एक चित्रपट १४ वर्षे!
पाकिजा प्रदर्शित झाला १९७२ साली, पण खरंतर त्याची सुरुवात झाली १९५८ मध्ये. पाकिजा बनायला १४ वर्षांचा वेळ लागण्याचे मुख्य कारण होते ते दिग्दर्शक कमाल अमरोही आणि त्यांची पत्नी असलेली पाकिजाची नायिका मीनाकुमारी यांच्यातील तणाव आणि नंतर तलाक. खरंतर हा चित्रपट पूर्णच झाला नसता, पण सुनील दत्त आणि नर्गिस यांच्या मध्यस्थीनंतर अखेर दोघे पुन्हा एकत्र काम करण्यास तयार झाले आणि चित्रपट पूर्ण झाला. प्रदीर्घ खंडानंतर चित्रपटाला पुन्हा सुरुवात झाली, तोपर्यंत मीनाकुमारीला व्याधींनी घेरले होते. पण त्याची पर्वा न करता तिने चित्रीकरण पूर्ण केले. मात्र तिच्या आजारपणाची आणि वाढलेल्या वयाची छाया चित्रपटातील काही मोजक्या दृश्यांत आणि ‘तीर ए नजर’सारख्या गाण्यात दिसते. १९७२ साली चित्रपट प्रदर्शित झाला आणि दुर्दैवाने काही दिवसांतच मीनाकुमारीचे निधन झाले. सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये हा चित्रपट फार चालला नव्हता. नंतर चित्रपट हिट झाला. पडद्यावरच्या आणि प्रत्यक्षातल्या अशा दोन्ही भूमिकांमध्ये मीनाकुमारीच्या वाट्याला दु:ख आणि वंचनाच आली. पाकिजाचे संगीत गुलाम मोहम्मद यांचे. पण चित्रपट पूर्ण व्हायच्या आधीच त्यांचे निधन झाले. त्यामुळे चित्रपटाचे पार्श्व संगीत नौशाद यांनी दिले आणि तीन गाणीही केली. पण ‘चलते चलते’सह बहुतेक प्रसिद्ध गाणी गुलाम मोहम्मद यांची. असे म्हणतात की, गुलाम मोहम्मद यांना त्यासाठी फिल्मफेअर पुरस्कार न दिल्याच्या निषेधार्थ प्राण यांनी त्यांना त्यावर्षी मिळालेला खलनायकाचा पुरस्कार स्वीकारायला नकार दिला होता.
विश्राम ढोले
संकलन संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply