आपला शेजारी आपला पहिला शत्रू असतो हे चाणक्याचे म्हणणे होते. आपल्याला अश्या अनेक अगणिक कर्तबगार महात्म्यांचा वारसा लाभूनही आपण त्याच चुका करतो. सगळे माहित असूनही आपण बोलतो काय लोकांना सांगतो काय आणि वागतो काय या कडे लक्ष दिले पाहिजे. १९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण करून आपला बराच मोठा भूप्रदेश गिळंकृत केला. त्यातून आपण काही धडा शिकलो का? २०/१०/ २०१२ पासून चीन-भारत युद्धाला ५० वे वर्ष झाले. ६२ च्या युद्धानंतर चीनने थेट जरी आपली कुरापत काढली नसली, तरी अरुणाचल प्रदेशावर अद्यापि चीन दावा करीत आहे. चीनकडून प्रतिस्पर्धी म्हणून आपल्याला सर्वाधिक धोका संभवतो. भारताभोवती ‘ड्रॅगन’ चा विळखा आणखी आवळत चालला आहे. सेशेल्समध्येही आता चीन नवा नाविक तळ उभारत आहे. या निमित्ताने चीनचा हिंदी महासागरातील वावर वाढणार आहे. याचा भारताच्या नाविक सामर्थ्याला असलेला धोका आपण तातडीने ओळखला पाहिजे. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी नुकतेच ‘चीन भारतावर आक्रमण करणार नाही,’ असे विधान केले.
सैन्याची गरज नाही
१९६१ च्या नोव्हेंबपर्यंत दिल्लीमध्ये पाकिस्तानबद्दल जास्त काळजी व्यक्त केली जात होती. चीनकडून मात्र युद्धात्मक कारवाई सतत नाकारली गेली. ही वास्तविकता आजही आहे. संरक्षण मंत्रालय वगळता अन्य समजतात, की चीन पुन्हा भारतावर आक्रमण करणार नाही.२० ऑक्टोबर १९६२ रोजी चीनने लडाख क्षेत्रात लष्करी आक्रमणास सुरुवात केली. हे युद्ध जवळजवळ एक महिना चालले आणि २० नोव्हेंबरला चीनने एकतर्फी युद्धविरामाची घोषणा केली. गांधीजी नि सरदार पटेल यांच्या निधनानंतर पंडित नेहरू हे देशाचे सर्वेसर्वा नेते झाले. ते म्हणतील ती पूर्व दिशा. भारतीय सेनानींची बैठक भरवून सैन्य नि युद्ध या संबंधी “छोटा प्रबंध तयार केला. प्रबंध चाळल्यावर नेहरू म्हणाले आम्हाला सैन्याची गरज नाही. पोलीसदल पुरे आहे. आमचे धोरण अहिंसा आहे.’ नेहरूनी काश्मिरमध्ये सैन्य पाठवले. हैद्राबादमध्ये सैन्य पाठवले. गोव्यात सैन्य पाठवले. आपण बोलतो काय नि कृती काय करतो याचे भान न ठेवणारे हे नेतृत्व होते. नेहरू म्हणाले, “देशाच्या संरक्षणाचे अनेक मार्ग आहेत. परदेशांशी मैत्री ठेवण्याच्या धोरणांमुळे देशाचे संरक्षण अन्य कुठल्याही मार्गापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकते.’ पं. नेहरूंनी परराष्ट्र नीतीचे हे मुख्य आधारस्तंभ उभे केले, ते कोसळले. सीमा संघर्षाच्या संबंधात नेहरू म्हणाले, “जगभर शांततेचा ध्वज नेण्याचे उद्दिष्ट होते.’ आणि आमचा विश्वासघात झाला. चीनने आमचा विश्वासघात केला.
सीमावाद कसा निर्माण झाला
चीन-भारत यांच्यातील सीमावाद कसा निर्माण झाला, कसा वाढत गेला नि त्याचा स्फोट कसा झाला?. चीनने तिबेटचा कब्जा घेतला तेव्हापासून सीमेचा प्रश्न पुढे आला, मॅकमेहान या ब्रिटीश अधिकार्यासने आखलेली सीमारेषा ही तिबेट भारत सीमारेषा आहे. नेहरूंनी फॉरवर्ड पॉलिसीचे धोरण आखले नि ते कृतीत आणण्याचा आदेश दिला. तेव्हा सेना दलाने, “फॉरवर्ड पॉलिसी जोराने राबवली तर चीनची प्रतिक्रिया तीव्र होईल, पश्चिम विभागाकडे साहित्याचा खूप अभाव असल्याने जर मोठ्या संख्येने चिनी सैनिक घुसले तर त्यांना तोंड देणे सैन्याच्या शक्तीपलीकडचे आहे,’ असे सांगितले. राजकारणी नि सनदी अधिकारी यांना सैनिक प्रश्नांचे नि तंत्रज्ञानाचे ज्ञानच नव्हते. या अज्ञानामुळे ते राजकीय निर्णय घेताना सैनिकांना विचारात घेत नसत. त्यामुळेच सीमायुद्ध झाले नि त्यात भारताचा सपशेल पराभव झाला.
