लौकिक अर्थाने संगीतकार रवी यांची कारकीर्द कोणत्याही संगीतकाराला हेवा वाटावा अशी होती. त्यांचा जन्म ३ मार्च १९२६ रोजी झाला.त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांनी बंपर यश मिळवले आणि त्यातील गाण्यांनाही अफाट लोकप्रियता मिळाली. रवी यांनी स्वतंत्रपणे संगीतकार म्हणून काम सुरू केले तो काळ चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळाचा उत्तरार्ध म्हणता येईल. अतिशय सोप्या आणि ओठांवर सहज रूळणाऱ्या चाली हे रवी यांचे वैशिष्ट्य. त्यांच्या या गुणामुळेच त्यांची गाणी लोकप्रिय झाली. संगीतकारापेक्षा अधिक मानधन मागणाऱ्या साहिर लुधियानवीसारख्या गीतकाराशी त्यांनी जमवून घेतले. त्यामुळेच ‘गुमराह’, ‘वक्त’, ‘हमराज’सारख्या चित्रपटांची गाणी जन्माला आली. ‘चलो एकबार फिरसे अजनबी बन जाये हम दोनो’ सारखे अनवट गाणे रवी यांनी महेन्द कपूरकडून ज्या पद्धतीने गाऊन घेतले ते तिघांच्याही दृष्टीने इतिहास निर्माण करणारे ठरले. ‘गरिबोंकी सुनो, वो तुम्हारी सूनेगा’ या त्यांच्या गाण्याने लाखो भिकाऱ्यांच्या व्याकुळतेला स्वर दिला. तथाकथित श्रेष्ठ संगीतकार बदलत्या काळापुढे हतबल होत असताना रवी यांनी ‘निकाह’सारखा यशस्वी चित्रपट देऊन चकित गेले. लता मंगेशकर, मोहम्मद रफी, आशा भोसले, ,महेन्द कपूर यांच्या गाण्यांचा इतिहास रवी यांच्या गाण्यांशिवाय अपूर्ण आहे, हे काळानेच सिद्ध केले. ‘ऐ मेरे दिले नादाँ, तू गमसे ना घबराना’ म्हणत त्यांनी टीकेकडे दुर्लक्ष केले. ५० वर्षांनंतरही त्यांची गाणी टिकून आहेत, यापेक्षा त्यांच्या अभिजाततेचा पुरावा काय असू शकतो? “वक्त‘, “गुमराह‘, “एक फूल दो माली‘, “दो बदन‘, “चौदहवी का चॉंद‘ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांना त्यांनी दिलेले श्रवणीय संगीत लोकप्रिय झाले होते. सातत्याने दर्जेदार संगीत दिल्यानंतरही प्रसिद्धीपासून ते दोन हात लांबच होते. त्यांनी काही चित्रपटांसाठी गीतलेखन केले होते. रवी यांचे ७ मार्च २०१२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply