आज ३१ ऑक्टोबर.. आज ज्येष्ठ अभिनेत्री सुमती गुप्ते यांची पुण्यतिथी.
मराठीत तमाशाप्रधान चित्रपटांची चलती असताना पडद्यावर केवळ सोज्ज्वळ नायिका रंगवून आपल्या सहजसुंदर अभिनयाची मोहोर उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे मा.सुमती गुप्ते.
त्यांचा जन्म १९१९ मध्ये वाई येथे झाला. वाईत जन्मलेल्या सुमतीबाईंचे बालपण मात्र बडोद्यासारख्या कला-संस्कृतीच्या माहेरघरात व्यतीत झाले. साहजिकच त्यांचा कलाक्षेत्राकडे, विशेषत: सिनेमाकडे ओढा होता. पदवी शिक्षण प्राप्त केल्यानंतर चित्रपटक्षेत्रात प्रवेश करण्यासाठी त्या ‘प्रभात’मध्ये दाखल झाल्या. तिथे ‘संत ज्ञानेश्वर’ या चित्रपटात त्यांना पहिले काम मिळाले. त्यानंतर त्यांना बाबासाहेब तोरणेंच्या ‘नवरदेव’ चित्रपटात प्रमुख भूमिका मिळाली. त्यांच्या कामाने प्रभावित होऊन भालजी पेंढारकरांनी त्यांना ‘थोरातांची कमळा’ या ऐतिहासिक चित्रपटात संभाजीच्या प्रेयसीची कमळेची मध्यवर्ती भूमिका दिली. त्यापाठोपाठ त्यांच्या ‘सूनबाई’नेही रौप्यमहोत्सवी यश मिळविले आणि सुमतीबाईंचे नाव एक उत्तम अभिनेत्री म्हणून सर्वतोमुखी झाले. पुढे त्यांनी मा. विनायकांच्या प्रफुल्ल पिक्चर्समध्ये ‘चिमुकला संसार’, ‘माझं बाळ’ यासारखे काही चित्रपट केले. ‘चिमुकला संसार’चे दिग्दर्शक वसंतराव जोगळेकर यांच्या रूपाने त्यांना जीवनाचा जोडीदारही इथेच लाभला. वसंतराव जोगळेकर यांच्या साथीने त्यांनी मीरा पिक्चर्स या संस्थेची स्थापना करून त्या बॅनरखाली ‘शेवटचा मालुसरा’, ‘जानकी’, ‘हा खेळ सावल्यांचा’ आदी चित्रपटांची निर्मितीही केली. अभिनयाबरोबरच ‘हा खेळ सावल्यांचा’, ‘जानकी’ आणि ‘शेवटचा मालुसरा’ या चित्रपटांची निमिर्ती आणि लेखनही सुमतीबाईंनी केले होते. दिग्दर्शक वसंत जोगळेकर यांच्या त्या पत्नी. ‘ऊनपाऊस’, ‘थोरातांची कमळा’, ‘चिमुकला संसार’, ‘हा खेळ सावल्यांचा’, ‘जानकी’ यांसारखे गाजलेले मराठी चित्रपट, तसेच ‘मौसी’, ‘उर्वशी’, ‘हमारा संसार’, ‘वक्त’, ‘एक मंझिल, दो राहें’ इत्यादी हिंदी चित्रपटांतून आणि ‘संशयकल्लोळ’, ‘उद्याचा संसार’, ‘संन्यस्त खड्ग’, ‘लग्नाची बेडी’, ‘विकारविलसित’ आदी नाटकांतून सुमती गुप्ते यांनी संस्मरणीय भूमिका केल्या. त्यांना रसरंगचा दादासाहेब फाळके पुरस्कार, गदिमा प्रतिष्ठानचा गृहिणी-सखी-माता पुरस्कार, शासनाचा व्ही. शांताराम पुरस्कार, अ. भा. मराठी चित्रपट महामंडळाचा ‘चित्रभूषण’ जीवनगौरव पुरस्कार मिळाले होते. नाटककार अच्युत वझे हे त्यांचे जावई आहेत.
सुमती गुप्ते यांचे ३१ ऑक्टोबर २००९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply