चाळिशीपर्यंत सगळेच जण आरोग्याकडे दुर्लक्षच करीत असतात. चाळिशी पार केली की मग मात्र शरीर धोक्याची घंटा वाजवायला लागतं. ती वेळेवर ऐकली आणि आहाराविहारात वयानुरूप बदल केले तर पुढचे अनेक धोके टाळता येतात.
दिवसेंदिवस मानवी जीवन खूपच वेगवान, धावपळीचे होत चालले आहे. एक काळ शहरी व ग्रामीण, जीवनात खूप वेग नव्हता; ‘वाघ मागे लागल्यासारखी’ धावपळ नव्हती; रात्रपाळी हा रोजचा जीवनमंत्र नव्हता; जेवण बहुधा घरचेच असे; पण आता सगळ्यांचीच जीवनशैली बदललेली आहे. आत्ताच्या ‘फास्ट’ युगात मानवी जीवनाचे सहा टप्पे करता येतील. पाच वर्षांपर्यंतचे शिशुजीवन, पंधरा-सोळा वर्षांपर्यंतचे बाल व नवतरुणाचे जीवन, अठरा ते पस्तीस-चाळिशीपर्यंत ऐन तरुणाईचा काळ, चाळीस ते साठपर्यंत तारुण्य व जबाबदारी असा सुंदर मिलाप असणारा; आयुष्यात काहीतरी निश्चित घडविण्याचा काळ; साठीनंतर ऐंशीपर्यंत ‘फ्रुटफुल’ आयुष्य जगण्याचा निवृत्तिकाळ व त्यानंतरचे नव्वदी-शंभरीपर्यंतचे ‘बोनस लाइफ’ यातील सर्वात महत्त्वाच्या चाळिशीनंतरच्या तरुणाईच्या निरंतर आरोग्याकरिता आहार, विहार व व्यायाम कसा असावा हे पुढील लेखात आपण पाहत आहोत.
आपला व्यवसाय व नोकरीधंदा चालू असताना वय वर्षे चाळीस-पंचेचाळीसपर्यंतचा काल हा ऐन तारुण्याचा, कर्तृत्वाचा, हिमतीचा, आत्मविश्वासपूर्वक वाटचाल करण्याचा, भविष्याबद्दल फिकीर न करता एका विशेष मस्तीत पौरुषत्वाने संपूर्ण जीवन, पुरेपूर रस घेऊन जगण्याचा काळ आहे. हा काल पित्ताचा काळ आहे, ऊर्जेची गरज असणारा व ऊर्जा खर्च करण्याचा काळ आहे. या काळांत कितीही आव्हाने, संकटे, अडचणी, प्रश्न उभे राहोत, ते पेलण्याची, त्यांना तोंड देण्याची हिंमत शरीर व मनाची असावी. असे आरोग्य निसर्गत:च अपेक्षित असते. ‘फरशीवर पडलो तर फरशीला खड्डा पडेल, मला काही होणार नाही,’ अशी हिंमत बांधूनच पुढे जावे लागते. या काळात कमावलेले शरीर व मन पुढील उतरणीच्या काळांत साथ देणारे असते. त्याकरिता कर्तृत्व दाखवता येईल याकरिता पुरेशी ऊर्जा, बलदंड शरीर कमवायलाच हवे व त्याचबरोबर पुढील आयुष्याकरिता उपयोगी पडेल असे काटक शरीर व नाना मगजमारीकरिता सामना देईल असा ‘वरचा मजला’ सक्षम हवा. या सक्षमतेकरिता संगतसुद्धा चांगलीच हवी. गृहस्थाश्रमाचा आदर्श कसा असावा, हे सांगणारे कविवर्य मोरोपंत काय म्हणतात?
सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो ।
कलंक मतिचा झडो, विषय सर्वथा नावडो ।।
आजकाल सकाळी पहाटे उठून फिरायला जाण्याची मोठीच ‘क्रेझ’ फक्त वृद्धातच नव्हे तर तरुणाईमध्येही आहे; ही मोठी आनंदाची बाब आहे. अलीकडे लहान-मोठय़ा शहरात जिममध्ये जाऊन, पैसे मोजून, शरीर कमावण्याचे प्रयत्न वाढत आहेत. पूर्वी घरच्या घरी सकाळी उठल्या उठल्या; ‘आईच्या नावाने दोन, वडिलांच्या नावाने दोन व देवाच्या नावाने दोन’ असे सहा सूर्यनमस्कार घातले जात. असे सूर्यनमस्कार किती ‘जिमवाले’ घालतात? अशा सहा सूर्यनमस्कारांपासून सुरुवात करावी; रोज एक-एक याप्रमाणे वाढवत किमान चोवीस-पंचवीस सूर्यनमस्कार सकाळी घालावेत. नंतर स्वस्थपणे दोन-तीन मिनिटे दीर्घश्वसन-प्राणायाम करावा. आवश्यकतेनुसार पश्चिमोत्तानासन, अर्धवज्रासन, कमान, मानेचे व्यायाम व सर्वात शेवटी शवासन करावे. या सगळ्यांकरिता बारा ते पंधरा मिनिटे पुरेशी होतात. हा व्यायाम आपल्या आयुष्यभरची आरोग्य इस्टेट कमावण्याकरिता नेहमीच साथ देतो.
कोणताही उद्योग, व्यवसाय, श्रमाचा वा बैठा असला तरी अन्न हवेच. या अन्नात आपल्या राहणीमानानुसार गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी अशी पोटभरू धान्ये आहेत. मराठी माणसाच्या प्रकृतीला व येथील हवामानाला धरून कोकणांत तांदूळ व नाचणी किंवा नागली व देशावर जोंधळा वा ज्वारीच हितकर आहे.
चाळिशीच्या आसपास पोचलेली व्यक्ती, मग ती व्यापारी वा नोकरदार असो; व्हाइट कॉलर वा ब्लू कॉलर असो; धनवान वा हातावर पोट असणारा मजूर असो; शेतात, रस्त्यावर, खाणीत, खाडीत राबणारा; श्रमसंस्कृती जपणारा कर्मचारी असो. या सर्वाना रोज किमान दहा-बारा तास काम करावेच लागते. कामाच्या मानाने शरीराला दर क्षणाला ऊर्जेची, ‘पेट्रोलची’ गरज, शरीराची गाडी नीट चालविण्याकरिता लागते. आयुर्वेदात ‘अन्नं वृत्तिकरणां श्रेष्ठम्’ असे शास्त्रवचन आहे. कोणताही उद्योग, व्यवसाय, श्रमाचा वा बैठा असला तरी अन्न हवेच. या अन्नात आपल्या राहणीमानानुसार गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणी अशी पोटभरू धान्ये आहेत. मराठी माणसाच्या प्रकृतीला व येथील हवामानाला धरून कोकणात तांदूळ व नाचणी किंवा नागली व देशावर जोंधळा वा ज्वारीच हितकर आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात जे रोग त्रास देऊ शकतात असे मधुमेह, स्थौल्य, आमांश, आमवात, संधिवात, मूळव्याध, प्रमेह, हृद्रोग, रक्तदाब, दमा, स्थौल्य, अर्धागवात, सायटिका, सूज, मूत्रपिंडाचे विकार, ग्रहणी, अग्निमांद्य, पोटात गॅस धरणे, बुद्धिमांद्य, त्वचाविकार या सगळ्या विकारांना शरीरांत साठवायला थारा द्यायचा नसेल तर ‘ज्वारी सकाळी व जोंधळा सायंकाळी’ असे प्रमुख अन्न असावे. ज्वारीत फाजील कोलेस्टरॉल नाही, याउलट पोट भरण्याकरिता व कितीही श्रम शरीराला सहन होतील अशी ऊर्जा आहे. त्याला तेल तूप लागत नाही. शिळी भाकरी झाली तरी खराब होत नाही. नुसत्या पाण्याबरोबर ज्वारीची भाकरी खाता येते. क्वचित ज्वारी थंड पडते, त्यांनी त्यात बाजरी मिसळून भाकरी करावी. बाजरीत ज्वारीचेच गुण आहेत. पण बाजरी उष्ण आहे. काहींना बाजरी खाल्ल्यावर शौचाला रक्त पडते. बाजरीची भाकरी तारतम्याने वापरावी, शक्यतो ज्वारीचाच वापर करावा. ज्वारीचे मी कितीही गुणगान केले तरी लोक गहू वापरणारच, कारण घरोघरी, हॉटेलमध्ये, बेकरीच्या पदार्थात सर्वत्र गहू आहेच. हा गहू महाराष्ट्रात दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आला व त्याने आमच्या मोठमोठय़ा ज्वारीला दुय्यम स्थान दिले आहे. स्थूल व मेदस्वी व्यक्तींनी सुकी चपाती आणि कृश व वातप्रधान व्यक्तींनी व्यवस्थित तेल घालून गव्हाची पोळी खावी. भावी आयुष्यात ज्यांना मधुमेहाचे भय आहे त्यांच्याकरिता मेथीपोळी व आमांश, आमवात, मलावरोध, संधिवात, सायटिका, फ्रोजन शोल्डर यांच्याकरिता एरंडेल पोळी आहे. पण ऐन तारुण्यात या सवयी लावून घेऊ नयेत. ज्यांना भाताशिवाय चालत नाही त्यांनी शक्यतो जुना तांदूळच वापरावा. मिळाला तर हातसडीचा तांदूळ वापरावा. त्यामुळे शरीरात नाना तऱ्हेचे सूजेचे विकार होण्याची कारणे टळतील. नवीन तांदळामुळे आमांश, सर्दी, कफ हे विकार बळावतात. नाचणी किंवा नागली हे धान्य अशक्त व्यक्ती, हलका कोठा असणारे, दीर्घ काळचा ताप वा अन्य आजारांतून उठण्याकरिता आहे. भरपूर श्रम करणाऱ्यांकरिता त्याची गरज नाही.
कडधान्य त्यांत तूर, मूग, मसूर, उडीद, हरभरा, वाटाणा हे सगळे पचवायची तारुण्यात पचनशक्ती असावयास हवी. पोटांत वायू धरू नये म्हणून त्यांच्याबरोबर आले, लसूण, जिरे अशी योजना असावी. पालेभाज्या, फळभाज्या या ऋतुमानानुसार सर्वच खाव्यात, पचवाव्यात, बटाटा व कांदा हे सर्वाचेच रोजचेच आवडीचे असो-नसो, गरजेचे तोंडी लावण्याचे अन्न आहे. यांतील कांदा हा अधिक चांगला. त्यात रोगप्रतिकारशक्तीआहे. भाज्यांमध्ये लसणीचा वापर न करिता स्वतंत्र लसूण नियमितपणे खाल्ला तर भावी आयुष्यांत ‘दर क्षणाला टिकटिक करीत चालेल असे हृदयाचे घडय़ाळ’ कधीच दगा देणार नाही. याप्रमाणेच जेवणात आले असेल तर आमाशय म्हणजे पोटाचे स्वास्थ्य नीट राहील. माझ्या लहानपणात खूप फळे खावयाची सार्वत्रिक सवय नव्हती. अलीकडे फळांचे बंड खूप माजले आहे. ऋतुमानानुसार सर्वच फळे चांगली. दीर्घायुष्याकरिता फलाहार जरूर असावा. त्यातल्या त्यात पपई, डाळिंब, ताडफळ, सफरचंद, वेलची केळे, पांढरे खरबूज, नारळाचे ओले खोबरे, अंजीर, केमिकल्सवर न पोसलेली गोलाई असलेली आंबट नसलेली द्राक्षे, अननस यांचा तारतम्याने व खिशाला परवडेल असा वापर करावा. दैनंदिन आहारात फाजील तेल, तूप, मीठ, मिरची, तिखट मसाला नसावा. डालडा किंवा तत्सम वनस्पतिजन्य तेल टाळावेच. कारण त्यामुळे केस, दृष्टी, हृदय, मेदसंबंधी विकार नक्कीच बळावतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.लोकप्रभा/ वैद्य प. य. वैद्य खडीवाले
Leave a Reply