वैद्यकीय क्षेत्रातील अँलोपँथिक ( Allopathic Medical Science ) शास्त्राच्या डिगरय़ा व शासकीय रजिस्ट्रेषन झालेले होते. नुकताच मी दवाखाना सुरु केला होता. रोगांची हजेरी व वरदळ चांगला आकार घेऊ लागली. एक दिवस एक तरुण मुलगा माझ्या दवाखान्यांत आला. ” माझ नांव तरुणकुमार तिवारी. माझे वडील येथे मॉडेला कंपनीत नोकरीला आहेत. मला तुमच्याकडे कंपाऊंडर म्हणून काम मिळेल कां ? ” मी त्याच्याकडे बारीक नजरेने बघीतले. चेहरय़ावरुन मला तो अतिशय सज्जन, समजदार, कुटूंब वत्सल, उत्साही आणि सुस्वभावी वाटला. तशी मला कुण्यातरी सहकाऱयाची गरज होती. चर्चा करुन मी त्याला मज बरोबर काम करण्याची सम्मती दिली.
आगदी अल्प काळांत तिवारीने माझे मन जींकून घेतले. त्याला कामाची हौस दिसली. त्याच्यासाठी वैद्यकीय विषय अपरीचित् होता. परंतु त्यांत त्यांने उत्साह व गोडी असल्याचे दाखवून दिले. त्याने एक नोटबुक बाळगले होते. माझा रोग्याशी होणारा संवाद, त्यांच्या तक्रारी, विकाराची वर्णने, रोग्याने आतापर्यंत केलेले उपाय, ह्या सर्व बाबींची तो अतिशय उत्सुकतेने एकाग्र चित्त करुन माहिती गोळा करीत असे. त्याच्या सर्व नोंदी तो वहीत लगेच टिपून घेई. रोग्याला दिलेली औषधी, त्यांची नांवे, घेण्याची पद्धत, ह्याची व्यवस्थीत नोंद तो करुन घेई. रोगी गेल्यानंतर तो त्याच्या शंका-कुशंका विचारीत असे. माझा देखील त्याला सहकार्य करण्याचा दृष्टीकोण असावयाचा. माझ्याच सल्ल्याने त्याने कांही प्राथमिक वैद्यकीय ज्ञानाची पुस्तके पण घेतली होती. प्रत्यक्ष अनुभवांत ( Practical Knowledge ) त्याच्या कल होता. औषधी देणे, तयार करणे, ड्रेसींग करणे, जखमांची काळजी घेणे, इन्जेक्क्षन देणे, हे त्याने शिकून घेतले होते. केंव्हा केंव्हा माझ्या गैर हजेरीत तोच माझा दवाखाना व्यवस्थीत चालवित असे.
काळाचा एक प्रचंड महीमा असतो. ओघ आणि बदल ही काळाची वैशिष्ठे. तो निश्चीत असला तरी जगाला त्याच्या परिणामाचे मुळीच ज्ञान नसते. म्हणूनच त्यांत रोमांच आहे, शंका आहे, आणि आश्चर्य आहे. वय व विकलांगपणा नेहमी जीवनमार्ग बदलण्यास भाग पाडतो. वाकत जाणारे शरीर विचारांनादेखील वाकवित जाते. जो मेंदू, विचार, चेतना एकेकाळी शरीरावर ताबा करुन होता, तोच आता शरीराच्या आधीन झालेला जाणवतो. डॉक्टराची भूमिका बदलून आतां रोग्याच्या भूमिकेत राहण्याचा काळ आलेला होता. खोकल्याने हैरान केले होते.
माहित असलेले सर्व उपाय संपले. तज्ञांचेही सल्ले निकामी ठरले.
समवयस्क मित्रांनी सल्ला दिला की क्रॉनिक झालेल्या खोकल्यासाठी आयुर्वेद शास्त्रामधील उपचार करावेत. त्यांनी एका क्लिनीकचे नाव देखील सुचविले. मी त्याप्रमाणे तेथे गेलो. मला तेथे जाताच आश्चर्याचा धक्का बसला. त्या क्लिनीकचा प्रमुख होता तरुणकुमार तिवारी. एके काळचा माझा कंपाऊंडर सहकारी.
माझ खूप आदरातिथ्य व स्वागत केल गेल, हे सांगणेच नको. तिवारीच्या अभ्यासू वृत्तीने त्याला शांत बसूच दिले नाही. वैद्यकीय विभागातील त्याची ओढ व रुची त्याला ज्ञानाच्या चक्रांत फिरवीत होती. त्यानी आयुर्वेद ह्या विषयाकडे आपले लक्ष केंद्रित केले. पुस्तके वाचली, सर्टीफिकीट कोर्स केला. ज्यामुळे तो स्वतंत्र व्यवसाय करु शकत होता. विषय वाचन, व त्याचे अद्यावत ज्ञान (Update Knowledge ) ह्या तत्वावर तो ठाम होता.
ह्याच विषयावर लेखन करुन त्या त्या विषयांच्या संबंधातील मासिकांना लेख, उतारे, प्रश्नोत्तरे, पाठवू लागला. आपल्या ईच्छाशक्ती व प्रचंड मेहनत यानी एक प्रकारे साम्राज्य निर्माण केले होते. निरनिराळ्या आयुर्वेदिक कंपन्यानी त्याला मार्गदर्शक म्हणून देखील मान्यता दिली होती.
वैद्यकिय शास्त्राची अ-आ-इ-ई जरी तो मजकडून शिकला, तरी य- क्ष- ज्ञ अर्थात वरच्या दर्जाचे ज्ञान हे त्याचे स्वतःचे होते. मजसाठी हे जरी नाविन्यमय होते, तरी माझ्याच अडचणीच्या काळांत मलांच आसरा देणारा तो ठरला. एक प्रकारे शिष्य म्हणून मजकडे आलेला तरुणकुमार तिवारी आता एका गुरुच्या – श्रेष्ठाच्या- भूमिकेत भासू लागला.
— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
Leave a Reply