नवीन लेखन...

जीपीएस तंत्राची वेधक सफर



वाढत्या जागतिकीकरणामुळे नोकरी किवा व्यवसायाच्या निमित्ताने फिरण्याच्या प्रमाणात बरीच वाढ झाली आहे. अनोळखी प्रदेशात असताना एखादे ठिकाण शोधणे अवघड असते. विशेषत: तेथील भाषा अवगत नसल्यास हे काम अधिक जिकीरीचे बनते. अशा वेळी जीपीएस किवा डिजिटल मॅप्सची सेवा

हाताशी असल्यास नेमके ठिकाण शोधणे सोपे बनते. या तंत्रज्ञानाचा ताजा वेध.

नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने अनेकांना बरेच फिरावे लागते. विशेषत: मार्केटिंग आणि कस्टमर सपोर्टच्या लोकांना फिरतीचे काम अधिक असते. त्यासाठी त्यांना राज्यात किवा देशातच नव्हे तर देशाबाहेरही जावे लागते. अशा वेळी नेमके ठिकाण शोधण्यासाठी तेथील स्थानिकांना पत्ता विचारण्याशिवाय पर्याय नसतो. पण, त्यातही भाषेची अडचण येऊ शकते. शिवाय काही वेळा पत्ता विचारण्यासाठी एकही व्यक्ती दिसत नाही किंवा ती दिसलीच तर तिलाही त्या ठिकाणाबद्दलची माहिती नसते. अशी समस्या निर्माण झाल्यावर नेमके ठिकाण आणि त्याठिकाणी घेऊन जाणारा रस्ता कसा शोधावा हा प्रश्नच आहे. पण इथे तंत्रज्ञान आपल्या मदतीला येते. जीपीएस म्हणजेच ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीमद्वारे आपल्याला हव्या असलेल्या ठिकाणाची नेमकी माहिती मिळते. त्यात ते ठिकाण आपण उभे असलेल्या ठिकाणापासून किती दूर आहे, तिथे पोहोचण्यासाठी किती मार्ग उपलब्ध आहेत आणि तिथे पोहोचण्यासाठी किती वेळ लागू शकतो अशी माहिती जीपीएस उपकरणाच्या स्क्रीनवर एका बटनाद्वारे मिळू शकते.

हल्ली मोबाईल उपकरणांमध्येही जीपीएसची सुविधा उपलब्ध झाल्याने छापील नकाशे बरोबर ठेवण्याची गरजच उरलेली नाही. अनोळखी ठिकाणी तर जीपीएस तंत्रज्ञानाचा उपयोग होतोच पण, काही कामानिमित्त रस्ते बंद असतील तर हव्या त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी दुसरा चांगला रस्ता कोणता आहे हे शोधून काढण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. रस्त्यात अनोळखी व्यक्तीला विचारण्यापेक्षा डिजिटल मॅप वापरणे अधिक सोपेही आहे. अर्थातच डिजिटल मॅपचे तंत्रज्ञान नुकतेच बाजारात आले आहे असे नाही. बर्‍याच काळापासून डिजिटल मॅप

बाजारात आहेत पण आजवर ते केवळ जीपीएस नेव्हिगेशन सिस्टीमबरोबरच उपलब्ध होत असत. आता अनेक स्मार्ट फोन्ससोबत ही सिस्टीम उपलब्ध होत असल्याने त्यांचा वापर वाढला आहे. जीपीएस उपकरणेही सर्वसामान्यांच्या आवाक्यात येत आहेत. शिवाय, नोकिया आणि गूगल या कंपन्यांतर्फे ग्राहकांसाठी मॅपिग सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर जीपीएसची सुविधा नसलेल्या ग्राहकांनाही त्यांच्या मोबाईलवर डिजिटल मॅप्स लोड करून घेऊन हे तंत्रज्ञान वापरता येते. यात मोबाईलच्या टॉवरपासून ग्राहकाचे ठिकाण आणि त्याला हवे असलेले ठिकाण याची नोंद ठेवता येते. त्यासाठी जीपीएस उपग्रहाची गरज भासत नाही.

डिजिटल मॅप्स लोकप्रिय होण्याची अनेक कारणे आहेत. सध्या चांगल्या दर्जाचे डिजिटल मॅप्स मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत असून विविध हॅण्डसेट्समध्ये त्यांचा वापर करणे सुलभ बनले आहे. शहरांच्या रस्त्यांमध्ये वेगाने बदल घडून येत असताना छापील नकाशांमध्ये हे बदल दिसत नाहीत. जीपीएस तंत्रज्ञानात उपग्रहाद्वारे माहिती मिळत असल्याने अगदी रोजच्या रोज होणारे बदलही टिपले जातात. या सुविधेमुळे नेमके ठिकाण शोधणे अधिक सोपे बनते. शिवाय, प्रत्येक वेळी छापील नकाशा उघडून पाहण्यापेक्षा मोबाईल किवा जीपीएस उपकरणाच्या स्क्रीनवर एका बटनाद्वारे हवे ती माहिती मिळू शकते. त्यामुळेच मोठ्या कंपन्याही डिजिटल मॅपिंगच्या क्षेत्रात उतरल्या आहेत.

नोकियाच्या ओपीएम अँड डिव्हायसेस विभागाचे प्रमुख जसमीत गांधी म्हणतात, ‘एखाद्या ठिकाणी आपण हरवल्यास जीपीएस मुळे आपण उभे असलेले ठिकाण आणि आपल्याला हवे असलेले ठिकाण यांची अचूक माहिती मिळते. डिजिटल मॅप्समध्ये उपग्रहाद्वारे ताजी माहिती उपलब्ध होते त्यामुळे ग्राहकांना अचूक आणि ताजी माहिती मिळते. या उपकरणात आपल्याला दिशांच्या खुणा करता येतात. पुढच्या वेळी तेच ठिकाण शोधताना त्या दिशा मार्गदर्शक ठरू शकतात. आपल्याला हव्या असलेल्या ठिकाणाचा पत्ता दिल्यास जीपीएस उपकरणामध्ये अपेक्षित ठिकाणांची यादीच सादर केली जाते. त्यात दोन ठिकाणांमधील अचूक अंतर, पोचायला लागणारा वेळ या सुविधा तर असतातच पण आता व्हॉईस असिस्टंट नेव्हिगेशनमुळे हे अधिक सोपे बनले आहे.’

गूगल इंडियाचे प्रोजेक्ट मॅनेजर माणिक गुप्ता म्हणतात, ‘आपण परदेशात असताना अशा उपकरणांची चांगली मदत होते. बरेचदा आपल्याला तेथील भाषा येत नसते किंवा अनोळखी व्यक्तींशी बोलण्याची इच्छा होत नाही. शिवाय, अपरात्री पत्ता विचारण्याचा प्रसंग आल्यास वेगळीच समस्या निर्माण होते. म्हणून जीपीएस उपकरण हाताशी असलेले बरे.’ देशात फिरतानाही एखाद्या टपरीवर पत्ता विचारल्यावर अंतराची नेमकी माहिती मिळू शकत नाही. याउलट डिजिटल मॅप्समुळे आपल्याला इतर कोणालाही काही विचारावे लागत नाही.

डिजिटल मॅप्सचे इतके फायदे असले तरी काही बाबतीत ते कमी पडतात. विशेषत: भारतातील अनेक दूरवरच्या ठिकाणांचे मॅप्स उपलब्ध नसतात. देशातील मुख्य शहरांमध्येच त्यांचा फायदा होऊ शकतो. नेहमीच्या रस्त्यांमध्ये एखादे बांधकाम सुरू असल्यास हे तंत्रज्ञान उपयोगी पडत नाही. शिवाय, आपल्या मार्गातील वाहतुकीचे प्रमाण आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची माहिती भारतातील जीपीएस उपकरणांमध्ये उपलब्ध होत नाही. त्यामुळेच काही लोक अशा उपकरणांवर अवलंबून राहण्याचे टाळतात. प्रवासवर्णने लिहिणारे अजय जैन म्हणतात, ‘मी नेहमी नेहमीच्या ठिकाणांपेक्षा दूरवरच्या ठिकाणी जात असतो. मला हवे असलेल्या बहुतेक ठिकाणांचे डिजिटल मॅप्स उपलब्ध नसतात. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा मला कोणताही फायदा होत नाही. डिजिटल मॅप्स उपलब्ध असले तरी पुढे वाहतुकीचा खोळंबा झाल्याचे त्यावर समजत नाही. डिजिटल मॅप्समुळे आपल्याला हव्या त्या ठिकाणी पोहोचण्याचा सर्वात योग्य मार्ग दिसेलच असे नाही. त्यामुळे डिजिटल मॅप्सवर पूर्णपणे अवलंबून राहण्यापेक्षा मी केवळ त्याचा माहिती घेण्यासाठी उपयोग करतो.’ हे तंत्रज्ञान सर्वसमावेशक होण्यासाठी अचूक डिजिटल

मॅप्स बनणे आणि देशातील सर्व ठिकाणचे मॅप्स उपलब्ध होणे आवश्यक आहे.

मोफत उपलब्ध असणारे काही डिजिटल मॅप्स

नोकीया ओव्हीआय मॅप्स : मोफत उपलब्ध असलेल्या मॅप्समध्ये सर्वाधिक लोकप्रिय. यात व्हॉईस नेव्हिगेशनपासून महत्त्वाच्या खुणांसह सर्व माहिती उपलब्ध आहे. परंतु, या मॅप्सच्या वापरामुळे आपला हॅण्डसेट स्लो होऊ शकतो.

गूगल मॅप्स : यात काही ठिकाणची सार्वजनिक व्यवस्था, स्ट्रीट व्ह्यू आणि आपल्या मार्गात कोणी मित्र असल्यास त्याची माहिती अशा अनेक आकर्षक सोयी आहेत. गूगल मॅप्स संगणकावरही वापरता येतात.

मोबाईल जीमॅप्स : जवळजवळ सर्व मोबाईल हॅण्डसेट्समध्ये वापरता येतो. हे अॅप्लिकेशन याहू मॅप्स आणि ओपन स्ट्रीट मॅपमधूनही अॅक्सेस करता येते.

बिग मॅप्स : मायक्रोसॉफ्टने मॅपिग क्षेत्रात काहीशा उशिराने पाऊल ठेवले असले तरी त्यांच्या बिग मॅप्सने इतरांसमोर मोठी स्पर्धा निर्माण केली आहे. बिग मॅप्स संगणकावर अधिक चांगल्या प्रकारे वापरता येते.

(अद्वैत फीचर्स)

— महेश धर्माधिकारी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..