व्हायोलिन हे मूळचे भारतीय वाद्य नसले, तरी आज ते देशातील मैफलींच्या मध्यभागी विराजमान झाले आहे. त्याला प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या कलावंतांमध्ये प्रामुख्याने लालगुडी जयरामन यांचे नाव घेतले जाते. त्यांचा जन्म १७ सप्टेंबर १९३० रोजी झाला. दाक्षिणात्य संत परंपरेतील महान संगीतकार त्यागराज यांच्या वंशात जन्मलेल्या लालगुडी जयरामन यांनी आपल्या अलौकिक प्रतिभेने घराण्याची परंपरा वेगळ्या उंचीवर नेली, त्याचबरोबर जगभरातील संगीत क्षेत्रात भारताचाही सन्मान वाढवला. व्ही. आर. गोपाल अय्यर या कर्नाटक संगीतातील दिग्गज कलावंताच्या पोटी जन्मलेल्या लालगुडी जयरामन यांना संगीताचे बाळकडू घरातूनच मिळाले आणि वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी व्हायोलिनवादक म्हणून आपली संगीत क्षेत्रातील कारकीर्द सुरू केली. तीव्र आकलनशक्ती, अवतीभवतीचे संवेदनशीलतेने टिपण्याची वृत्ती यामुळे अल्पावधीतच त्यांनी कर्नाटक संगीतातील बारकावे आत्मसात केले आणि स्वतःची शैली विकसित केली. प्रचंड मेहनत आणि संगीतावरील निष्ठेमुळे अल्पावधीत ते नामवंत व्हायोलिनवादक म्हणून नावारूपाला आले. व्हायोलिनच्या आत्म्याशी तादात्म्य पावून त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीतासाठी उपयुक्त ठरणारे तंत्र निर्माण केले, जे ‘लालगुडी वाणी’ म्हणून ओळखले जाते. राग, भाव, ताल आणि गीतात्मक सौंदर्याचे अद्भुत मिश्रण असलेल्या त्यांच्या संगीताने जगभर चाहतावर्ग निर्माण केला. काव्यात्म तरलतेने रसिकांसमोर येणारी वाद्यप्रतिभा, हे त्यांचे वैशिष्ट्य मानले जाते. त्यामुळेच नामवंत गायकांना साथ-संगतीसाठी लालगुडी जयरामनच हवे असत. कर्नाटकी शैलीच्या व्हायोलिन वादनाला आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवून देणारे ते पहिले कलावंत होते. वीणा आणि बासरीशी व्हायोलिनला जोडण्याचा अलौकिक प्रयोग त्यांनी १९९६ मध्ये केला आणि त्याला विशेष दादही मिळाली. जगभरातील अनेक देशांमध्ये त्यांचे स्वतंत्र कार्यक्रम झाले. १९६५ मध्ये एडिनबर्ग महोत्सवात प्रसिद्ध व्हायोलिनवादक यहुदी मेनूहिन हे लालगुडी यांच्या तंत्राने एवढे प्रभावित झाले की, त्यांनी आपले इटालियन व्हायोलिन त्यांना सप्रेम भेट दिले. राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने पद्मश्री, पद्मभूषण, संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार यांचा उल्लेख करावा लागेल. लालगुडी जयरामन यांचे २२ एप्रिल २०१३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply