नवीन लेखन...

जीवन रंगभूमिवरील यशस्वी कलाकार

वसंता माझा बालमित्र! शाळकरी जीवनांतला. कॉलेज मध्येही एकत्र होतो. दोघेही वैद्यकीय महाविद्यालयांत मिळून शिकलो. आज दोघेही ज्येष्ठ नागरिक म्हणून सत्तरी ओलांडलेले. तो त्याच्या गांवी  मराठवाड्यांत स्थायीक झाला. तर मी शासकिय नोकरीत राहून अनेक गावांचे पाणी चाखू लागलो.

मी त्याच्या गांवी अनेक वेळा गेलो होतो. मात्र गेल्या २५ वर्षांत त्याच्याकडे जाणे झाले नाही. त्याच्या आग्रहाने मी त्याच्या गांवी गेलो.  चार दिवस त्याच्या कौटूंबिक जिव्हाळ्याचा पाहूणचार घेतला. खेड्यामधले घर कौलारु म्हणतात त्याप्रमाणे एक प्रशस्त जुन्या बांधणीचा वाडा. पुढे मागे मोठे अंगण  व फुलबाग होती. वसंताची ह्या सत्तरीमधली दिनचर्या बघून मी हरकून गेलो. खूप गम्मत मौज आनंद वाटला. त्याच्या प्रत्येक हलचालीने मनाची बरीच करमणूक झाली. आणि कांही प्रश्नचिन्ह मनामध्ये उत्पन्न झाले.

प्रातःसमयी चारचा सुमार असावा. माझी झोपमोड झाली, ती कानावर पडलेल्या भजनानी. वसंता तानपूरा घेवून संतांचे अभंग अतीशय तन्मयतेने ताना मारीत, आलापांत एकरुप होऊन पहाडी अवाजांत म्हणत होता. त्यानेच छेडलेले सतारीचे बोल, त्याला साथ करीत होते. मी गादीवर बसून ते सारे एकाग्रतेने ऐकत होतो. एक वेगळांच आनंद घेत होतो.  वसंताची ही गायनकला माझ्यासाठी अपरिचीत होती. त्याने साठीनंतर ती आपल्यापरी आत्मसात करण्याचा प्रयत्न चालवला होता. प. भिमसेन जोशींचे आलाप व गायन त्याने तंतोतंत  उभे केले होते. त्याच्या ईश्वराच्या भजनासाठी मी त्याला मनापासून धन्यवाद देत अभिवादन केले.

संध्याकाळचा चहा अटोपून आम्ही मागील अंगणात गेलो. त्याचे दोघे नातू ७-८ वर्षाचे व त्यांचे तीघे मित्र गोट्या खेळत होते. मध्यभागी गल केलेली होती. त्याच्या भवती वर्तूळ केले होते. व प्रत्येकाची एक रंगीत गोटी विखूरलेली होती. प्रतिस्पर्ध्याची गोटी रिंगणाबाहेर गोटीच्याच सहाय्याने उडविणे, व आपली गोटी रिंगणात गलीमध्ये टाकणे हा प्रत्येकाचा प्रयत्न होता. बोटाच्या कांड्यावर गोटी ठेऊन बोटाला बाक देत स्प्रिंगचा आकार व गती ने समोरची गोटी उडविण्याची कला सर्वानी साधली होती. अचुकता आणि नेम यानी तो खेळ मनास करमणूक करीत होता.  आम्ही अंगणात जाताच सर्वानी गलका केला.

״  आजोबा तुम्हीपण या तुमचीच आम्ही वाट बघत होतो. ״  हे पालूपद सर्वानी लावले.

वसंताने मला बाकावर बसण्याची खून केली. व तो चक्क त्यांचा एक बालमित्र म्हणून खेळण्यांत सामिल झाला. आश्चर्य म्हणजे चार सहा गोट्या त्याच्या खिशांत आधीच होत्या. सर्वांचा खेळ खूप रंगला. वसंता आपले वय विसरुन त्यांच्यातला एक संवंगडी झाला होता. एकमेकावर आरोप करणे, ओरडणे, रागावणे, खोटेपणा करणे, खेळातील तथाकथीत नियमांना बगल देणे, व आपोआपच खरे कसे हे पटविण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करीत होता.

वसंता आजोबा म्हणून मागे पडला नाही. तो पण त्याचा सुरांत, वादविवादांत, हमरीतुमरीवर येत असे. खेळ संपला, गोट्याचे वाटप झाले. आणि आजोबांनी सर्वाना भाजलेल्या भुईमुगाच्या शेंगा दिला.

रात्रीच्या जेवणाची तयारी होत होती. गरम गरम कांदाभजी करण्याची सुचना दिली गेली होती. बैठकित मोठा गालीचा होता. मी मासिक चाळत बसलो होतो.  माझे लक्ष कोपऱ्यांत बसलेल्या वसंताच्या  तीन वर्षे वयाच्या नातीकडे गेले. ती तीच्या सहा वर्षाचा भाऊ दादू आणि वसंता सर्वजण समोरासमोर बसून  आपडी थापडी खेळत होते. आपडी थापडी गुळाची पापडी, धम्मक लाडू तेल काढू, तेलंगीचा एकच कान, धर ग बेबी माझाच कान. धर त्या दादूचा कान. पुन्हा आपडी थापडी, आपडी थापडी गुळाची पापडी तेच पालूपद चालू. आणि दुसऱ्याचा कान धरल्या नंतर फिरण्याच्या हालचाली केल्या जातात. चाऊ म्याऊ पत्राळूतले पाणी पिऊ, हंडा पाणी गुडूप, म्हणत सर्वानी तोंडावर आपले दोन्ही हात ठेवले.  किती मजेदार हलकी फुलकी आणि आनंद निर्माण  करणारा हा शुशूखेळ होता.

हसणे खिदळणे आणि ओरडणे, ह्यात छोट्या नातवंडासह वसंता एकरुप होऊन आनंद लूटत होता.

” गरम गरम भजी वाढली, चला जेवायला हांक आली ” आणि आम्ही सर्वजण उठलो.

आज रविवार सुट्टीचा दिवस. वसंताचे दोन्ही मुले घरांतच होती. एक महाविद्यालयांत   जाणारी नात अन्विता. सकाळचा फराळ झाला. अन्विता क्रिकेटचा पेहेराव घालून आमच्या समोर आली. ״  चला बाबा बाहेर पटांगणात ״   सर्वजण जमा झाले आहेत.

״ चला ״ म्हणत वसंता उठला व त्याने मला पण बाहेर येण्याचे सुचविले.

״ काय ?   ह्या सत्तरीमध्येही तू क्रिकेट खेळणार. ? ״ मी विचारले

״ आफकोर्स परंतु खेळाडू म्हणून नव्हे, तर अँपायर म्हणून ״

वसंता मला टाळी देत मोठ्याने हसला.

दोन तासपर्यंत अन्विताच्या मैत्रीनी आणि वसंताच्या दोन्ही मुलांचे मित्रमंडळ, या सर्वानी कमीजास्त भिडूची टिम बनवत खेळांत रंगत आणली. पंचच्या भूमिकेंत वसंताने काटेकोर अट्टाहासी परंतु प्रेमळ स्वभावाने पंचगिरी चांगलीच केली. खेळ खुपच रंगला. सर्वानी त्याचा आनंद लुटला. घरांतून बेल वाजली. सर्वजण  खेळ आटोपून जेवणासाठी या. बोलावले गेले.

वसंता हा पेशाने डॉक्टर होता. सतत निरनीराळ्या रोग्यांच्या सहवासांत असे. एके काळी त्याला दैनंदिनीमधून इतर बाबीसाठी थोडीशी देखील उसंत मिळत नव्हती. आता वयानुसार तो दररोज सकाळी फक्त दोन तास प्रॅक्टीस करण्यांत घालवीत असे. सामाजिक कार्यांत आता त्याचा कल वाढला होता. वैद्यकिय शिबीरे आयोजीत करणे, गरीब गरजूना मदत करणे, ह्यात त्याचा बहूतेक वेळ जाई.  शासनाच्या कुटुंब कल्याण योजना, पल्सपोलीओ, माताबाल शिबीरे, अशा कार्यक्रमांत तो हिरिरीने भाग घेत असे.

आजचा माझ्या मुक्कामाचा वसंताच्या घरातील शेवटचा दिवस होता. दुपारचे जेवण आटोपून मी निघणार होतो. आज जेवणाचा स्पेशल व चमचमित बेत आखला असल्याचे कळले. त्याच बरोबर मी तेथील इतर मित्र मंडळीसमवेत  गप्पागोष्टींत व्यस्त रहावे, ही वसंताची प्रेमळ सुचना होती. आज तो स्वयंपाक घरांत राहून, खाद्य पदार्थांचे मार्ग दर्शन करणार होता. मी हसतच त्याच्या उत्साहाला मान्यता दिली.

दोन अडीच तास झाले, अजून वसंता कां आला नाही. काय करतो इतका वेळ त्या स्वयंपाक घरांत. मला उत्सुकते बरोबर गम्मतही वाटली. मी उठलो व स्वयंपाक घरांत जाऊन डोकावले. मला आश्चर्याचा धक्काच बसला. स्वयंपाक घरांत फक्त वसंता एकटाच होता. आणि तो जेवणातील पदार्थ करण्यात मग्न होता. One man’s show. It was great Vasanta only. त्याच हेही रुप बघून मी चकीत झालो. भारावून गेलो. गरम गरम जिलेब्या तो तळत होता. भरलेल्या वांग्यांची भाजी, पुलाव, ताकाची अतिशय चवदार कढी हा अप्रतीम बेत त्याने एकट्याने यशस्वी केला होता.

जीवन एक रंगभूमी आहे असे म्हणतात. आपण प्रत्येकजण फक्त नटाच्या भूमिकेंत असतो.  नटाला वेळोवेळी, प्रसंगाप्रमाणे मुखवटे बदलावे लागतात. त्याच भूमिकेत इतके एकरुप व्हावे लागते की ते पात्र जीवंत वाटावे. परिणामकारक भासावे. कुणी संत सज्जन बनून व्यासपिठावर येतो. सर्वांची मने प्रेमाने वा आदराने भारवून टाकतो. तोच खलनायक या भूमिकेत सर्वांच्या मनामध्ये राग तिरस्कार ह्या भावना नीर्माण करतो.

ह्याच ठिकाणी त्या कलाकाराच्या कलागुणांची कदर होते. त्यालाच प्रेक्षक नटसम्राट ही पदवी देतात. संसारातील त्याचे निजी जीवन आणि रंगभूमिवरचे जीवन ह्यात खूप तफावत असते. रंगभूमि ही नैसर्गिक जीवन कसे असते, हे दाखवितानाच, ते कसे असावे ही देखील अपेक्षा व्यक्त करते. येथेच नट वा कलाकार आपल्या भावना  सुलभतेने बदलताना दिसतात. हे सारे बाह्यांगी घडत असते. बदल हा जणू मुखवटा ( Mask ) बदलण्या सारखे सहज होऊ शकते. निर्माण झालेल्या परिस्थितीची झळ त्याच्या अंतरात्म्यापर्यंत केंव्हांच पोहचत नसते. मनालाही फारसा धक्का बसत नसतो. सारे होत राहते ते वैचारीक स्थरावर. हा केवळ विचारांनी विचारांचा संवाद असतो. त्यानुसार चेहऱ्यावर भाव व हातवारे करुन भाव दर्शविले जातात. त्यांचा उगम बौद्धिक स्थरावरच असतो. त्यात खऱ्या भावनेचा ओलावा नसतो.  येथे खरी भावनिक गुंतवणूक केंव्हांच नसते. हां हे मात्र सत्य असते की, व्यासपिठावर जो वैचारीक व भावनिक गुंता निर्माण केला जातो, तो कृतिम असतो. परंतु हुबेहुब नैसर्गिक वाटावा असा प्रयत्न होतो.

सत्य जीवनातील व्यक्ती कशी असते. तीच बोलण, वागण, हालचाली, वेषभूषा, इत्यादी कशा असतात ? त्याच चित्रण केल जात. सार बौद्धीक वैचारीक स्थरावरच दर्शनी project केल जात, भावना विचार दिसतात. पण ती कढ वा खोली त्यात केव्हांच नसते. खरा भावनेचा अविष्कार हा मात्र त्याच्या सत्य आयुष्याचा रंगरुपांत कार्यांत दिसतो.

वसंतानी हे भिन्नत्वाच स्वरुप साध्य करुन जीवन एक आगळ वेगळच केल होत. जीवन कस असावे, ह्यापेक्षा जीवन किती अंगांनी परिपूर्ण असावे ह्याच झलक दर्शन मला त्याच्या त्या चार दिवसाच्या सहवासांत झाले.

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..