“जग जाहिरातीचं अर्थात जाहिरात विश्वाचे अंतरंग”
“जग जाहिरातीचं अर्थात जाहिरात विश्वाचे अंतरंग” हे नागपूर येथील नचिकेत प्रकाशनाने प्रकाशित केलेले लेखक सुधाकर घोडेकर यांचे पुस्तक वाचण्यात आले. जाहिरात या विषयावर मराठीतून पुस्तक प्रसिद्ध होणे म्हणजे तसे अप्रुपच. सुधाकर घोडेकर यांच्या या पुस्तकावरून नजर टाकली तरी त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत जाहिरातीच्या व्याख्येपासून ते बाजारातील सर्व्हे अत्यावश्यक चाचपणी या विषयापर्यंत जाहिराती संदर्भात मुद्देसुूद माहिती दिली आहे. मराठीत जी काय जाहिरात या विषयावर पुस्तके प्रकाशित झाली असतील त्यात सुधाकर घोडेकर यांच्या उपरोक्त शीर्षकाच्या पुस्तकाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.
लेखक बॅंकेचे व्यवस्थापक राहिलेले असल्याने तसेच गेली 15-16 वर्षे जाहिरात क्षेत्रातच काम करीत असल्याने त्यांचा या क्षेत्रातील अनुभव दांडगा असल्यानेच जाहिरात विषयावर ते अधिकारवाणीने लिहू शकले, असे म्हणावे लागेल. अन्यथा या विषयावर लिहिणे ही सोपी बाब नाही.
जाहिरातीचा इतिहास या प्रकरणात ते जाहिरातीच्या व्याख्येपासून सुरूवात करून मनोरंजक शैलीत आपल्याला 300-400 वर्षांपूर्वीची जाहिरात ते अत्याधुनिक जगातील जाहिरातीची माहिती देतात.
आजचे युग हे धावपळीचे आहे. या धावपळीच्या युगात अत्यंत कमी वेळात आपली जाहिरात ग्राहकापर्यंत प्रभावीपणे कशी पोहोचेल, याचा विचार उत्पादक व जाहिरात क्षेत्रातील तज्ञ मंडळी करीत असतात. ग्राहकाला केंद्रस्थानी ठेवून जाहिरात तयार केली जात असते. ग्राहक एखादी वस्तू का खरेदी करतो? येथपासून ते ग्राहकाच्या गरजा, त्याची मानसिकता, त्याची आर्थिक कुवत, त्याची आवडनिवड, याचे अभ्यासपूर्ण विश्लेषण पुस्तकात करण्यात आले आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा तुम्हाला ग्राहक हा समजलाच पाहिजे, तरच तुम्ही योग्यप्रकारे जाहिरात करू शकाल.
जाहिरातीच्या क्षेत्राला एका बागेप्रमाणे लेखकाने संबोधले आहे. जाहिरात हे क्षेत्र सतत टवटवीत, रंगीबेरंगी असते. पण येथे अनेक चकवेही आहेत, भोवरेही आहेत तसेच वेगवान प्रवाहही आहेत. या सर्वांचा उहापोह लेखकाने एका प्रकरणात केला आहे.
आपले उत्पादन विकायचे आहे तर आंधळी कोशिंबीर हा खेळ खेळून चालायचे नाही, असा इशारा देत लेखक महोदय नेम चुकला की सगळेच बाण वाया जातात, या प्रकरणात जाहिरातीसंदर्भात कसे कसे जागरूक रहावयास हवे हे सांगतात.
आपल्या उत्पादनाची जाहिरात कोणत्या माध्यमातून करावयाची आहे, याची जाण ठेवून त्या दृष्टिनेच जाहिरात कशी परिणामकारक राहील, यावर लेखक महाशयांनी माध्यम या प्रकरणातून उपयुक्त माहिती दिली आहे. मासिके, वृत्तपत्रे, साप्ताहिके, रेडिओ, टेलिव्हिजन, होर्डिंग्ज, इंटरनेट व मोबाईलच्या माध्यमातून करावयाच्या जाहिरातींबाबत थोडक्यात परंतु महत्वपूर्ण माहिती दिली आहे.
आपण रस्त्यावरून जात असताना मोठमोठी होर्डिंग्ज आपले लक्ष्य वेधून घेत असतात. महानगरांमध्ये तर रंगीबेरंगी दिव्यांच्या माध्यमातूनही होर्डिंग्जद्वारे जाहिराती केल्या जात असतात. उपरोक्त माध्यमांचा सविस्तर विचार लेखकाने वेगवेगळ्या प्रकरणाद्वारे केला आहे. विशेष म्हणजे हे प्रत्येक प्रकरण वाचताना कोठेही वाचकाला कंटाळा येत नाही.
सर्वांत शेवटचे प्रकरण आहे. ङ्गमार्केट सर्व्हे : अत्यावश्यक चाचपणीङ्घ व्यवसायासाठी लागणाऱ्या जाहिरातींचेच नाही तर संपूर्ण मार्केटिंग/विपणन प्रक्रियेचे नियोजन करताना बाजार सर्वेक्षण (मार्केट सर्व्हे) अत्यंत आवश्यक आहे. व्यावसायिक उत्पादकाला व नाही तर सरकारलाही आपल्या योजना हाती घेताना, असे परीक्षण करून घ्यावे लागते. त्यानुसारच सरकार आपले पंचवार्षिक धोरण आखते. त्यानुसार विकासाची कामे हाती घेते.
मार्केट सर्व्हे आर्थिक निकषानुसार आपल्या उत्पादित मालाच्या विक्रीनुसार आवडी निवडी नुसार तसेच वयानुसार केला जात असतो. सर्व्हे करण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या कंपन्याही कार्यरत असतात.
थोडक्यात जाहिरात क्षेत्रात थोडक्यात परंतु समग्र प्रकाशझोत टाकणारे असे हे पुस्तक आहे. वृत्तपत्र विद्या शिकणारे विद्यार्थी एमबीए करणारे विद्यार्थी इतकेच नाही तर व्यावसायिक सुद्धा आपल्याजवळ बाळगू शकतील, त्याच्या कामी येईल, असे हे पुस्तक आहे. नचिकेत प्रकाशनने हे पुस्तक प्रसिद्ध करून मराठी साहित्याच्या क्षेत्रात जाहिरातीलाही किती महत्त्व असू शकते, याचे महत्व पटवून दिले आहे. पुस्तक खरोखर वाचनीय आहे.
जग जाहिरातीचे अर्थात जाहिरात विश्वाचे अंतरंग
लेखक : श्री. सुधार घोडेकर पृष्ठ : 160 किंमत : 175 रू.
प्रकाशक : नचिकेत प्रकाशन
मो. : 9225210130
— मराठी
Leave a Reply