धी मिळते आहे. भलतीच हुशार आहे ही अतृप्त आत्मा. भोलू म्हणाला, आपण काय म्हणताय महाराज, मला काहीच समजले नाही. साधू म्हणाला, भोलू, तुझ्या दुकानासमोर अपघात झाला होता का? भोलू म्हणाला, महाराज, जवळपास वर्षापूर्वी, रस्ता ओलांडून या बाजूला येणारा एक माणूस गाडी खाली आला होता. साधू म्हणाला, टिक्की खाण्याच्या हेतूने रस्ता ओलांडताना जो माणूस गाडी खाली आला, त्याचीच अतृप्त आत्मा कावळ्याचे रूप धरून आपली अतृप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी अर्थात टिक्की खाण्याच्या उद्देश्याने तुझ्या दुकानात येते. भोलू म्हणाला, महाराज, कदाचित! आपले म्हणणे खरे असेल, पण या वर उपाय काय? साधू म्हणाला, उपाय एकच, रोज पहिली टिक्की कावळ्याच्या नावाने अलग काढून ठेव. श्राद्धपक्षात आलू टिक्कीचा नवैद्य दाखवून कावळ्याचे श्राद्ध कर. त्याला ही मुक्ती मिळेल आणि तुला ही कावळा छळणार नाही. भोलूने साधू म्हणण्यानुसार रोज कावळ्या साठी टिक्की काढून प्लेट मध्ये ठेऊ लागला. कावळा येऊन ती टिक्की खात असे. हे दृश्य बघायला, शेकडोंनी लोक जमा होऊ लागली. साहजिकच आहे, त्या मुळे भोलू चाटवाल्याला भरपूर प्रसिद्ध मिळाली. श्राद्ध पक्षात त्याने आलू टिक्कीचा नवैद्य दाखवून कावळ्याचे श्राद्ध केले. अखेर त्या अतृप्त आत्म्याला मुक्ती मिळाली.
कथेची प्रेरणा: उत्तम नगर येथे एका दुकानात अप्रतिम आलू टिक्की मिळते. जूनच्या शेवटच्या शनिवारी सौ. बरोबर टिक्की खाण्याचा बेत केला होता. पण दैव आडव आलं. हृद्याने दगा दिला. सर्जरी नंतर घरी आल्यावर आपल्या मनातील बेत सौ.ला सांगितला. ती म्हणाली, आता वर्षभर टिक्की वैगरे विसरा. पुन्हा खाटल्यावर पडल्यास मी काही सेवा करणार नाही. त्याच दिवशी रात्री स्वप्न पडलं….. मी कावळा….
(माफ करा, अंधविश्वास पसरविण्यासाठी नाही केवळ गमंत म्हणून ही कहाणी लिहली आहे)
— विवेक पटाईत
10 August 2014
Leave a Reply