वसंत देसाई यांचा जन्म ९ जून १९१२ रोजी सोनवाड, सावंतवाडी येथे झाला. वसंत देसाई यांचे बालपण कोकणात गेले. काही तरी वेगळे करण्याची उर्मी त्यांना कोल्हापुरात घेऊन आली. कोल्हापुरात प्रभातमध्ये असतांना पडेल ते काम करीत असत. त्यांचे आयुष्य घडण्याला येथेच सुरुवात झाली. देवल क्लबमधे असतांना अल्लादियां खॉं व मंजी खॉं यांसारख्याचे गाणे ऐकून त्यांचे कान तयार झाले. अयोध्येचा राजा तील पहिली नांदी ही नाटकातल्या नांदीप्रमाणे होती. या नांदीमध्ये वसंत देसाईंचा आवाज होता. म्हणजेच बोलपटांची सुरुवात देसाईंच्या आवाजाने झाली असे म्हणता येईल. त्यांनी सुरुवातीला अनेक हिंदी चित्रपटांमध्ये गीते गायली. प्रभातमध्ये संगीत, पार्श्र्वसंगीत देण्यास सुरुवात झाली होती. संत ज्ञानेश्र्वरमधील गाडीवानाची भूमिका, संगीतासाठी बैलांचे खूर व बैलगाडीचा आवाज, विविध पक्ष्यांचे आवाज, ग्रामीण वाद्यांचा सुयोग्य वापर… मा.वसंत देसाई यांच्या कारकीर्दीतील अशा अनेक गोष्टी सांगता येतील. केशवराव भोळे, गोविंदराव टेंबे, मा. कृष्णराव हे प्रभातचे सुरुवातीचे संगीत दिग्दर्शक. त्यांच्या हाताखाली मा.वसंत देसाई तयार झाले. पुढे ते शांतारामबापूंबरोबर राजकमलमध्ये आले. त्यांच्या पहिला स्वतंत्रपणे संगीत दिलेला चित्रपट होता नायिका जयश्रीचा शकुंतला(हिंदी). राजकमलच्या ह्या शकुंतलाने उत्पन्नांचे सर्व रेकॉर्डस् मोडले. पहिला तमाशाप्रधान चित्रपट राम जोशी मधील ग. दि. माडगूळकरांनी लिहिलेल्या लावण्यांना वसंतरावांनी फक्कड चाली दिल्या. कवी होनाजी बाळा यांच्या जीवनावर काढलेल्या `अमरभूपाळी’ ह्या चित्रपटातील घन:श्याम सुंदरा ही भूपाळी अप्रतिम स्वररचनेमुळे खरोखरच अमर झाली आहे.
अभिजाततनेने ओतप्रोत भरलेल्या नृत्यांवर आधारित झनक झनक पायल बाजे चे संगीत वसंत देसाईंनी अजरामर केले आहे. त्यांनी त्यासाठी भारतांतील वेगवेगळ्या प्रांतांमधे प्रवास करून तेथील वैशिष्ट्यपूर्ण वाद्यांचा अभ्यास केला. पं. शिवकुमार शर्मा, पं. सामताप्रसाद, सुदर्शन, गोपीकृष्ण व मृदुंगवादक रामदास या सर्वांना त्यांनी राजकमलमध्ये पाचारण केले. झनक झनकने अफाट यश संपादन केले. त्यांची कीर्ती सगळीकडे झाली. आचार्य अत्रे यांनी १९५६ मध्ये काढलेल्या ‘श्यामची आई’ या चित्रपटाचे संगीत वसंत देसाईंचे होते. कवी यशवंत यांची आई ही अतिशय भावूक, करुण कविता त्यांनी स्वरबद्ध केली. श्यामची आई मध्ये ६ गाणी होती. मराठमोळे वातावरण निर्माण करणारे अप्रतिम पार्श्र्वसंगीत त्यांनी या चित्रपटास दिले. म्हणूनच या चित्रपटाच्या यशातील मोठा वाटा वसंतरावांकडे जातो. मा.वसंत देसाईंनी एकूण २० मराठी चित्रपटांना संगीत दिले. छोटा जवान मधील माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सुरू, जिंकू किंवा मरू हे गाणे किंवा मोलकरीण मधील देव जरी मज, दैव जाणिले कुणी ही गाणी सर्वश्रृत आहेत. इये मराठीचिये नगरीतील गीतांसाठीचे संगीतही प्रसंगानुरूप होते. त्यांनी पाठ्यपुस्तकांतील अनेक कवितांना या बाई या, देवा तुझे किती, माझ्या मामाची रंगीत गाडी, लेझिम चाले जोरात, घाल घाल पिंगा वार्या, आनंदी आनंद गडे इत्यादी कवितांना – सोप्या, सुंदर चाली दिल्या. शास्त्रीय रागांवर आधारीत असंख्य गाणी त्यांनी हिंदी -मराठीतून दिली.
