घरातली मुलांची भांडणं हा काही नवीन प्रकार नाही. पण त्यातला विशेष प्रकार म्हणजे पालकांची मुलांसोबत भांडणे. या सेक्शन मधे अनेक उपप्रकार आहेत. आज त्यातलाच एक पाहू. काहीवेळा पालकच मुलांशी भांडण उकरुन काढतात.
मुलांशी मस्त भांडतात. पण नंतर त्यांना असं वाटतं की मुलेच आपल्याशी भांडत होती. अशावेळी त्या मुलांची फार पंचाईत होते. कारण आपल्या मनातील राग किंवा आपल्याला पालकांची न आवडलेली गोष्ट ही मुले आपल्या भांडोर्या पालकांना स्पष्टपणे सांगू शकत नाहीत. पालकांचा अभिनिवेश पाहून ही मुले एकतर एकदम चुप्प बसतात किंवा भोकांड पसरतात. आणि मग त्या पालकांची खात्रीच पटते की,‘आपलं वागणं योग्य असल्यामुळेच, मुलाची ही नाटकं सुरू आहेत.’
भांडणासाठी प्रथम कारणीभूत असते ती आपली भाषा आणि नंतर आपली कृती. ही भाषा आणि कृती पूर्णतः अवलंबून असते ती आपल्या दृष्टीकोनावर; म्हणजे आपण त्या घटनेकडे कशाप्रकारे पाहातो त्यावर. अगदी कालच घडलेला प्रसंग तुम्हाला सांगतो. त्यावरुन तुम्हीच काय ते ठरवा.
यात भरीस भर म्हणून,पालक सभा सुरू असतानाच हॉलच्या बाहेरुन बटाटे वड्यांचा वास व कपबशांची किणकिण ऐकू येऊ लागली. साहजिकच पालकांची चुळबूळ वाढली. मुलांना उपजतच शहाणपण असल्याने, त्यांना पालकांच्या चुळबुळीचे कारण समजले. मुलांनी पालकांना पुरक व प्रेरक ठरतील असे हट्ट सुरू केले. थोडक्यात, तज्ञ मार्गदर्शक बोलत असतानाच अनेक पालक मार्गस्थ होऊ लागले. प्रचंड गोंधळ सुरू झाला. याच सुमारास ती घटना घडली. स्टेज जवळ एक मुलगा रडत आला आणि म्हणाला,“माझे बाबा मिळत नाहीत.” त्याचे रडणे सुरूच.
एका पालकाने त्याचे नाव विचारले व अनाउन्स केले की,“प्रदीप लेले नावाचा मुलगा हरवला आहे. त्याच्या बाबांनी कृपया स्टेज जवळ यावे.” हे त्या मुलांने ऐकताच संभाव्य धोक्याची कल्पना त्याला आली. त्याने आपला रडण्याचा स्पीड व आवाज दोन्ही वाढवला. पण त्याच क्षणी एका ‘मूल मित्र’ शिक्षकाने माइक हातात घेतला आणि ते म्हणाले,“प्रदीप लेले इथेच आहे. हरवले आहेत त्याचे बाबा!! तरी कृपया हरवलेल्या पालकांनी स्टेज जवळ यावे.” आता प्रदीपच्या जीवात जीव आला. इतक्यात तोंडात बटाटे वडा कोंबत बाबा स्टेज जवळ आले. त्याक्षणी प्रदीप शिक्षकांच्या जवळ सरकला. बाबा काही बोलण्याआधीच ते शिक्षक म्हणाले,“प्रदीपला अजिबात ओरडायचं नाही. कारण कार्यक्रम संपेपर्यंत कुणीही हॉल सोडून जायचं नाही अशी स्पष्ट सूचना सगळ्यांनाच दिलेली होती…. मला काय म्हणायचं आहे, हे तुम्हाला कळलं असेलच?”हे ऐकल्यावर प्रदीपच्या बाबांना तोंडातला वडा धड गिळता येईना आणि बाहेर ही टाकता येईना. बाबांनी मान हलवली आणि प्रदीपचा हात धरुन ते गर्दीत मिसळले.
‘परस्परांतल्या खळाळणार्या विश्वासात भांडणे विरघळून जातात’ ही चिनी म्हण लक्षात ठेवा.
— राजीव तांबे
Leave a Reply