नवीन लेखन...

झिनजिआंग, येथील “स्वातंत्र्य चळवळ” चीनचे मर्मस्थान

तिबेट, झिनजिआंग येथील “स्वातंत्र्या’ च्या चळवळी हा चीनच्या सुरक्षिततेला असलेला मोठा धोका आहे. उइगूर बंडखोरांशी सलोखा करण्यासंबंधी दलाई लामा यांनी केलेले विधान व त्यांनी केलेला “पूर्व तुर्कस्तान’ चा उल्लेख याची चिनी नेतृत्वाने गंभीर दखल घेतली आहे. तिबेट स्वायत्त प्रदेश व झिनजिआंग – उइगूर स्वायत्त प्रदेश देशाचा तीस टक्के भूभाग व्यापतात. हे दोन्ही प्रदेश नैसर्गिक साधनसंपत्तीने संपन्न आहेत.”

आपण २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला. त्याच्या आदल्या दिवशी चीनच्या पश्चिम सरहद्दीवर लष्कराबरोबर झालेल्या चकमकीत २३ दहशतवादी मारले गेल़े . चीनसारख्या बलाढय़, भारताबाबत आक्रमकतेने वागणार्‍या आणि पाकिस्तानपासून श्रीलंकेपर्यंत सर्व देशांना विविध प्रकारची मदत पुरवणार्‍या देशाला दहशतवादाशी मुकाबला करावा लागतो, असे शक्य आहे का?
झिनजिआंग प्रांतातला इस्लामी दहशतवाद
१९६२ च्या आक्रमणानंतर चीन हा आपला शत्रू आह़े. पाकिस्तानला तो बरीच मदत करत़ो .हा अवाढव्य `ड्रॅगन’ दहशतवाद्यांच्या समस्येने हैराण झाला तरी कसा? झिनजिआंग प्रांतात मोठा हिंसाचार सुरू असून, यामध्ये २०१२ मध्ये १०० ठार झाले आहेत. “ईस्ट तुर्कीस्तान इस्लामिक मूव्हमेंट’ चे पाकिस्तानानत प्रशिक्षण घेतलेले दहशतवादीच या हिंसाचाराला जबाबदार आहे. या दहशतवाद्यांना पाकिस्तानात प्रशिक्षण देण्यात येते. संघटनेने स्वतंत्र इस्लामी राज्याची मागणी केली आहे. या सर्व संघटनांपुढे इस्लाम, पॅन-तुर्कि राष्ट्रवाद, उइगूर राष्ट्रवाद अशा वेगवेगळ्या प्रेरणांचा प्रभाव आहे.
पाकिस्तानव्याप्त काश्मिरला लागून असलेल्या चीनच्या सीमेवर झिनजिआंग हा प्रांत ,चीनचा सर्वांत संवेदनशील भाग मानला जातो. आठ देशांच्या सीमा या भागाशी जोडल्या गेल्या आहेत. या प्रांतात ४१ टक्के लोकसंख्या उईगूर समुदायाची असून ४० टक्के लोक हंन जमातीचे आहेत. स्वतंत्र राज्याची मागणी करीत अल-कायदाशी लागेबांधे असलेल्या इस्ट तुर्कस्तान इस्लामी चळवळ (इटीआयएम) संघटनेच्या कारवायांनी चीनच्या झिजीयांग प्रांतात धुमाकूळ घातला आहे. गेल्या काही वर्षांपासून या भागात उईगूर मुस्लीम व पोलिसांमध्ये अनेक वेळा रक्तरंहित संघर्ष झाला आहे. २००९ मध्ये झिन्जियांगमधील उरुमकी येथे झालेल्या दंगलीत २०० लोक ठार झाले होते.

अशा प्रकारचा दहशतवाद चीनच्या पश्चिम-वायव्य सरहद्दीवर गेली अनेक दशके अस्तित्त्वात आहे. चीनमधील राजवटीने तेथील नागरी जीवनावर अनेक मर्यादा आणल्या आहेत. धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांवरील नियंत्रणे, चीनशी मिसळून गेलेल्या हान लोकांबरोबर असणारा धार्मिक-वांशिक-सांस्कृतिक संघर्ष, आर्थिक विषमता आणि झिनजियांग प्रांतातील नैसर्गिक संसाधनांची चिनी सरकारकडून होत असलेली उधळपट्टी ही या एकूण संघर्षामागील कारणे आहेत.
चीनमध्ये रमजानवर प्रतिबंध
चीनने रमजान महिन्यावर प्रतिबंध घातला . तेथील मुस्लिम मशिदीत जाऊ शकले नाहीत. पहाटे पाच वाजता पढली जाणारी नमाज आणि रमजानमध्ये रात्री पढली जाणारी तराबीह पासून ते वंचित राहिले. रोजे ठेवण्यावरही कडक प्रतिबंध केला गेला.चीन सरकार आपल्या कायद्याचे पालन जबरदस्तीने करवून तर घेतोच, तसेच जेव्हा एखाद्या धर्माच्या अनुयायांमुळे त्यांच्या सुरक्षेला बाधा येते असे वाटले तर ते प्रतिबंध घालतात. चीन एवढे रमजानविरोधी का झाले?
चीन सरकारद्वारा घोषित केलेल्या या कडव्या प्रतिबंधाचे मुख्य कारण होते, झिनजिआंग प्रांतातील उगूर मुस्लिमांचा सरकारप्रती द्वेष. चीनमधील झिनजिआंग या प्रांतात एग्योर वंशाचे मुस्लिम मोठ्या संख्येने आहेत. एकेकाळी हा तुर्की साम्राज्याचा सिक्यांग नावाचा भाग होता. रशियाच्या विघटनातून उजबेकीस्तान, ताजिकीस्तान, तुर्कमेनिस्तान आणि खिरगीजस्तान आदी मुस्लिम प्रांत स्वतंत्र झाले त्याचाच झिनजिआंग हा एक भाग होता. १९५५ पर्यंत तो स्वतंत्र होता. परंतु चीनने ज्याप्रमाणे आपल्या आसपासच्या सर्व देशांच्या सीमा किंवा प्रांत गिळंकृत केले त्याचप्रमाणे त्यांनी झिनजिआंगवरही कब्जा केला.
“धार्मिक-वांशिक-सांस्कृतिक फुटीरवाद”
तिबेटच्या उत्तर सीमेच्या पुढे चीनची पश्चिम, वायव्य आणि काहीशी उत्तरेकडील सरहद्द स्पर्शून पसरलेला झिनजियांग प्रांत मंगोलिया, रशिया आणि रशियाच्या विभाजनातून निर्माण झालेल्या देशांना लागून आह़े या देशांमध्ये कझाकिस्तान, किर्गिझिस्तान, ताजिकिस्तान यांचा समावेश आह़े. पाकव्याप्त काश्मीर या प्रदेशाला झिनजियांगची नैऋत्य सीमा लगटून आह़े झिनजियांग हे चीनचे दहशतवादी केन्द्र म्हणून ओळखले जाते.
रशिया आणि चीन या साम्यवादी विचारांच्या दोन शेजारी राष्ट्रांमध्ये मतभेद निर्माण झाले यानंतर झिनजियांगच्या वायव्येला पसरलेल्या रशियाने सरहद्दीवर लष्कर तैनात केले आणि कोलमडून पडत असलेल्या `पूर्व तुर्केस्तान’ चळवळीला वरच्यावर झेलण्याचा प्रयत्न केला. या बंडामागे रशियाचा हात आहे, असा आरोप करत मग चीनने ती चळवळ मोडून काढण्यासाठी लष्करी मोर्चेबांधणी केली.
तुर्कमेनिस्तान आणि चीन यांच्यामध्ये उज्बेकिस्तान, ताजिकिस्तान आणि किर्गिजिस्तान हे देश आहेत. या सर्वांच्या उत्तरेला असणार्‍या कझाकस्तानमध्ये तुर्केस्तान हे शहर आहे आणि कझाकस्तानची पूर्व सरहद्द झिनजियांगला लागून आहे. पूर्व तुर्केस्तान म्हणजे झिनजियांगचा वायव्येकडील भाग. या भागाला उइगूर म्हणतात. त्यामुळे हा अलगताबाद `उय्गरिस्तान’ म्हणून मानला जातो. या अलगतावाद्यांच्या अनेक दहशतवादी संघटना आहेत. ईस्ट तुर्केस्तान इस्लामिक मूव्हमेंट, इस्ट तुर्केस्तान लिबरेशन ऑर्गनायझेशन, युनायटेड रिव्होल्युशनरी फ्रंट ऑफ ईस्ट तुर्केस्तान, उइगूर लिबरेशन ऑर्गनायझेशन वगैरे. या संघटनांच्या अनुयायांना अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात प्रशिक्षण मिळते.
संघर्ष टाळण्यासाठी प्रतिबंध
रमजान सुरू होण्यापूर्वी चिनी सरकार आणि उगूर यांच्यामध्ये चकमक झाली होती. या लढाईत २ हजार उइगूर मारले गेले होते आणि जवळजवळ ४ हजार गंभीर रीत्या जखमी झाले. गेल्या दोन वर्षांपासून जुलैच्या दुसर्‍या आठवड्यात पोलिसांचा निषेध करण्यासाठी उइगूर लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येतात. उइगूर नेत्यांचे म्हणणे आहे की, चीन सरकार त्यांच्याशी सावत्र वागते. त्यांच्याजवळ ना कोणते काम आहे, ना उपजीविकेसाठी साधन. त्यांच्यावर आरोप लावून चिनी लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करते. त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी चीन सरकार काहीही करत नाही. ते जेव्हा एखाद्या गोष्टीची मागणी करतात तेव्हा त्यांना आतंकवाद आणि बंड या नावांशी जोडले जाते. त्यांचे मत आहे की, पायाभूत अधिकाराच्या लढाईला ते दहशत असे नाव देत आहेत. चीन सरकारचे म्हणणे आहे की, चीनच्या उत्तर पूर्व भागाच्या प्रगतीसाठी ते निरंतर काम करत आहेत, परंतु आपल्या मागासलेपणासाठी कुणी विरोधी कार्य करत असेल, तर त्यांना क्षमा केली जात नाही. उगूर मुस्लिमांचे म्हणणे आहे की, सरकारची नियत ठीक नाही. चिनी सरकार हान समाजाला उत्तेजित करून शांती भंग करते . उगूर लोकांचे म्हणणे आहे की, सरकारने अशी बदमाशी करणे बंद करावे, नाही तर आम्हाला आत्मरक्षण आणि स्वाभिमानासाठी पुढे सरकावे लागेल. चिनी सरकारचे म्हणणे आहे की, उगूर लोकांवर कोणतीही दया दाखवली जाणार नाही.
झिनजिआंग-उइगूर प्रदेशासाठीदेखील चीनने तिबेटप्रमाणेच व्यूहरचना केली आहे. संरक्षण खर्चात प्रचंड वाढ करण्यात आली आहे. झिनजिआंग पीपल्स आर्मड् पोलिस दलात ३० हजारांची भर घालण्यात आली आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे चीनच्या हानवंशीयांना जास्तीत जास्त संख्येने या प्रदेशांमध्ये स्थायिक होण्यास प्रवृत्त केले जात आहे. उइगूरना त्यांच्याच प्रदेशात “अल्पसंख्य’ करण्याचा हा डाव आहे. तसे झाल्यास या भागातील उठावाची तीव्रता आपोआपच कमी होईल.
चीनला झिनजिआंगमध्ये लढवत ठेवा
तिबेट आणि सिंकिंयांग हे चीनमधले टाइमबॉम्ब आहेत. चीनची पूर्वेकडची दौड रोखायची असेल तर पश्चिमेकडून दडपण आणावे लागेल. ज्याप्रमाणे चीन भारताला पाकिस्तानबरोबर लढवत ठेवतो तसेच आता आपण चीनला त्यांच्या पश्चिमेच्या प्रांतात लढवत ठेवावे लागेल. जर चीन ईशान्य भारतातील बांगलादेशी घुसखोरी, बंडखोरी, आणि माओवादाला मदत करतो तर आपण पण तिबेटचा संघर्ष सुरू ठेवायला आणि “झिनजिआंगमधील स्वातंत्र्य चळवळीला मदत करायला हवी.

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..