शास्त्रीय संगीत क्षेत्रातील दिग्गजांना त्यांनी चित्रपट माध्यमात आणले. मा.वसंत देसाई यांनी ‘गुड्डी’ चित्रपटासाठी संगीतबद्ध केलेलं ‘हमको मनकी शक्ती देना’ हे प्रार्थना गीत गेली अनेक वर्षे देशभरातल्या शाळांमधून गायले जाते. वसंतरावांनी संगीतबद्ध केलेल्या ‘बोले रे पपीहरा’, ‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी’, ‘सुखाचे हे सुख श्रीहरी मुख’, ‘काय माझा आता पाहतोसी अंत’ या गाण्यांमुळे मराठी घरांमध्ये वाणी जयराम प्रसिद्ध झाल्या. गूंज उठी शहनाई, दो आँखे बारह हाथ, गुड्डी, रामराज्य यातील गाण्यांचे अतिशय सुंदर असे रसास्वादन त्यात आहे. ‘अमर भूपाळी’मधील ‘तुझ्या प्रीतीचे..’ हे गाणे ‘अर्धागिनी’मध्ये ‘बडे भोले हो’ असे नवे शब्द घेऊन कसे वेगळेच झाले, याचीही आठवण आहे. समूहगानाच्या क्षेत्रात देसाई यांच्या अपूर्व योगदानाची आहे. ‘जब तक सूरज चंदा चमके, गंगा जमूना मे बहे पानी’ असे टिकणारे वसंत देसाई यांनी संगीत दिले आहे. जवळजवळ ६५ हिंदी-मराठी चित्रपटांचे ते संगीत दिग्दर्शक होते. चित्रपट-नाटकांशिवाय त्यांनी बालगीतांना आणि समरगीतांनाही संगीत दिले. त्यांच्या ’ए मालिक तेरे बंदे हम’ या गीताला पाकिस्तानात राष्ट्रगीताचा दर्जा मिळाला. १९६२ च्या चीन युद्धाच्या वेळचे ’जिंकू किंवा मरू’ या ग.दि. माडगुळकर यांच्या गीताला त्यांनीच चाल लावली होती. १९४२ ते १९७६ या कालावधीत मा.वसंत देसाई यांनी एकूण ४६ चित्रपटांना उत्कृष्ट संगीत दिले. भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. मा.वसंत देसाई हे १९७३ साली मुंबईत भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांनी काही चित्रपटांत भूमिकाही केल्या होत्या. हिंदी व मराठी चित्रपटांमधे स्वत: गायलेली उत्तम गाणी त्यांनी दिली. १९६० ते १९७५ मध्ये संगीत नाटकांचे पुनरुज्जीवन करून त्यांना संगीत दिले. त्यांनी १३ लघुपटांनाही संगीत दिले. www.vasntdesai.com या वेब साईटवर मा.वसंत देसाई यांची गाणी,माहिती व फोटो आहेत.
वसंत देसाई- कम्पोजर पार एक्सलन्स’ या नावाने पुस्तक लिहून श्री.विश्वास नेरुरकर यांनी संगीतकार वसंत देसाई यांची संपूर्ण कारकीर्द रसिकांना उपलब्ध करून दिली आहे. मा.वसंत देसाई यांचे २२ डिसेंबर १९७५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट /ग्लोबल मराठी
Leave a Reply