उत्तर माहीत असूनही काही प्रश्न मुद्दाम विचारले जातात आणि अशा पृच्छांना शैली वगैरेंसारखी गोंडस नावे दिली जातात. कव्हर्समधून रॉबिन स्मिथपेक्षा जास्त जोरात कुणी चेंडू झोडला आहे का, हा असाच एक प्रश्न. १३ सप्टेंबर १९६३ रोजी दक्षिण आफ्रिकेत रॉबिन अर्नॉल्ड स्मिथचा जन्म झाला. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मात्र इंग्लंडकडून खेळला.
स्क्वेअर-कट हा ‘जजी’चा खास फटका. काही काळ त्याने आपले केस कापवून घेतलेले नसल्याने त्याला न्यायाधीशासारखा दिसणारा म्हणून ‘जज’ किंवा ‘जजी’ हे लाडनाव चिकटले. जुलै १९८८ मध्ये त्याने कसोटीपदार्पण केले. ब्रायन लाराने ज्या सामन्यात ३७५ धावांची खेळी केली त्या सामन्यात जजीने १७५ धावांची खेळी केली होती. हीच त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी ठरली. मंदगती गोलंदाजांविरुद्ध मात्र ‘जज’चे ‘जजमन्ट’ कोसळे. अनेकदा तो शेन वॉर्नचा स्वस्तातला बकरा बनला.
एदिसामधील पराभूत संघातील सर्वाधिक धावांची खेळी स्मिथच्या नावावर एके काळी होती. इंग्लिश संघासाठी ती आजही त्याच्याच नावावर आहे. १९९३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद १६७.
२००३ मध्ये प्रथमश्रेणी सामन्यांमधून निवृत्त झाला तेव्हा रॉबिन स्मिथ हा हॅम्पशायरकडून खेळलेला सी. बी. फ्राय यांच्यानंतरचा सर्वाधिक यशस्वी फलंदाज होता. दहा वर्षांहून अधिक काळ त्याने हॅम्पशायरचे प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये नेतृत्वही केले.
रॉबिन स्मिथच्या जन्मानंतर बरोब्बर ६ वर्षांनी व्हिक्टोरियातील अप्पर फर्नट्री गलीत कीथ वॉर्न यांना पुत्रप्राप्ती झाली. हा पुत्र एक नामी फिरकगुंडा बनला. वॉर्नी, हॉलिवूड आणि चिपमंक ही त्याची काही लाडनावे.
१९९२ मध्ये शेन वॉर्नने कसोटी-चौकटीचे मापटे ओलांडले भारताविरुद्ध कसोटी खेळून. सर्वाधिक कसोटी बळींचा विक्रम काही काळ त्याच्या नावावर होता. १,००० आंतरराष्ट्रीय बळींचा टप्पा ओलांडणारे केवळ दोन गोलंदाज आहेत. त्यापैकी एक आहे चिपमंक आणि दुसरा मुरली.
फलंदाजी करण्याची क्षमताही शेन वॉर्नजवळ आहे.
कसोटी सामन्यांमधून ३,००० हून अधिक धावा त्याने
जमविलेल्या आहेत. शतकाविना सर्वाधिक कसोटी धावा जमविणारांच्या यादीत त्याचा क्रमांक पहिला लागतो.
मैदानाबाहेरील काही घोटाळ्यांमुळेही वॉर्न चर्चेत राहिला आहे. अगदी संक्षेपात त्या घोटाळ्यांचा उल्लेख बुकींकडून पैसा स्वीकारणे, बंदी असलेल्या उत्तेजक द्रव्यांचे सेवन करणे आणि मदिराक्षींसोबतचे संबंध छुपे न राखता येणे असा करता येईल.
जानेवारी २००७ मध्ये वॉर्नी कसोटीजगतातून निवृत्त झाला. नंतर तो राजस्थान रॉयल्स या इंप्रिलीमधील एका चमूचा कर्णधारही झाला.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply