संग्रही असावे असे “जागतिक रसायनशास्त्रज्ञ” !
यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र वर्ष म्हणून जाहीर केले आहे. रसायनशास्त्राच्या प्रगतीमध्ये मोलाची भर टाकणार्या प्रमुख महिला व पुरुष रसायनशास्त्रज्ञांचा हा सचित्र परिचय सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे. प्रा. प्रकाश माणिकपुरे यांनी. पृ. 176 किं. 180 रू. ISBN : 978-93-80232-49-2
2011 हे वर्ष जगात आंतरराष्ट्रीय रसायन शास्त्र वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. त्यासाठी “रसायनशास्त्र : आमचे जीवन, आमचे भविष्य” या बोधवाक्याची निवड करण्यात आली आहे. अशा या जागतिक रसायनशास्त्र वर्षात जागतिक रसायनशास्त्रज्ञ हे उत्तम पुस्तक प्रसिद्ध करून नचिकेत प्रकाशनाने औचित्य साधले आहे. 100 वर्षांपूर्वी पोलंडमधील महिला शास्त्रज्ञ मारी क्युरीने रसायनशास्त्रात नवीन किरणोत्सर्गी मूलद्रव्य शोधून त्याला आपल्या मायभूमीच्या सन्मानार्थ पोलोनियम हे नाव दिले. हा शोध लावल्याबद्दल मारी क्युरीला 1911 साली रसायनशास्त्रात दुसरे नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. तिला पहिले नोबेल पारितोषिक 1903 साली भौतिक शास्त्रात लावलेल्या किरणोत्सर्गी तत्त्वांसाठी तिचे पती पियुरे क्युरी आणि गुरू हेन्री बेकरेल यांच्यासोबत बहाल करण्यात आले.
ज्ञात जगात अशाप्रकारे रसायनशास्त्र क्षेत्रात मानवजातीला लाभदायी ठरणारे शोध लावणार्यांचा, त्यांच्या शोधासह सचित्र परिचय घडवून देणारे एक अत्यंत उपयुक्त व माहितीपर पुस्तक प्रा. प्रकाश माणिकपुरे यांनी लिहिले असून ते नागपूर येथील सुप्रसिद्ध नचिकेत प्रकाशनने प्रसिद्ध केले आहे. नचिकेत प्रकाशन अशी विविध माहितीपर दर्जेदार पुस्तके प्रकाशित करण्यासाठी प्रसिद्ध आहे.
रसायनशास्त्राचा उपयोग आपली पृथ्वी व ब्रम्हांड यातील गुपिते शोधून काढण्यासाठी होत आहे. मानवाच्या जीवनात प्राणवायू, पाणी आणि अन्नाला अत्यंत महत्त्व असून हे तीनही घटक रसायनशास्त्राचे अविभाज्य घटक आहेत. या शास्त्राने खरे तर मनुष्याला काय नाही दिले? हाच प्रश्न विचारणे योग्य ठरेल. आज आपण जे उच्चभ्रू जीवन जगत आहोत त्यासाठी शास्त्रज्ञांनी घेतलेल्या संशोधनाला महत्व आहे. मानवाच्या गरजा या आधीही भागत होत्या. त्यातही रसायनशास्त्राचाच वाटा होता परंतु लोक त्या शास्त्राकडे फार आदराने बघत नव्हते. 18 व्या शतकापासून रसायनशास्त्राला लोकमान्यता मिळाली. वैज्ञानिक दृष्टिकोनातून या शास्त्राकडे लोक बघू लागले.
रसायनशास्त्रात अनेकानेक शास्त्रज्ञांनी शोध लावून मानवजातीच्या कल्याणात भर घातली आहे, घालत आहे व पुढेही घालणार आहेत. ही न संपणारी साखळी आहे. या साखळीत अनेक शास्त्रज्ञांची नावे व त्यांनी लावलेले शोध जोडता येतील. यातील काही प्रख्यात शास्त्रज्ञांची ओळख प्रा. प्रकाश माणिकपुरे यांनी आपल्या जागतिक रसायनशास्त्रज्ञ या पुस्तकात करून दिली आहे. यात त्यांनी 43 पुरुष आणि 10 महिला शास्त्रज्ञांची ओळख त्यांनी केलेल्या संशोधनासह दिली आहे.
पुस्तक वाचताना या रसायन शास्त्रज्ञांनी आपापले संशोधन करत असताना किती हालअपेष्टा सहन केल्या, किती त्याग याची माहिती मिळते. काही शास्त्रज्ञ असे आहेत की त्यांनी आपला जीवही धोक्यात घातला आहे. शोध घेताना त्यांची समर्पण वृत्ती त्यांच्या संशोधनातून दिसून येते. शेवटी मानवी जीवन सुखकर होवो यासाठीच या शास्त्रज्ञांनी खस्ता खाल्ल्या, कष्ट सहन केले. स्वत:जवळचा पैसा खर्च करून समाजाला सुखी करण्यासाठी अपार परिश्रम घेतले. अशा या शास्त्रज्ञांची ओळख आपण करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. मग रसायनशास्त्र हा आपला अभ्यासाचा भाग नसला तरी हे पुस्तक माहितीच्या दृष्टीने खरोखर उपयुक्त ठरते.
केवळ इयत्ता 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनाच नाही तर फावल्या वेळात इतर वाचन करणार्या व्यक्तींसाठी हे पुस्तक अत्यंत माहितीपर आहे.
पुस्तकात शास्त्रज्ञाचे छायाचित्र टाकले आहे ते मध्यभागी न घेता बाजूस घेतले असते तर अधिक चांगले झाले असते. अक्षराच्या टाईपही थोडा लहान वाटतो. या एक दोन गोष्टी सोडल्या तर पुस्तक प्रत्येकाने संग्रही ठेवावे असे आहे. संपूर्ण निर्मिती नचिकेतच्या परंपरेप्रमाणे उत्कृष्ट व दर्जेदार असून मुखपृष्ठही अत्यंत आकर्षक आहे. अशा या पुस्तकांसाठी लेखक, प्रकाशक दोघांचेही अभिनंदन!
जागतिक रसायनशास्त्रज्ञ
विलास कुळकर्णी लेखक : प्रा. प्रकाश माणिकपुरे
पाने : 176
किंमत : 180 रू.
प्रकाशक : नचिकेत प्रकाशन
मो. : 9225210130
— मराठीसृष्टी टिम
Leave a Reply