आपल्याला तपासताना डॉक्टर आपल्याला जीभ दाखवायला सांगतात. हा अनुभव बहुतेकांना आला असेल. जिभेचा संबंध अन्नाची चव घेण्याशी असतो आणि बोलताना जीभ महत्त्वाचे कार्य करते हेदेखील सर्वांना माहीत असावे. सामान्यपणे आपली जीभ आपल्या मुखाच्या पोकळीच्या आतच असते. मानवी जीभ दहा सेंटिमीटर लांब असते आणि जिभेचे वजन 56 ग्रॅम असते. इतर प्राण्यांमध्ये जीभ दुसरी कामे करताना दिसते. बेडूक आपल्या जिभेने कीटकांना पकडू शकतो. सापाची जीभ अंधारात आजूबाजूच्या वस्तूंना स्पर्श करीत मार्ग काढण्यास मदत करू शकते. माणसाची जीभदेखील चव आणि वाचा याखेरीज इतर महत्त्वाची कार्ये करते. आपण अन्न चावून खातो तेव्हा तोंडातल्या तोंडात एका बाजूने दुसरीकडे अन्न सारखे फिरवले जाते. या फिरवण्यामुळे अन्न सगळ्या बाजूने चांगले चावले जाते. असे चांगले चावून मऊ झालेल्या अन्नात लाळ व्यवस्थित मिसळू शकते. लाळेत महत्त्वाचे विकर असते. टायलिन या नावाने ते ओळखले जाते.
हे टायलीन विकर (इन्झाईम) कर्बोदकांच्या पचनात महत्त्वाचे कार्य करते. नीट चावून मऊ झालेल्या अन्नात लाळ मिसळण्याने कर्बोदकांच्या पचनाला सुरवात होते. कर्बोदक नीट न पचताच आंतड्यात गेली, तर ती शोषली जात नाहीत. न शोषली गेलेली कर्बोदके मोठ्या आतड्यात जातात. तेथील जिवाणू (बॅक्टेपरिया) या कर्बोदकांचे विघटन करतात. या प्रक्रियेतून अखेर मिथेन हा वायू तयार होतो. या वायूला दुर्गंधी नसते; परंतु “वारा सरताना‘ हा वायू आवाज करतो. त्यामुळे व्यक्तीला ओशाळल्यागत होते. कर्बोदकांच्या चांगल्या पचनाची सुरवात आपल्या मुखात होण्यात जिभेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपल्या मुखाच्या पोकळीत जिभेचे टोक दात, हिरड्या, मुखाचे छप्पर, ओठ येथे असलेले सर्व पदार्थ गिळते. अशा रीतीने आपल्या मुखाच्या आतील स्वच्छता ठेवण्याचे कार्य जीभ सतत करीत असते.
जिभेचे आणखी एक महत्त्वाचे कार्य म्हणजे अन्न गिळण्याची सुरवात करणे हे होय. जिभेचा पुढचा भाग (टोक व शेजारचा भाग) मुखाच्या छपरावर घट्ट दाबला जातो. जिभेचा मागचा भाग उचलला जातो. आता चावून मऊ व लाळ मिसळून ओला झालेला घास घशाकडे ढकलला जातो. इथून तो अन्ननलिकेकडे घसाच्या स्नायूंच्या आकुंचनाने नेला जातो. या कार्यात विविध स्नायूंच्या आकुंचन व प्रसरणाच्या वेळचा ताल अचूकपणे सांभाळला जाणे आवश्यघक असते. गर्भावस्थेतच ही क्रिया करण्याचे प्रशिक्षण अर्भकाला मिळालेले असते. त्यामुळे जन्मल्या जन्मल्याच मूल स्तनपान करू शकते. जिभेच्या बाहेरच्या बाजूने पातळ त्वचा असते. आतून स्नायू, रक्तरवाहिन्या आणि ज्ञानतंतूच्या शिरा असतात. जिभेच्या वरच्या भागावर छोटे छोटे उंचवटे असतात. या उंचवट्यातील काही उंचवटे चव समजण्याच्या क्रियेत महत्त्वाचा भाग घेतात. त्यांना टेस्ट बडस् म्हणतात या टेस्ट बडमधील पेशी रासायनिक क्रियेमार्फत “चवीचे‘ वेगळे वेगळे प्रकार ठरवितात. हे टेस्ट बडस् जिभेप्रमाणे मुखाच्या पोकळीच्या अस्तरात सर्वत्र असतात. अन्नाला वेगळी वेगळी चव समजते, त्यात या टेस्ट बडस्च्या जोडीला वासाचेदेखील महत्त्व असते. चवदेखील चार प्रकारची आहे, असे शास्त्र मानते. आंबट चव ही ऍसिड (आम्लता) मुळे समजते. खारट चव विविध क्षारांमुळे जाणवते. गोड चव कोणत्याही एका विशिष्ट प्रकारच्या रासायनिक रेणूमुळे निर्माण होत नाही. काही रासायनिक रेणूंची चव गोड लागते; परंतु साखरेच्या रेणूप्रमाणे हे पदार्थ उष्मांक निर्माण करू शकत नाहीत. त्यामुळे ज्यांना आपले वजन कमी करावयाचे आहे, अशा व्यक्तींना हे कृत्रिम गोडी आणणारे (आर्टिफीशियल स्वीटनर्स) घटक वापरता येतात. या रेणूच्या वापरातून पोटात वायू (गॅसेस) मात्र निर्माण होतात. कडू चवदेखील अनेक प्रकारच्या रासायनिक रेणूंमुळे जाणवते. यांपैकी अल्कलॉईडस प्रकारचे रेणू अनेक औषधांत असतात. उदाहरणार्थ क्विनीन, कॅफेन, स्ट्रिकवीन किंवा निकोटिन.
तिखट ही वेगळी “चव‘ नसून, काही रेणू आपल्या जिभेवरील ज्ञानतंतूंच्या टोकाला झोंबतात, त्यातून तिखट जाणवते. चव समजण्याकरता अन्नाचे हे विशिष्ट रासायनिक रेणू विरघळणे आवश्यतक असते. हे काम लाळ करते. कोणत्याही कारणाने तोंड कोरडे पडले (लाळ सुटणे थांबते) तर अन्नाची चव कळेनाशी होते. त्यातून लाळ न सुटल्यामुळे जिभेवर मृत पेशीचे किटण जमले, तर त्या मृत पेशीतील काही रसायनांचे विघटन होऊन कडू चव असणारे रेणू निर्माण होतात. व तोंडात कडू चव जाणवत राहते. अनेक औषधांचादेखील असा परिणाम असतो. माणसामाणसात त्याच अन्नाला वेगळी वेगळी चव जाणवते. पालक काहींना चवदार वाटतो, तर इतरांना कडू लागतो. अर्थात तोच पदार्थ काहींना आवडतो; इतरांना आवडत नाही. शिवाय आवडीनावडीचे प्रकार मानसिक अनुभवावरही अवलंबून असतात. त्यामुळे आवडीनावडी बदलू शकतात. तरुण वयात गोड न आवडणाऱ्या व्यक्तींवना वार्धक्या जसे जवळ येऊ लागते, तसे गोड पदार्थ आवडू लागतात. हा अनेकांचा अनुभव असतो.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ :- डॉ. मधुरा भिडे
Leave a Reply