नवीन लेखन...

जवस आणि सांधेदुखी…नाण्याची दुसरी बाजू!!

सांधेदुखीवर औषध म्हणून ‘जवस’ वापरण्यावर एक पोस्ट फिरत आहे. यासंदर्भात लिहा म्हणून काहीजणांनी आग्रह केल्याने लिहितो आहे.
जवस म्हणजे काय?
सर्वप्रथम जवस आणि जव या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत हे लक्षात घ्या. जवस म्हणजे मराठीत अळशी; इंग्रजीमध्ये Flax seed. Linum usitatissimum हे जैवविज्ञानीय नाव. आधुनिक शास्त्रानुसार; या धान्याच्या तेलात omega 3 and omega 6 fatty acids असल्याने त्याचे सेवन आरोग्यास उपयुक्त आहे असे मत मांडले जाते. जवसाच्या तेलाच्या कॅप्स्युल जागोजागी विकत मिळतात ते याच दाव्याच्या आधारावर.
आयुर्वेद काय सांगतो?
जवस याला संस्कृतमध्ये अतसी असे म्हटले आहे. या अतसीचे गुणधर्म चरकसंहितेपासून ते निघंटू ग्रंथांपर्यंत सर्वत्र आढळतात. जवस हे उष्ण आणि स्निग्ध असल्याने वात कमी करणारे आहे. त्यामुळेच वाताच्या विकारात (सांधेदुखी वगैरे) त्याचा वापर केला जातो. कोलकुलत्थादि चूर्ण, सर्षपादि लेप, गोजिह्वादि क्वाथ अशा विविध औषधांमध्ये जवसाचा वापर होतो. सांगण्याचा मुद्दा इतकाच की आयुर्वेदाला जवसाचा वापर हा काही नवीन नाही. किंबहुना; जवसाचे तेल शरीराला लावणे, नाकात सोडणे, बस्तीसाठी वापरणे ते पोटात घेण्यास वापरणे अशा विविध मार्गांतून वापरावे असेही आयुर्वेद सांगतो.
तरीही त्याचा वापर कमी का?
सांधेदुखीवर उत्तम औषध असलेल्या जवसाचा वापर आयुर्वेदीय वैद्यांकडूनदेखील कमी प्रमाणात का होतो? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. याचे कारण जवसाच्या अन्य काही गुणकर्मांत दडलेले आहे. जवस हे अतिशय उष्ण आहे. कफाच्या काढ्यात अळशी घालून घेणाऱ्यांना त्याच्या उष्णतेने कफ कसा सुटून पडतो याचा अनुभव असेलच! या गुणामुळे ते पित्ताशी संबंधित विकार उदा. अम्लपित्त, आतड्यांतील जखमा, चक्कर येणे, रक्तस्राव, मासिक स्राव अधिक होण्याची तक्रार अशा तक्रारी असलेल्या रुग्णांमध्ये वापरल्यास त्रासदायक ठरते. जवसाचे तेल हे रेचक म्हणजे शौचाला पातळ करणारे आहे. सतत हरभरे खाणाऱ्या घोड्यांना रेचक म्हणून देण्यास याचा वापर होतो; यावरून आपल्याला त्याचा अंदाज यावा. गरोदर स्त्रिया, बाळंतीण, यकृतासंबंधी विकार असणारे आणि दारू पिणारे यांना जवस वापरल्याने दुष्परिणाम होण्याची पूर्ण शक्यता असते. याव्यतिरिक्त सर्वात महत्वाची बाब म्हणजे; जवस सतत वापरल्यास प्रजननक्षमता कमी करते. (याविरुद्ध त्याने प्रजजनशक्ती वाढते असे दावे करणारे लोक हे Flax seed oil चे उत्पादक आहेत हे लक्षात घेता; सुज्ञास अधिक सांगणे न लगे!) वरील सर्व बाबी लक्षात घेता; जवसाचा वापर अतिशय सावधपणे करणे हितावह असते हे आपल्या लक्षात आले असेलच.
प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. सरसकट एखादी गोष्ट चांगली; म्हणून प्रत्येकाने ती घ्यावी असे करून चालत नाही. यापूर्वीही वारंवार स्पष्ट केल्याप्रमाणे; प्रत्येक रुग्णाच्या बाबतीत किमान दहा घटकांचा वापर करूनच आयुर्वेदीय वैद्य त्यांचे उपचार ठरवत असतात. ‘रोग आणि औषध’ हा घाऊक प्रकार आयुर्वेदात नाही हे समजून घेणे अतिशय महत्वाचे आहे. एखादा संदेश लिहिताना त्यामागचा हेतू उदात्त आणि समाजकल्याणाचा असेल यात शंका घेण्याचे काहीच कारण नाही. मात्र; तसे करताना सरसकट सगळ्यांनीच आपल्या विकारासाठी वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषधे ‘वापरून बघण्याचे प्रयोग’ करण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे; आपल्या दुखण्या-खुपण्यासाठी आपल्या वैद्यांचा सल्ला अवश्य घ्या. स्वयं-उपचार करत बसू नका!!
(टीप: वरील लेख हा कोणालाही व्यक्तिगत उद्देशून नाही याची कृपया नोंद घ्यावी. याविषयी लिहा अशी विनंती करणाऱ्या मित्रांचे आभार. शेयर करताना लेखकाच्या नावसहच शेयर करावा)
© वैद्य परीक्षित स. शेवडे
(आयुर्वेदतज्ज्ञ- लेखक- व्याख्याते)
श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद; डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..