कुंदनलाल सैगल ही आठ अक्षरे म्हणजे सप्तकातील पहिला ‘सा’ आणि वरचा ‘सा’ मिळून आठ स्वर, संगीतप्रेमींसाठी ही मंत्राक्षरे आहेत. महान गायक नट या उपाधीपेक्षाही वरती स्थान असलेला हा स्वर. त्यांचा जन्म ११ एप्रिल १९०४ रोजी झाला. अवघ्या पंधरा-सोळा वर्षांच्या कालखंडात कुंदनलाल सैगल यांनी संपूर्ण संगीतसृष्टीवर अमीट ठसा उमटविला. त्यांच्या गायकीचा प्रभाव अनेक गाजलेल्या गायकांवर निश्चितपणे जाणवतो.
‘जब दिल ही टूट गया’ हे ‘शाहजहाँ’ चित्रपटातील गीत ऐकताना ‘हम जी के क्या करेंगे’मधील ‘क्या’ हा स्वर गाताना उदास, हतबल आणि सकारण असा उच्चार हे सारेच भिडल्यावाचून राहत नाही. दोन्ही अंतऱ्यांमध्ये ‘इक भेदी लूट गया’ किंवा ‘हर साथी छूट गया’ ही विफलता समजण्यासाठी मूळ गाणे ऐकावेच लागते. ‘तदबीर’ चित्रपटातील संगीतकार लाल मोहम्मद यांनी स्वरबद्ध केलेले ‘मैं पंछी आजाद मेरा कहीं दूर ठिकाना रे, इस दुनिया के बाग में मेरा आना-जाना रे’ हे गीत अधिक वेगळे काही सांगत नाही. या गीताचा अंतराही पुरेसा संदेश देतो. ‘जीवन की परभात में आऊँ, सांज भये तो मैं उड जाऊँ, बंधन में जो मुझको बांधे वो दिवाना रे..’ हेच सैगल यांच्या बाबतीत खरे आहे. ‘शाहजहाँ’ याच चित्रपटातील ‘गम दिए मुस्तकिल..’ या गीतातील दोन वेगवेगळ्या पद्धतीत गायलेले.. ‘हाय हाय ये जालिम जमाना..’ ही या गीतातील खास बात आहे. ‘दिया जलाओ जगमग.. जगमग..’ हे खेमचंद प्रकाश यांनी स्वरबद्ध केलेले ‘तानसेन’ चित्रपटातील गीत जेव्हा सैगल स्वरात आपल्यासमोर येते, तेव्हा स्वरांचे झुंबर क्षणार्धात लख्ख प्रकाशमान झाल्याचे जाणवते. आणि हा प्रकाश उमलतो तो सुरुवातीच्या ‘दिन सूना सूरज बिना..’ पासूनच. ‘सो जा राजकुमारी..’ या अंगाई गीताने के. एल. सैगल यांचा गाण्यातील भाव ऐकताना आपण मोहरून जातो. ‘माय सिस्टर’ चित्रपटातील ‘दो नैना मतवारे’ हे लोकप्रिय गीत, ‘दिया जिसने दिल’ या गीतातील ‘दिल’ या शब्दावरील स्वरमेळ, ‘रुमझुम रुमझुम चाल तिहारी’ या गीतातील ‘हंसध्वनी’ राग, ‘देवदास’ चित्रपटातील ‘बालम आये बसो मोरे मन में’ ही तिमिर बरन यांची आकर्षक स्वररचना हे सारे सैगल माहौल निर्माण करणारे आहे. लोककवी मनमोहन एका कवितेत सैगलांबद्दल म्हणतात-
तुझ्याच कंठामध्ये अवचित
मधमाशी घे ‘मोहोळ’ बांधुनी
बुलबुल बसले बनात रुसुनी।
कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी या सूरसम्राटाला मानवंदना देताना म्हटले होते-
अशीच संगीते आळवी तुझी कलावंता,
घडीभर जागव रे अमुची अशीच मानवता..
सैगल हे त्या काळचे सर्वात लोकप्रिय गायक. त्यांच्या आवाजाला इंग्लिश श्रोते ‘गोल्डन व्हॉइस’ म्हणायचे. सैगल यांची सर्वच गाणी आजही लोकप्रिय आहेत. त्यांच्या गैरफिल्मी गजलासुद्धा फार श्रवणीय आहेत. ‘बाबुल मोरा’ हे स्ट्रीट सिंगर चित्रपटातील गाणे अजूनही लोकांना फार आवडते. के.एल. सैगल यांचे १८ जानेवारी १९४७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply