आजकाल सतत एक उपदेश ऐकवला जातो. वैज्ञानिक दृष्ठिकोन बाळगा. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याची आत्यंतिक गरज आहे. समाजधुरीण, रातकीय नेते, शिक्षणमहर्षी, एवढंच कशाला पण गल्लीतल्या सत्यनारायणाच्या पूजेला पाहुणा म्हणून बोलावलेला एखादा अभिनेता किंवा असाच पेज थ्रीवरचा सेलिब्रिटीही आपल्याला ते सुनावून जातो. पण वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगायचा म्हणजे नेमकं करायचं काय असा उलट प्रश्न जर या मंडळींना विचारला तर त्याचं उत्तर त्यांना सहजासहजी देता येईलच असं नाही. एकतर तसं उत्तर देण्याचं टाळलं जाईल किंवा आज आपण विज्ञानयुगात आहोत, जगानं बरीच प्रगती केली आहे, माणूस चंद्रावर जाऊन पोचला आहे, अशा वेळी आपल्याला मागे राहणं कसं परवडेल? अशी सुरुवात करून एखादं लंबंचवडं भाषण ठोकलं जाईल. पण त्यानंतरही आपल्या डोक्यात फारसा उजेड पडणार नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा संबंध कुठंतरी विज्ञानाशी आहे आणि ती भानगड आपल्याला पेलवणारी नाही असा समज करून घेऊन आपण आपला आयुष्यक्रम मागील पानावरून पुढं चालू असाच चालू ठेवू.
खरं तर वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात करण्यासाठी विज्ञानाची माहिती हवी, विज्ञानसाक्षर असणं आवश्यक आहे हा समजच मुळी चुकीच्या गृहीतावर आधारलेला आहे. विज्ञानसाक्षर असणं तर सोडाच पण निरक्षर असलेली मंडळीही वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून असतात. आपल्या नेहमीच्या व्यवहारात ही मंडळी त्याचं पालन करत असतात. पण कस्तुरीमृगाला जसं त्याच्या बेंबीतच कस्तुरी असल्याचा पत्ता नसतो तशीच या मंडळींनाही आपण अडाणी आहोत तेव्हा ही शिकलेली मोठी मोठी मंडळी जे काही करायला सांगताहेत ते आपल्याला करणं शक्यच नाही अशी स्वतःची फसगत करून घेतात. विनाकारण त्या भ्रामक ओझ्याखाली स्वतःचे खांदे पाडून वावरतात. त्यांना जर का हे सांगितलं की वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं म्हणजे डोळे झाकून कोणतीही गोष्ट करण्याऐवजी तिची चिकित्सा करण, बाबा वाक्यं प्रमाणम् न माता त्याविषयी प्रश्न विचारणं. त्याची सयुक्तिक उत्तरं शोधणं आणि ती पटल्यावरच मग त्या बाबतीत काही कार्यवाही करणं म्हणजेच वैज्ञानिक दृष्ठिकोन तर मग त्यांच्या मनावर उगीचच दडपण राहणार नाही.
— डॉ. बाळ फोंडके
Leave a Reply