युद्धाची तयारी
आपली तयारी कमी होती. याचे कारण युद्धाची परिस्थिती उद्भवली तर अन्य देश आपल्या मदतीला येतील, अशी आपली समजूत होती. याउलट चीनने युद्धाची व्यवस्थित तयारी केली होती. शस्त्रास्त्रांच्या बाबतीत आपण पेक्षा मागे होतो. मात्र आपल्याला गुप्तहेर विभागाचे जे अहवाल आणि जी माहिती मिळत होती ती चुकीची होती. चीनची विमाने मद्रासपर्यंत येऊन हल्ला करतील, असे या माहितीमध्ये होते. चीनने विमानातून बॉंबहल्ला करायचा विचार केला असता तरी त्यांची विमाने फार फार तर गोहत्तीपर्यंत येऊ शकली असती. आपल्या हवाई दलाचा वापर न करण्याचा जो निर्णय घेतला तो देखील चुकीचा ठरला. आपल्या सेनेकडे चीनच्या तुलनेत शस्त्रास्त्रे व सराव आणि प्रशिक्षणाचा अभाव होता. डोंगराळ प्रदेशात लागणारी युद्धसामग्री, तसेच तेथे लागणारे हाय अलटीट्य़ूड कपडॆ नव्हते. त्या भागात चांगले रस्तेही नव्हते. आपण तेथील जवानांच्या तुकड्यांना रसदही पाठवू शकत नव्हते.
चीनची तयारी उत्तम होती. त्यांनी रस्त्याचे जाळे बांधले होते. त्यांनी सैन्याला उत्तम शस्त्र पुरवठा केला होता. उबदार कपडे पुरवले होते. या सैन्याची संख्या मोठी होती. आणि ते अधिक सैन्य आणू शकत होते. 1962 चे युद्ध म्हणजे चीनने नियोजनपूर्वक केलेला हा हल्ला होता. शत्रूवर आक्रमण करताना संरक्षण करत असलेला एक शिपाई असेल, तर हल्ला करणारे कमीत कमी तीन सैनिक पाहिजेत. म्हणजे 1:3 असे प्रमाण युद्धात असावे, 1962 च्या युद्धात चीनचे 1:10 HUMAN WAVE TACTICS) असे प्रमाण होते. चीनने पूर्ण ताकदीनिशी हल्ला चढविला होता.
ऑक्टोबर 1961 पर्यंत चिन्यांनी लडाख ते नेफापर्यंत 61 नवीन चौक्याT स्थापल्या होत्या. मे 1962 मधील एका अंदाजानुसार स्थळ सेनेच्या ८-१० डिव्हिजन (८०,०००-१,०००,०० ) चिन्यांनी तैनात केल्या होत्या.1959 पर्यंत भारत-चीन सीमा ही संरक्षण खात्याच्या हाताखाली नव्हे, तर परराष्ट्राच्या अधिकार क्षेत्रात होती. चीनचा मनोदय लक्षात आल्यावर नोव्हेंबर 1959 मध्ये प्रथमच सिक्कीम ते ब्रह्मदेश जंक्शनचा 1075 किलोमीटर लांबीच्या प्रदीर्घ सीमेवर केवळ एक इंफट्री डिव्हिजन (१५,०००) हलवण्यात आली. त्यातील एक ब्रिगेड नेफामधील कामेंग विभागासाठी आणि दुसरी ब्रिगेड बाकी तीन सुबान्सिरी, सियांग व लोहितसाठी तैनात करण्यात आली. एप्रिल 1960 मध्ये लडाखमध्ये 114 इंफट्री ब्रिगेड हलवण्यात आली. हे संख्याबळ अत्यंत नाममात्र होते. त्यांना कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण, युद्धसामग्री, संचारसाधने दिली गेली नव्हती.
“ऑपरेशन ओंकार’ (फॉरवर्ड पॉलिसी)
“ऑपरेशन ओंकार’ या नावाच्या प्रकल्पाखाली आसाम रायफल्स या निमलष्करी दलाच्या मोठ्या प्रमाणात विस्तार करून त्यांच्या तुकड्या सीमेवर तैनात करण्याचे आदेश देण्यात आले. 2 नोव्हेंबर 1961 रोजी घेतलेल्या एका अत्युच्च बैठकीत नेहरूंनी सैन्याला जास्तीत जास्त पुढे जाऊन गस्त (पेट्रोलिंग) घालण्याचे, तर नेफामध्ये सीमेच्या जितके निकट जाता येईल तेवढे जाऊन मोर्चे बांधण्याचे निर्देश जारी केले. नेफामधील हे धोरण “फॉरवर्ड पॉलिसी’ या नावाने प्रसिद्ध आहे. चीन हल्ला करणार नाही यावर आधारलेले हे धोरणच भारताच्या पराजयाचे मूळ ठरले. चिनी सैनिकांकडील अद्ययावत शस्त्रास्त्रांपुढे आपली शस्त्रे अगदीच जेमतेम होती.नेफा भागातून तर सैनिकांना अक्षरशः मागे फिरावे लागले. शत्रूशी लढताना जेवढे शहीद झाले नसते, त्याच्यापेक्षा जास्त मागे फिरताना मृत्युमुखी पडले. नेहरू आणि मेनन यांच्या खासगी विश्वासातील कौल यांची या अत्यंत मोक्याच्या जागेवर आणीबाणीच्या वेळी नेमणूक, ही घोडचूक होती.
— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
Leave a Reply